Cooch Behar Trophy: गोव्याला मध्य प्रदेशकडून कठीण आव्हान अपेक्षित, उपांत्यपूर्व लढतीत लागणार कस

Cooch Behar Trophy 2025: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत एलिट ‘ड’ गटातून अपराजीत कामगिरीसह गोव्याने उपांत्यपूर्व फेरी गाठलेली असली, तरी मागील दोन सामन्यांतील त्यांची कामगिरी उत्साहवर्धक नाही.
Cooch Behar Trophy
Cooch Behar TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत एलिट ‘ड’ गटातून अपराजीत कामगिरीसह गोव्याने उपांत्यपूर्व फेरी गाठलेली असली, तरी मागील दोन सामन्यांतील त्यांची कामगिरी उत्साहवर्धक नाही. परिणामी मध्य प्रदेशविरुद्ध महत्त्वपूर्ण लढतीत त्यांचा कस लागण्याचे संकेत असून कठीण आव्हान अपेक्षित आहे.

गोवा आणि मध्य प्रदेश यांच्यातील चार दिवसीय उपांत्यपूर्व सामना कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर गुरुवारपासून (ता. १) खेळला जाईल. गोव्याने एलिट ‘ड’ गटात तीन विजय व दोन अनिर्णित निकालांसह २४ गुण मिळवून अव्वल स्थान मिळविले, तर एलिट ‘अ’ गटात चार विजय व एका पराभवामुळे २६ गुणांसह मध्य प्रदेशला दुसरा क्रमांक मिळाला.

Cooch Behar Trophy
Goa Education: पहिली ते आठवीपर्यंतच्‍या प्रश्‍‍नपत्रिका 'एससीईआरटी'च तयार करणार! परिपत्रक लवकरच जारी

एलिट गटातील मानांकनात गोव्याला तिसरा, तर मध्य प्रदेशला सहावा क्रमांक मिळाला. दोन्ही संघांच्या कोशंटचा विचार करता मध्य प्रदेशचा संघ सरस आहे. पाच सामन्यानंतर त्यांचा कोशंट १.७६६ असा असून गोव्याचा कोशंट १.५५६ इतका आहे.

गोव्याने स्पर्धेत सुरवातीस ओळीने तीन सामने जिंकताना अनुक्रमे छत्तीसगड व आसामला डावाच्या फरकाने, तसेच उत्तर प्रदेशलाही सहज नमविले. मात्र, नंतरच्या दोन लढतीत त्यांची कामगिरी किंचित घसरली. त्यामुळे अनिर्णित लढतीत अनुक्रमे बंगाल व चंडीगडविरुद्ध प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले.

या दोन सामन्यांतील कामगिरी लक्षात घेता, मध्य प्रदेशविरुद्ध गोव्याला सावधच राहावे लागेल. सांगे येथे साखळी लढतीत गोव्याने उत्तर प्रदेशला सात विकेटने नमविले होते, तेव्हा त्यांनी पाहुण्या संघाचा पहिला डाव १२५ धावांत गुंडाळला होता. 

एका सामन्यासाठी २१ खेळाडू

गोवा क्रिकेट असोसिएशनने मध्य प्रदेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीसाठी अधिकृत संघ जाहीर केलेला नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार, संघात सध्या २१ खेळाडू आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नियमानुसार एका सामन्यासाठी १५ खेळाडूंच्या संघाचीच नोंदणी केली जाते, त्यामुळे यजमानांनी गुरुवारी नाणेफेकीपूर्वी १५ सदस्यीय संघ जाहीर करण्याचे ठरविले आहे. मागील पाच सामन्यांत खेळलेल्या प्रमुख खेळाडूंची जागा पक्की आहे.

Cooch Behar Trophy
Goa Politics: काँग्रेस नेत्यांमध्ये कुठ्ठाळीत राडा! 'गेट आऊट' म्हणत नेत्याने गटाध्यक्षाला बदडले, सिमोईस यांच्या विरोधात तक्रार दाखल

गोव्याची मदार कर्णधार यशवर

बलाढ्य मध्य प्रदेशला टक्कर देताना साहजिकच गोव्याची मदार कर्णधार यश कसवणकर याच्यावरच असेल. ऑफस्पिनर  व शैलीदार  फलंदाज असलेल्या या अष्टपैलूने कामगिरी सातत्य राखले आहे.

शिवाय मध्यमगती चिगुरुपती व्यंकट, ऑफस्पिनर मिहीर कुडाळकर, लेगस्पिनर शिवेन बोरकर यांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. तुलनेत फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. चंडीगडविरुद्ध सलामीच्या आदित्य कोटा, सार्थक भिके व शंतनू नेवगी यांनी अर्धशतके केली होती हा थोडाफार दिलासा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com