

पुणे: महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाने रणजी करंडकातील ब गटातील साखळी फेरीतील गोव्याविरुद्धच्या लढतीचा दुसरा दिवसही गाजवला. गोवा संघाचा पहिला डाव २०९ धावांवर गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राच्या संघाने दुसऱ्या दिवसअखेरीस आठ बाद ३०६ धावा केल्या आहेत.
महाराष्ट्राकडे आता ९७ धावांची आघाडी आहे. ऋतुराज गायकवाड (६६ धावा) व सौरभ नवले (नाबाद ९५ धावा) यांच्या अर्धशतकी खेळीने शुक्रवारचा दिवस गाजला. महाराष्ट्राच्या संघाने बिनबाद १९ या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली.
वासुकी कौशिकने अर्शिन कुलकर्णीला सात धावांवर बाद करीत महाराष्ट्राला पहिला धक्का दिला. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने पृथ्वी शॉ याला ३१ धावांवर, तर ललित यादवने नीरज जोशीला २१ धावांवर बाद करीत महाराष्ट्राचा पाय खोलात नेण्याचा प्रयत्न केला.
अनुभवी ऋतुराज गायकवाड व कर्णधार अंकीत बावणे या जोडीने ४९ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अमूल्य पांड्रेकर याने अंकीतला २२ धावांवर बाद करीत जोडी तोडली. ऋतुराजने १११ चेंडूंमध्ये सहा चौकारांसह ६६ धावांची खेळी केली. तो मोठी खेळी करणार असे वाटत असतानाच दर्शन मिसाळच्या गोलंदाजीवर बाद झाला.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव ः २०९
महाराष्ट्र, पहिला डाव (बिनबाद १९ वरुन) ः ९१ षटकांत ८ बाद ३०६ (पृथ्वी शॉ ३१, नीरज जोशी २३, ऋतुराज गायकवाड ६६, अंकित बावणे २२, सौरभ नवले नाबाद ९५, जलज सक्सेना २२, विकी ओत्सवाल नाबाद १३, वासुकी कौशिक १९-५-४१-१, अर्जुन तेंडुलकर ९-१-४२-२, दर्शन मिसाळ १७-१-५२-१, अमूल्य पांड्रेकर १७-२-५७-१, ललित यादव २६-२-९५-३, दीपराज गावकर ३-१-१०-०).
सौरभ नवले याने तळाच्या फलंदाजांसोबत महाराष्ट्रासाठी मोलाची कामगिरी बजावली. त्याने सिद्धार्थ म्हात्रेसोबत (१४ धावा) ४८ धावांची भागीदारी केली. तसेच जलाज सक्सेना (२२ धावा) याच्यासोबत ५८ धावांची भागीदारी केली. महाराष्ट्राच्या संघासाठी या दोन भागीदारी महत्त्वाच्या ठरल्या. आता सौरभ १३ चौकारांसह ९५ धावांवर खेळत आहे. त्याने शतकाकडे वाटचाल केली आहे. शनिवारी (ता. २४) त्याच्याकडून शतक पूर्ण करण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.