

पणजी: गोव्याच्या चिगुरुपती व्यंकट याने नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या विजेतेपदात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या यशामुळे त्याला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. मात्र, या यशामागे संधीची प्रतीक्षा, प्रशिक्षकांचे पाठबळ, कठोर मेहनत आणि स्वतःवरील विश्वास असल्याचे त्याने सांगितले.
‘‘संघात निवड झाली नव्हती, तेव्हा मी निराश झालो नव्हतो. मला संधी मिळेल, याचा विश्वास होता. प्रशिक्षकांनीही माझ्या क्षमतेवर विश्वास दाखविला. देशासाठी करंडक जिंकण्याची ही माझी अखेरची संधी होती. यापुढे १९ वर्षांखालील वयोगटातून मोठ्या स्पर्धेत खेळता येणार नसल्यामुळे मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे मी ठरविले होते,’’ असे १८ वर्षीय व्यंकट याने मंगळवारी ‘गोमन्तक’ला सांगितले.
अंतिम सामन्यातील आव्हानाबाबत बोलताना व्यंकट म्हणाला की, संघातील प्रत्येक खेळाडू चांगली कामगिरी करण्यास सक्षम होता. सर्वांनी धावा केल्या होत्या आणि अकराव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची ताकद होती. विजयासाठी ३० धावांची गरज असताना मी अखेरचा गडी म्हणून मैदानात उतरलो, तरी लक्ष्य गाठण्याचा विश्वास होता. पाकिस्तानवरही दबाव होता. त्यांच्या क्षेत्ररक्षणावर मर्यादा असल्यामुळे चौकार मारण्याच्या संधी अधिक होत्या. मात्र, त्यावेळी आपली विकेट सुरक्षित ठेवून सहकारी मोहित (उल्वा) याला साथ देणे यावर माझा भर होता. आशिया करंडक जिंकणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण आहे. या स्पर्धेतून दबाव हाताळण्याचा दृष्टिकोन समजला. प्रत्येकाच्या वाटेत वेगवेगळे अडथळे असतात आणि त्यांना सामोरे जाण्याची मानसिकता विकसित करणे महत्त्वाचे असल्याचेही शिकलो.
प्रशिक्षकाच्या त्रिसूत्रींचा झाला मोठा फायदा
गेल्या मोसमाने माझ्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. त्याच कामगिरीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावरील उच्च कामगिरी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्याची संधी मिळाली. तेथील उत्कृष्ट सुविधा आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. विशेषतः आत्मविश्वास आणि मानसिक कणखरतेवर भर देण्यात आला. भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक येरे गौडा यांचा ‘साधे राहा, आनंदी राहा आणि यशाची भूक कायम ठेवा’ हा मंत्र संघासाठी महत्त्वाचा ठरला. प्रत्येक बैठकीत ते या त्रिसूत्रीवर भर देत असत.
संघातील आर्यवीर (सेहवाग) आणि अन्वय (द्रविड) यांचाही खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन साधा आहे. महान क्रिकेटपटूंची मुले असूनही त्यांच्यात कोणताही गर्व नाही. अन्वय माझा रूममेट होता. त्याच्याकडूनही बरेच काही शिकायला मिळाले, असे व्यंकट याने नमूद केले.
गोव्यात क्रिकेट बहरले
आपल्या क्रिकेट प्रवासाबद्दल सांगताना व्यंकटने गोव्याशी असलेले नाते आणि गोवा क्रिकेट असोसिएशनच्या पाठिंब्याचा विशेष उल्लेख केला. त्याचा जन्म आजोळ असलेल्या आंध्र प्रदेशात झाला असला, तरी बालपण गोव्यातच गेले. सुरुवातीला म्हापसा येथे वास्तव्य होते. वडिलांच्या नोकरीमुळे कुटुंब मडगावला आले. त्यानंतर काही काळ ओमानमध्ये वास्तव्य होते. मात्र, गोवा आपल्यासाठी कधीच परका नव्हता. पालकांनी खेळाचा आनंद घेण्याचे स्वातंत्र्य दिले आणि कोणताही दबाव टाकला नाही. गोवा क्रिकेट असोसिएशनकडूनही आवश्यक सुविधा आणि संधी मिळाल्या. देशांतर्गत स्पर्धांपूर्वी मोसमपूर्व सराव सामने खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे स्पर्धेपूर्वी सूर गवसण्यास मदत होते. एसजी चेंडूने सराव करण्याचाही फायदा होतो.
सकारात्मक दृष्टिकोन
आपल्या भावी कारकिर्दीविषयी व्यंकट म्हणाला, की आता मिळालेली ओळख टिकविण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असून दबावाकडेही सकारात्मकतेने पाहतो. आगामी मोसमात १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक स्पर्धेवर माझे लक्ष केंद्रित असेल. या स्पर्धेत लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये सातत्य सिद्ध करण्याचे आव्हान असेल. पुढील १९ वर्षांखालील विश्वकरंडक खेळता येणार नसल्याची जाणीव असली, तरी भविष्यात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा उठविण्याचे ध्येय आहे. गोव्याकडून खेळताना शानदार कामगिरी करायची असून उच्च स्तरावर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न आहे. ‘वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघाच्या विजयाला प्राधान्य द्यायला हवे. संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्त्वाचे असते आणि एकमेकांचे यश साजरे करण्याची भावना असली पाहिजे,’ असा संदेशही व्यंकटने दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.