पणजी: गोव्याच्या रणजी-सीनियर क्रिकेट संघ प्रशिक्षक नियुक्त करताना स्थानिकास डावलून बाहेरगावच्या प्रशिक्षकाला गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) प्राधान्य दिले, तसेच आपण दीर्घानुभवी व यशस्वी असताना अर्ज करूनही मुलाखतीसाठी निमंत्रित न केल्याबद्दल गोव्याचे माजी रणजीपटू हेमंत आंगले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात ६५ वर्षीय हेमंत यांनी सांगितले, की ‘‘यावर्षी जून महिन्यात मी रणजी संघ प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. उमेदवारी अर्जानुसार जीसीए मला मुलाखतीसाठी बोलावणार ही अपेक्षा होती. मात्र संघ प्रशिक्षकपदाची प्रक्रिया पूर्ण झाली असून गोव्याबाहेरील प्रशिक्षकाकडे जबाबदारी देण्यात आल्याचे वर्तमानपत्रात मी वाचले.
त्यामुळे मला धक्का बसला असून आश्चर्यचकीतही झालो आहे. मला मुलाखतीसाठी का बोलावले नाही हा माझा प्रश्न आहे,’’ असे हेमंत यांनी रविवारी सांगितले. यासंदर्भात त्यांनी जीसीएकडे लेखी पत्रव्यवहार केला असून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या शुक्रवारी जीसीए व्यवस्थापकीय समितीची बैठक झाली. त्यावेळी गोव्याच्या रणजी-सीनियर संघ प्रशिक्षकपदी पंजाबचे ४७ वर्षीय माजी अष्टपैलू, भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. ही माहिती बैठकीनंतर जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली.
गोव्याचे हेमंत आंगले यांची गतवर्षी प्रतिष्ठेच्या दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण विभागाने दीर्घ कालावधीनंतर दुलिप करंडक जिंकला होता.
आपला अनुभव, तसेच गतवर्षी दक्षिण विभागाला दुलिप करंडक जिंकून दिल्यानंतर यशस्वी स्थानिक प्रशिक्षक या नात्याने यंदा जीसीएकडून किमान मुलाखतीसाठी बोलावणे अपेक्षा होती, पण प्रशिक्षकपदी बाहेरगावच्या माजी क्रिकेटपटूची निवड झाल्याने निराशा झालो असून खंत व्यक्त करत आहे, असे हेमंत म्हणाले. आपण यासंदर्भात जीसीए सचिव रोहन यांना विचारणा केली, पण समर्पक उत्तर मिळाले नाही, असे त्यांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.