
कोलकाता: विश्वविजेत्या अर्जेंटिना संघातील महान फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी हा डिसेंबर महिन्यात तीन दिवसांसाठी भारत दौऱ्यावर येणार हे गुरुवारी निश्चित झाले आहे. स्वत: लियोनेल मेस्सी याने आपण फुटबॉलप्रेमी भारत या देशाचा दौरा करणार असून, येथे १४ वर्षांनंतर पुन्हा येण्याचा अभिमान व सन्मान आहे, असे स्पष्ट करीत शंकाकुशंकांना पूर्णविराम लावला आहे.
“हा दौरा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. भारत हा एक खूप स्पेशल देश आहे. माझ्याकडे १४ वर्षांपूर्वीच्या येथील भेटीच्या खूप छान आठवणी आहेत. तिथले चाहते अप्रतिम होते.
भारत हा एक फुटबॉलप्रेमी देश आहे. मला तिथल्या नवीन पिढीतील चाहत्यांशी भेटण्याची आणि माझ्या या सुंदर खेळाबद्दलचे प्रेम शेअर करण्याची आतुरता आहे,” असे लियोनेल मेस्सीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
लियोनेल मेस्सीचा भारता दौरा जुळवून आणणाऱ्या आयोजकांनी आधीच १५ ऑगस्ट रोजी दौऱ्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला होता, पण गुरुवारी लियोनेल मेस्सीने स्वतः पहिल्यांदाच या दौऱ्याची पुष्टी केली.
लियोनेल मेस्सीचा हा चार शहरांचा दौरा १३ डिसेंबर रोजी कोलकातापासून सुरू होईल, त्यानंतर अहमदाबाद, मुंबई आणि नवी दिल्ली या शहरांना भेट देण्यात येणार आहे. १५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेऊन हा दौरा संपेल.
विश्वविजेता अर्जेंटिनाचा संघ नोव्हेंबर महिन्यात भारतातील केरळचा दौरा करणार आहे. या संघासोबत लियोनेल मेस्सी आल्यास दोन महिन्यांत तो दोन वेळा भारतात येईल, मात्र लियोनेल मेस्सी अर्जेंटिना संघासोबत केरळ दौरा करणार की नाही हे अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
या दौऱ्यात अर्जेंटिनाचा हा दिग्गज खेळाडू कॉन्सर्ट, चाहत्यांशी भेटीगाठी, फूड फेस्टिव्हल्स, फुटबॉल मास्टरक्लासेस आणि मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पॅडल प्रदर्शनात सहभागी होईल. कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियममध्ये लियोनेल मेस्सीचा कार्यक्रम होणार आहे, याचीही घोषणा करण्यात आली. १३ डिसेंबर रोजी होत असलेल्या कार्यक्रमांमध्ये लियोनेल मेस्सी भारतीय दिग्गज सौरव गांगुली, बाईचुंग भुतिया आणि लिएंडर पेस यांच्यासोबत मैदानात दिसण्याची दाट शक्यता आहे.
संयोजकांकडून लियोनेल मेस्सीचा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुतळा तयार करण्यात येणार आहे. तसेच लियोनेल मेस्सीचा समावेश असलेल्या कार्यक्रमाची एक तिकीट ३५०० रुपयांपासून सुरू करण्यात येणार आहे. कोलकात्यात एक खास खाद्य आणि चहा महोत्सव होणार आहे.
लियोनेल मेस्सीचा मुंबई दौराही विशेष असणार आहे. याप्रसंगी लियोनेल मेस्सी एका प्रदर्शनीय सामन्यात शाहरुख खान, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी व इतर बॉलीवूड कलाकारांसोबत सहभागी होण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.