
पणजी: आगामी रणजी करंडक, तसेच सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० आणि विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळताना गोव्याच्या संघाला ‘दाक्षिणात्य’ आधार लाभणार असून त्यामुळे फलंदाजी भक्कम होण्याचे संकेत आहेत. संघातील नव्या ‘पाहुण्या’ क्रिकेटपटूची घोषणा गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) पुढील आठवड्यात करू शकते.
‘जीसीए’तील ज्येष्ठ सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या पाहुण्या क्रिकेटपटूने आगामी मोसमात गोव्यातर्फे खेळण्यासाठी तोंडी सहमती दर्शविली आहे, येत्या एक-दोन दिवसांत तो लेखी कळवेल. त्यानंतर त्याच्या उपलब्धीवर शिक्कामोर्तब होईल. एकंदरीत हा अनुभवी क्रिकेटपटू गोव्यातर्फे खेळणे जवळपास निश्चित आहे.
नवा ‘पाहुणा’ भारतातर्फे कसोटी क्रिकेट खेळलेला असल्यामुळे त्याच्या समावेशाने गोव्याच्या क्रिकेट संघाला बलाढ्य एलिट गटात खेळताना बळकटी प्राप्त होईल, असे जीसीएला वाटते. गोव्याकडून आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसम खेळू इच्छिणारा पाहुणा क्रिकेटपटू चिवट फलंदाजीसाठी ओळखला जातो.
पंधरा वर्षांच्या प्रदीर्घ प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत त्याने जवळपास पन्नासच्या सरासरीने साडेनऊ हजार धावा नोंदविल्या आहेत. अगोदरच्या राज्य क्रिकेट संघाचे या खेळाडूने नेतृत्व केलेले आहे, त्यामुळे गोव्याच्या कर्णधारपदाची जबाबदारीही त्याच्याकडे येऊ शकते.
गोव्याचा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एलिट ब गटात समावेश असून मोहिमेस १५ ऑक्टोबरपासून सुरू होईल. अनुक्रमे चंडीगड, कर्नाटक, पंजाब, मध्य प्रदेश, सौराष्ट्र, महाराष्ट्र, केरळ या संघांविरुद्ध त्यांचे सामने होतील. गतमोसमात (२०२४-२५) गोव्याचा संघ रणजी करंडक प्लेट विभागात खेळला होता. २०२३-२४ मोसमातील खराब कामगिरीमुळे त्यांची पदावनती झाली होती. गतमोसमात प्लेट विभागीय विजेतेपदासह गोव्याने २०२५-२६ मध्ये एलिट विभागासाठी पात्रता मिळविली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.