GCA: रोहन यांच्या BCCI फेरनियुक्तीस ‘खो’! संयुक्त सचिवपद राखणे अशक्य; जीसीए प्रतिनिधी नेमणूक मुदत हुकली

Rohan Gawas Desai: बैठकीनंतर पाचही सदस्यांनी रोहन यांना प्रतिनिधी म्हणून पाठविण्याच्या ठरावाची प्रत मागितली, त्यावेळेस विपुल व शंभा यांनी पाचही सदस्यांनी बैठकीच्या इतिवृत्तावर सही करावी यासाठी आग्रह धरला.
Rohan Gawas Desai
Rohan Gawas DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनमधील (जीसीए) अंतर्गत वाद आणि आगामी निवडणूक या पार्श्वभूमीवर रोहन गावस देसाई यांच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) संभाव्य संयुक्त सचिवपदाच्या फेरनियुक्तीस मोठा धक्का बसला.

शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत बीसीसीआय आमसभेसाठी जीसीए प्रतिनिधीचे नाव पाठविण्याची मुदत होती, ती टळून गेली आणि कोणाचेही नाव न पाठविल्यामुळे येत्या २८ सप्टेंबर रोजीच्या आमसभेत राज्य क्रिकेटचे प्रतिनिधित्व नसेल. या कारणास्तव रोहन यांना आता बीसीसीआय संयुक्त सचिवपद निवडणूक प्रक्रियेत अर्ज दाखल करणे अशक्य ठरले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या निर्देशानुसार, शुक्रवारी दुपारी दोन वाजता जीसीए व्यवस्थापकीय समिती बैठक झाली.

त्यावेळी संयुक्त सचिव रुपेश नाईक, खजिनदार दया पागी, सदस्य राजेश पाटणेकर, खेळाडू प्रतिनिधी सदस्य आदित्य आंगले व डेझी डिसोझा यांनी बीसीसीआय आमसभेसाठी रोहन गावस देसाई यांचे नाव जीसीए प्रतिनिधी म्हणून पाठविण्यासाठी ठराव मांडला व तो ५-२ मतफरकाने मंजूर झाला. त्यानंतर जीसीए सचिव शंभा नाईक देसाई यांनी जीसीए नियमाचा आधार घेत अध्यक्ष विपुल फडके यांचे नाव बीसीसीआय आमसभेसाठी सुचविले.

तसा ठराव झाला. या साऱ्या बाबी बैठकीच्या इतिवृत्तात नोंद झाल्या. बैठकीनंतर पाचही सदस्यांनी रोहन यांना प्रतिनिधी म्हणून पाठविण्याच्या ठरावाची प्रत मागितली, त्यावेळेस विपुल व शंभा यांनी पाचही सदस्यांनी बैठकीच्या इतिवृत्तावर सही करावी यासाठी आग्रह धरला. पाचही सदस्यांनी इतिवृत्तावर सही करण्यास नकार दिला, तो धागा पकडून विपुल व शंभा यांनी ठरावाची अध्यक्ष व सचिव या नात्याने हस्ताक्षरीत प्रत देण्यास नकार दिला. या गडबडीत शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत बीसीसीआयला प्रतिनिधी नेमणूक अर्ज पाठविण्याची वेळ टळून गेली.

‘‘पाचही सदस्यांनी रोहन गावस देसाई प्रतिनिधी नेमणूक ठरावाची प्रत देण्याची जीसीए मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे मागणी केली, परंतु त्यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा ठराव आम्ही बीसीसीआयला ठरलेल्या मुदतीत पाठवू शकलो नाही,’’ असे जीसीए संयुक्त सचिव रुपेश नाईक यांनी सांगितले.

बीसीसीआय पद अल्पकाळाचे!

रोहन गावस देसाई सध्या बीसीसीआय संयुक्त सचिव असून ते या पदावर या वर्षी एक मार्च रोजी बिनविरोध निवडून आले होते व २८ सप्टेंबरच्या निवडणुकीत त्यांची या पदावर फेरनिवड होणे निश्चित मानले जात होते. बीसीसीआय कार्यकारिणीत सूत्रे स्वीकारण्यापूर्वी रोहन हे जीसीएचे सचिव होते, या पदावर ते २०२२ मध्ये बिनविरोध निवडून आले होते. बीसीसीआय पदाधिकारी बनल्यापूर्वी त्यांनी जीसीए सचिवपदाचा राजीनामा दिला होता.

Rohan Gawas Desai
GCA Election: चेतन-बाळू गटाने रोहन यांना गाठले खिंडीत, 'GCA' निवडणुकीतून माघार न घेतल्‍यास 'BCCI'चे पद संकटात

दोन वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती

दोन वर्षांपूर्वी बीसीसीआय आमसभेसाठी जीसीए प्रतिनिधी या नात्याने अध्यक्ष विपुल फडके व तत्कालीन सचिव रोहन गावस देसाई गेले होते. तेव्हा एका संघटनेचा एकच प्रतिनिधी असू शकतो असे बीसीसीआयने सुनावल्यामुळे दोघांनाही आमसभेत प्रवेश मिळाला नव्हता आणि त्यामुळे तेव्हाच्या सर्वसाधारण सभेत गोव्याचे प्रतिनिधित्व नव्हते. आता तीच पुनरावृत्ती २८ सप्टेंबर रोजी होईल.

Rohan Gawas Desai
GCA Election: गोव्यातील क्रिकेटमध्ये ‘परिवर्तन’ की प्रस्थापित? देसाई-फडके एकत्र आल्याने उत्सुकता; रोहन देसाई गटाचे आव्हान

जीसीए निवडणुकीचे पडसाद

जीसीएची येत्या १६ सप्टेंबर रोजी व्यवस्थापकीय समिती निवडणूक होणार आहे. त्यात सहा जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात असून सचिवपद वगळता इतर पाच जागांसाठी माजी अध्यक्ष चेतन देसाई-विनोद फडके गट व रोहन गावस देसाई यांचे समर्थन असलेला ‘जीसीए परिवर्तन गट’ यांच्यात थेट (दुहेरी) लढत होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा ११ सप्टेंबर हा अखेरचा दिवस होता. रोहन यांचा पाठिंबा असलेल्या गटाने आपल्या गटासाठी निवडणुकीतून माघार घ्यावी अशी अपेक्षा चेतन-विनोद यांच्या गटाची होती, पण तसे घडले नाही. त्याचेच पडसाद शुक्रवारी बीसीसीआय आमसभा प्रतिनिधी प्रक्रियेत उमटल्याचे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com