Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

Goa vs Chandigarh Cricket: गोव्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटात दणक्यात पुनरागमन साधताना शनिवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर दणदणीत विजयी ‘दिवाळी’ साजरी केली.
Goa Cricket
Goa Ranji Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटात दणक्यात पुनरागमन साधताना शनिवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर दणदणीत विजयी ‘दिवाळी’ साजरी केली. अनुभवी डावखुरा फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळच्या पाच विकेटच्या साह्याने त्यांनी चंडीगडला डाव व ७५ धावांनी नमवून बोनससह एकूण सात गुणांची कमाई केली. द्विशतक आणि दोन्ही डावांत मिळून चार गडी बाद करणारा ‘पाहुणा’ ललित यादव सामन्याचा मानकरी ठरला.

एलिट ब गट सामन्यात फॉलोऑनची नामुष्की आणि ४२९ धावांच्या पिछाडीनंतर चंडीगडने सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद १५९ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात अर्जुन आझाद (१४१) व अंकित कौशिक (८२) यांनी चिवटपणे खिंड लढविली. जम बसलेली जोडी दर्शन मिसाळने फोडली आणि गोव्याच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

चंडीगडचा दुसरा डाव उपाहारानंतर ३५४ धावांत संपुष्टात आला. २४ वर्षीय अर्जुन याने पदार्पणात शतक करण्याचा पराक्रम साधला. दर्शनच्या गोलंदाजीवर कश्यप बखले याने अंकितचा शानदार झेल पकडल्याने चौथ्या विकेटसाठीची १५३ धावांची भागीदारी संपुष्टात आली.

नंतर दर्शनच्याच गोलंदाजीवर बखले याने अर्जुन आझादचा झेल पकडला. यंदा कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्यानंतर ३३ वर्षीय दर्शनने दबावविरहित खेळ करताना सामना जिंकून देण्याचे कौशल्य प्रदर्शित केले. त्याला दुसऱ्या टोकाला सुरेख साथ देताना ऑफस्पिनर मोहित रेडकर याने तीन गडी बाद केले. गोव्याचा गटातील पुढील सामना कर्नाटकविरुद्ध शिमोगा येथे २५ ऑक्टोबरपासून खेळला जाईल.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः ५६६

चंडीगड, पहिला डाव ः १३७

चंडीगड, दुसरा डाव (३ बाद १५९ वरून) ः ९१.४ षटकांत सर्वबाद ३५४ (अर्जुन आझाद १४१, अंकित कौशिक ८२, राजअंगद बावा १८, मयंक सिद्धू नाबाद ३३, अर्जुन तेंडुलकर १५-२-६९-१, दर्शन मिसाळ ३५.४-३-१२४-५, मोहित रेडकर २५-१-९३-३,

ललित यादव १२-१-३६-१, अभिनव तेजराणा १-०-२-०, हेरंब परब ३-१-१६-०).

डावाने सामना जिंकल्याने खेळाडू ‘लखपती’

एलिट गटातील सामना डावाच्या फरकाने जिंकून मोहिमेस धडाक्यात सुरवात केलेल्या गोव्याच्या संघाला महेश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) व्यवस्थापकीय समितीने लगेच शाबासकी देऊन खेळाडूंचा हुरूप वाढविला. सामन्यात द्विशतके केलेले अभिनव तेजराणा (२०५) व ललित यादव (२१३), तसेच दोन्ही डावांत मिळून आठ गडी बाद केलेला दर्शन मिसाळ (३-२७ व ५-१२४) यांना प्रत्येकी दोन लाख रुपये, संघांतील अन्य खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये, तसेच सपोर्ट स्टाफला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा धनादेश देऊन मैदानावर विजयासाठी मेहनत घेतलेल्या साऱ्यांची दिवाळी ‘गोड’ केली. गोव्याने एलिट गटात डावाने सामना जिंकल्यामुळे संघाला प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे जीसीएकडून सांगण्यात आले.

Goa Cricket
Ranji Trophy: विजयासाठी गोव्याला 7 विकेटची गरज! फॉलोऑननंतर चंदीगडचा चिवट प्रतिकार; अर्जुनची झुंझार फलंदाजी

दृष्टिक्षेपात...

१.दर्शनने अविनाश आवारेला गाठले ः दर्शन मिसाळने एकंदरीत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दहाव्यांदा डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. त्याने गोव्याचा माजी वेगवान गोलंदाज अविनाश आवारे याला आता गाठले आहे. गोव्यातर्फे सर्वाधिक १३ वेळा डावात ५ गडी बाद करण्याचा विक्रम शदाब जकाती याच्या नावावर आहे. डावखुऱ्या दर्शनने ७८ रणजी करंडक सामन्यात १८२ गडी बाद केले असून शदाब जकाती (२७१ विकेट) याच्यानंतर त्याचा क्रम आहे. दर्शनने पर्वरीत चौथ्यांदा, तर चंडीगडविरुद्ध दुसऱ्यांदा डावात ५ गडी बाद केले.

२.अकराव्यांदा डावाने विजय ः गोव्याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अकराव्यांदा डावाने सामना जिंकला, तर आठव्यांदा प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोऑन लादल्यानंतर डावाने विजय मिळविला. एकंदरीत गोव्याचा हा रणजी करंडक स्पर्धेतील ३६वा विजय असून घरच्या मैदानावरील सामना जिंकण्याची ही २० वी वेळ ठरली. चंडीगडविरुद्धच्या तीन रणजी लढतीत गोव्याने पहिल्यांदाच विजय मिळविला.

Goa Cricket
Goa Ranji Cricket: गोवा क्रिकेटबद्दल मोठी बातमी! रणजीसाठी निवडला नवीन Captain; 'या' कारणास्तव मुकणार पहिल्याच सामन्याला

पुढील लढतीसाठी १७ सदस्यीय संघ

वैयक्तिक कारणास्तव चंडीगडविरुद्धच्या सामन्यासाठी मुकलेला नियमित कर्णधार स्नेहल कवठणकर व ‘पाहुणा’ वेगवान गोलंदाज वासुकी कौशिक कर्नाटकविरुद्धच्या लढतीसाठी गोव्याच्या संघात परतले आहे. संघात बदल न करता पुढील लढतीसाठी १७ सदस्यीय संघ दौऱ्यावर पाठविण्याचे जीसीएने ठरविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com