

पणजी: गोव्याची शैलीदार बॅटर पूर्वजा वेर्लेकर हिला सातत्यपूर्ण फलंदाजीची बक्षिसी मिळाली आहे. आगामी सीनियर महिला आंतरविभागीय एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी तिची दक्षिण विभागीय संघात निवड झाली असून अष्टपैलू पूर्वा भाईडकर हिला राखीव खेळाडूंत स्थान मिळाले आहे.
आंतरविभागीय स्पर्धा ५ ते १५ मार्च या कालावधीत बंगळूर येथे खेळली जाईल. गोव्याच्या संघाची सपोर्ट स्टाफ रक्षंदा पिळर्णकर हिची दक्षिण विभागीय संघाची कामगिरी विश्लेषक म्हणून नियुक्ती झाली आहे. खेळाडू व सपोर्ट स्टाफ निवडीबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनने अभिनंदन केले आहे.
रांची येथे झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा संघ एलिट क गटात खेळला होता. पूर्वजा हिने सलामीला फलंदाजी करताना सात सामन्यांतील सात डावांत ७४.३३ च्या सरासरीने ४४६ धावा केल्या. यामध्ये एक शतक व तीन अर्धशतकांचा समावेश होता. एलिट विभागातील सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटर्समध्ये
पूर्वजाला पाचवा क्रमांक मिळाला. तिने हैदराबादविरुद्ध नाबाद १६६ धावा केल्या. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये गोव्यातर्फे सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम तिने केला आहे.
राखीव खेळाडूंत निवड झालेल्या पूर्वा हिने रांची येथील स्पर्धेत सात डावांत ३१च्या सरासरीने एका अर्धशतकासह २१७ धावा केल्या, शिवाय फिरकी गोलंदाजीत आठ गडी बाद केले. तिने सौराष्ट्रविरुद्ध ७२ धावांची खेळी केली होती.
पूर्वजाची कामगिरी
विरुद्ध दिल्ली ८६, विरुद्ध हैदराबाद नाबाद १६६, विरुद्ध सौराष्ट्र ५१, विरुद्ध पंजाब २३, विरुद्ध त्रिपुरा २९, विरुद्ध रेल्वे ३२, विरुद्ध केरळ ५९
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.