
GCA Meeting women Cricketer Harassment Case
पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) वार्षिक आमसभेत रविवारी मतभेदाला तिलांजली देत राज्यातील क्रिकेटच्या प्रगतीला ‘बहुमता’ने प्राधान्य मिळाले. महिला क्रिकेटपटू सतावणूक कथित आरोप प्रकरण चौकशी अहवाल संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीकडे सोपविण्यात निर्णय पर्वरी येथे झालेल्या सभेत झाला. वादग्रस्त वाटणारी बैठक पंधरा मिनिटांतच सुरळीतपणे पार पडली.
गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी गोवा क्रिकेट असोसिएशनचे महिला क्रिकेट संचालक-संघ प्रशिक्षक सर्वेश नाईक यांच्यावर सतावणुकीचा आरोप केला होता. या प्रकरणी चौकशी समिती नियुक्त झाली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालावर आमसभेत चर्चा व्हावी, तसेच निर्णय होण्यासाठी जीसीए अध्यक्ष विपुल फडके आग्रही होते. त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतही यावरच भर दिला होता. रविवारी वार्षिक आमसभेत संबंधित चौकशी अहवाल संघटनेच्या व्यवस्थापकीय समितीकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार रविवारी पर्वरी येथील जीसीए संकुलात विशेष आमसभा झाली. यावेळी न्यायालयाने नियुक्त केलेले वकील ॲड. योगेश नाडकर्णी वार्षिक आमसभेसाठी निरीक्षक होते.
वार्षिक आमसभा विषय सूचीतील फक्त जीसीए लोकपाल नियुक्ती विषयावर निर्णय झाला नाही, बाकी सर्व विषय, तसेच सचिव या नात्याने सादर केलेले मागील बैठकीचे इतिवृत्त मंजूर झाले, फक्त एका परिच्छेदावर आक्षेप होता ते वगळण्यात आले. अशी माहिती जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी आमसभेनंतर दिली. निरीक्षक १५ जानेवारीपर्यंत न्यायालयास आमसभेचा अहवाल सादर करतील, असेही रोहन यांनी स्पष्ट केले.
‘‘संस्थगित असलेली वार्षिक आमसभा आज उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली. गोवा क्रिकेट असोसिएशनच्या इतिसाहासातील ही खूप महत्त्वाची बैठक होती. बहुतांश क्लबनी उपस्थिती लावली, यावरून गोवा क्रिकेट असोसिएशनशी संलग्न क्लबसाठी क्रिकेट प्राधान्यक्रमाने आहे हे सिद्ध होते. अंतर्गत भांडणे, बेबुनियाद विषयांना थारा नसल्याचे आमसभेत दिसून आले. त्याबद्दल आमसभेच्या सर्व सदस्यांचे आभार व अभिनंदन. न्यायालयाने नियुक्त केलेल्या निरीक्षकाचेही आम्ही आभार मानत आहोत,’’ असे रोहन यांनी नमूद केले.
‘‘महिला क्रिकेटपटूंनी केलेल्या आरोपासंदर्भात चौकशी अहवालाचा विषय सूचीत होता. चौकशी समिती सदस्याशी मी, अध्यक्ष व खजिनदार आदींनी चर्चा केली होती. आमसभेच्या सूचनेनुसार तो विषय आता व्यवस्थापकीय समितीकडे वर्ग होईल. सतावणुकीचा महिला खेळाडूंनी आरोप केला होता. चौकशी अहवाल आता व्यवस्थापकीय समिती बैठकीत खुला होईल. आरोप गंभीर नव्हते, ते फलंदाजी क्रमवारी, तसेच क्रिकेटविषयक होते, तरीही व्यवस्थापकीय समितीत त्यावर सखोल चर्चा होईलच. या प्रकरणी व्यवस्थापकीय समितीला जे योग्य वाटेल तसा निर्णय घ्यावा असे आसमभेने सांगितले आहे,’’ असे रोहन यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.