Ranji Trophy: गोव्याच्या गोलंदाजांची धुलाई! केरळच्या रोहन कुन्नुम्मलचे आक्रमक शतक; पाहुणा संघ आघाडीच्या दिशेने

Goa Vs Kerala: सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू आहे. गोव्याच्या पहिल्या डावातील ३५५ धावांना उत्तर देताना दिवसअखेर केरळने २ बाद २३७ धावा केल्या होत्या.
Ranji Trophy Goa Vs Kerala
Ranji Trophy Goa Vs KeralaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सलामीचा शैलीदार फलंदाज रोहन कुन्नुम्मल याने आक्रमकतेची कास धरत गोव्याच्या गोलंदाजांची लय बिघडवून टाकली, परिणामी रणजी करंडक क्रिकेट सामन्यात केरळला शुक्रवारी सुस्थिती गाठता आली. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्या संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या दिशेने कूच राखली.

सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर सुरू आहे. गोव्याच्या पहिल्या डावातील ३५५ धावांना उत्तर देताना दिवसअखेर केरळने २ बाद २३७ धावा केल्या होत्या. ते अजून ११८ धावांनी मागे असून आठ विकेट बाकी आहेत. गोव्याच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखलेला रोहन दिवसअखेर १३२ धावांवर नाबाद होता, त्याला साथ देणाऱ्या सलमान निझार याने नाबाद २५ धावा केल्या आहेत.

त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. दिवसातील शेवटच्या षटकात डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर याच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक समर दुभाषी याने रोहनला यष्टिचीत केले होते, मात्र मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतल्यानंतर अमूल्यने क्रीझबाहेर पाय टाकल्याने नो-बॉल जाहीर झाला आणि रोहनला जीवदान मिळाले.

रोहन कुन्नुम्मल याने गोव्याच्या गोलंदाजांवर जबरदस्त हल्ला चढविला. त्याने शुक्रवारी चहापानानंतर लगेच शतक नोंदविले.

दर्शन मिसाळच्या गोलंदाजीवर कव्हर्स क्षेत्रात दोन धावा वसूल करत या २७ वर्षीय फलंदाजांने ३४व्या प्रथम श्रेणी सामन्यातील एकंदरीत पाचवे, यंदा रणजी स्पर्धेतील पहिलेच शतक नोंदविले.

गोव्याच्या गोलंदाजांना निष्प्रभ ठरविताना या तडाखेबंद फलंदाजाने १०६ चेंडूंतच ११ चौकार व चार षटकारांसह शतक पूर्ण केले. रोहनने अभिषेक नायर (३२) याच्यासमवेत १३३ चेंडूंत ९७ धावांची सलामी दिली. डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर याने अभिषेकला पायचीत बाद करून गोव्याला पहिले यश मिळवून दिले.

त्यानंतर रोहनने माजी कर्णधार सचिन बेबी (३७) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. ऑफस्पिनर ललित यादवच्या गोलंदाजीवर गोव्याचा कर्णधार स्नेहल कवठणकर याने स्लीपमधून धावत सचिन बेबीचा अप्रतिम झेल पकडला.

समर-कौशिकमुळे गोव्याच्या साडेतीनशे धावा

सकाळच्या सत्रात पहिल्या दिवसअखेरच्या ८ बाद २७९ वरून गोव्याने समर दुभाषीच्या नाबाद अर्धशतकामुळे पहिल्या डावात साडेतीनशे धावांची मजल मारली. अखेरच्या दोन विकेटने २७ षटकांत ७६ धावांची भर टाकली. समरने संघातील पुनरागमन सार्थ ठरविताना २८व्या रणजी सामन्यात चौथे अर्धशतक केले.

त्याने शेवटचा गडी वासुकी कौशिक (२१) याच्यासमवेत ५१ धावांची बहुमोल भागीदारी केली. निधीश याने कौशिकला यष्टिरक्षकाकरवी झेलबाद करून गोव्याचा डाव संपविला. केरळचा डावखुरा फिरकी गोलंदाज अंकित शर्मा याने ४६ षटकांत ११५ धावांच्या मोबदल्यात ६ गडी बाद केले. समर ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने १०९ चेंडूंचा सामना करताना चार चौकार मारले.

Ranji Trophy Goa Vs Kerala
Ranji Trophy 2026: ऋतुराज गायकवाडचे झुंजार अर्धशतक, अर्जुन तेंडुलकरचे 2 बळी; गोव्याविरुद्ध महाराष्ट्र शतकी आघाडीच्या दिशेने

पर्वरीतील ‘केरळीय’ शतकवीर

रॉबर्ट फर्नांडेझ ः १०९ (२०१५-१६)

फाबिद अहमद ः १०६ (२०१५-१६)

रोहन कुन्नुम्मल ः ना.१३२ (२०२५-२६)

केरळतर्फे पर्वरीत डावात ५ विकेट

नियाझ नझीर ः ६-८२ (२०१३-१४)

संदीप वरियर ः ६-४४ (२०१५-१६)

अंकित शर्मा ः ६-११५ (२०२५-२६)

Ranji Trophy Goa Vs Kerala
Ranji Trophy: महाराष्ट्राविरुद्ध गोवा पराभवाच्या खाईत! रनमशीन 'अभिनव'ची शतकी झुंज, इतर फलंदाजांची हाराकिरी

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (८ बाद २७९ वरुन) ११०.४ षटकांत सर्वबाद ३५५ (समर दुभाषी नाबाद ५५, अमूल्य पांड्रेकर १०, वासुकी कौशिक २१, एम. डी. निधीश २०.४-१-७३-१, एन. पी. बासिल २२-५-७३-२, अंकित शर्मा ४६-४-११५-६).

केरळ, पहिला डाव ः ५८ षटकांत २ बाद २३७ (रोहन कुन्नुम्मल नाबाद १३२, अभिषेक नायर ३२, सचिन बेबी ३७, सलमान निझार नाबाद २५, अर्जुन तेंडुलकर ११-१-६०-०, वासुकी कौशिक ११-२-३१-०, दर्शन मिसाळ ८-१-४१-०, ललित यादव १६-२-४३-१, अमूल्य पांड्रेकर ९-०-४४-१, यश कसवणकर ३-०-१०-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com