

पणजी: गोव्याची एकमेव महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिखा पांडे यावेळच्या वूमन्स प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) क्रिकेट स्पर्धेत नवी ‘इनिंग’ खेळणार आहे. सलग तीन मोसम दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केल्यानंतर अनुभवी वेगवान गोलंदाज यंदा यूपी वॉरियर्स संघाच्या जर्सीत मैदानावर उतरेल. स्पर्धेच्या चारही मोसमात खेळणाऱ्या या ३६ वर्षीय खेळाडूचा दीर्घानुभव निर्णायक ठरेल.
प्रभावी ‘इनस्विंगर’साठी ख्यात असलेली शिखा महिला क्रिकेटमधील व्यावसायिक लीग स्पर्धांत नियमित नाव आहे. डब्ल्यूपीएलव्यतिरिक्त ती ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग, तसेच वेस्ट इंडीजमधील कॅरिबियन प्रीमियर लीग (डब्ल्यूसीपीएल) स्पर्धेतही खेळली आहे. २०२५ मध्ये तिने डब्ल्यूसीपीएल स्पर्धेत त्रिनबागो नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले होते.
‘डब्ल्यूपीएल’ मधील तीन मोसमात शिखाने २७ सामन्यांत ६.९६ची इकॉनॉमी रेट आणि २३.२० च्या सरासरीने ३० विकेट्स मिळविल्या आहेत. तळात फलंदाजी करताना तिने ११४.८१च्या स्ट्राईक रेटने ९३ धावा केल्या आहेत.
यूपी वॉरियर्ससाठी शिखाची अष्टपैलू गुणवत्ता उपयुक्त ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळेच तिला नोव्हेंबरमध्ये झालेल्या लिलावात मागणी होती. यावेळच्या डब्ल्यूपीएल स्पर्धेतील यूपी वॉरियर्स संघाचा पहिला सामना १० जानेवारी रोजी गुजरात जायंट्सविरुद्ध होईल.
आंतरराष्ट्रीय पातळीवर २०१४ ते २०२३ या कालावधीत शिखा भारतातर्फे तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १२० आंतरराष्ट्रीय सामने खेळली असून एकूण १२२ विकेट्स टिपल्या आहेत. तिने तीन कसोटींत चार विकेट्स, ५५ एकदिवसीय सामन्यांत ७५ विकेट्स, तर ६२ टी-२० सामन्यांत ४३ विकेट्स मिळविल्या आहेत.
शिखा संघात असताना २०१७ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपविजेता ठरला होता. २०२० मध्ये महिलांच्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय महिला संघातही तिचा समावेश होता.
मागील नोव्हेंबरमध्ये झालेल्या डब्ल्यूपीएल लिलावात अष्टपैलू शिखा हिच्यासाठी यूपी वॉरियर्झ व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघांत जोरदार चुरस राहिली. बंगळूर संघाने तिच्यासाठी बोली दोन कोटी रुपयांपर्यंत वाढविली होती. अखेर २.४ कोटी रुपयांत यूपी वॉरियर्झने तिला आपल्या संघात घेतले. सध्या भारतीय संघाची सदस्य नसली, तरी शिखा हिला मोठा रक्कम मिळाली आहे. यावरून तिच्या अनुभवाचे महत्त्व लक्षात येते. लिलावात तिची प्रारंभिक बोली ४० लाख रुपये होती.
शिखा पांडे गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार आहे. दोन दशके गोव्याकडून खेळल्यानंतर २०२५-२६ मधील देशांतर्गत क्रिकेटमध्ये तिने व्यावसायिक क्रिकेटपटू या नात्याने बडोदा महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये वयाच्या १५ वर्षी शिखाची गोव्याच्या वयोगट महिला क्रिकेट संघात निवड झाली होती. २००७-०८ मध्ये वयाच्या १७व्या वर्षी तिने गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. गोवा सरकारच्या दिलीप सरदेसाई क्रीडा उत्कृष्टता पुरस्काराची ती २०२७-१८ मध्ये मानकरी ठरली होती. गोमंतकीय महिला क्रिकेटपटूंसाठी शिखाची कामगिरी आदर्शवत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.