
2025 National Games of India
पणजी: गोव्याने घरच्या मैदानावर ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्व ४३ खेळांत भाग घेताना नव्वदपेक्षा जास्त पदके जिंकून इतिहास घडविला होता, आता उत्तराखंडमध्ये होणाऱ्या ३८व्या स्पर्धेत १४ खेळांतच पात्रता मिळाली असून पदकांची संख्या कमालीची घटण्याचे संकेत आहेत.
‘‘गोव्यात झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान या नात्याने सर्व खेळांत सहभाग घेता आला होता. २८ जानेवारीपासून उत्तराखंडमध्ये होणाऱ्या ३८व्या स्पर्धेत पात्रता निकषांनुसार गोवा १४ खेळांतच पात्र ठरला आहे. त्यामुळे पदके घटणार हे निश्चित, तरीही पदकतक्त्यात राज्याला दुहेरी आकडी पदके मिळण्याची आशा आहे,’’ असे गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वीच्या स्पर्धेत गोव्याला एकूण १६ खेळांत २७ सुवर्णांसह ९३ पदके मिळाली होती.
भक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील स्पर्धेसाठी जलतरण, ॲथलेटिक्स, तिरंदाजी, बीच व्हॉलिबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, फुटबॉल (पुरुष), मल्लखांब, मॉडर्न पेंटॅथलॉन, स्क्वॉश, तायक्वांदो, ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, वुशू या खेळांत गोव्याचे क्रीडापटू पात्र ठरले आहेत.
दोन वर्षांपूर्वी तिरंदाजी, सायकलिंग, फुटबॉल, ट्रायथलॉन या खेळांत गोव्याला पदके मिळाली नव्हती, तर बीच व्हॉलिबॉलला स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली नव्हती. उत्तराखंडमधील स्पर्धेत मल्लखांब प्रात्यक्षिक खेळ आहे. स्पर्धात्मक प्रकारात एकूण ३२ खेळ आहेत.
भक्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅनोईंगमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यास एक खेळाडू असून तो गोवा ऑलिंपिक संघटनेचे निकष पूर्ण करू शकलेला नाही. त्याने तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यास तो गोव्यातर्फे खेळू शकतो, तसे झाल्यास उत्तराखंडमध्ये गोव्याचा १५ खेळांत सहभाग असेल.
राष्ट्रीय पातळीवरील मागील दोन वर्षांतील कामगिरीनुसार, गोव्याला उत्तराखंडमधील स्पर्धेत बॉक्सिंग, मॉडर्न पेंटॅथलॉन, जलतरण, स्क्वॉश, तायक्वांदो, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, वुशू या खेळात पदके मिळू शकतात.
गोवा ऑलिंपिक संघटनेच्या नोंदणीनुसार, उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे एकूण ७८ जण सहभागी होतील. यामध्ये ४६ पुरुष, तर ३२ महिला आहेत.
गोव्याने ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वे मार्शल आर्टमध्ये १० सुवर्णांसह एकूण २७ पदके, तर सेपॅक टॅक्रो खेळात सहा सुवर्णांसह आठ पदके जिंकली होती, मात्र हे दोन्ही खेळ ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नाहीत. पेंचाक सिलाटमध्ये गोव्याला एकूण १६ पदके मिळाली होती, हा खेळही उत्तराखंडमधील स्पर्धेत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.