GCA Election: चेतन-बाळू गटाने रोहन यांना गाठले खिंडीत, 'GCA' निवडणुकीतून माघार न घेतल्‍यास 'BCCI'चे पद संकटात

Rohan Gawas Desai: रोहन गावस देसाई गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रीय पदावर पुन्हा विराजमान होणे कठीण मानले जात आहे.
Rohan Gawas Desai
Rohan Gawas DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे रोहन गावस देसाई यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) संयुक्त सचिवपदी फेरनियुक्ती जवळपास निश्चित असली, तरी गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राष्ट्रीय पदावर पुन्हा विराजमान होणे कठीण मानले जात आहे.

चेतन देसाई-विनोद (बाळू) फडके गटाने त्‍यांना खिंडीत गाठण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. रोहन गावस देसाई यावर्षी मार्चमध्ये बीसीसीआय संयुक्त सचिवपदी बिनविरोध निवडून आले होते. जय शहा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष बनल्यानंतर तत्कालीन संयुक्त सचिव देवजीत सैकिया सचिव बनले आणि रिक्त सचिवपदी रोहन यांची निवड झाली.

त्यासाठी त्यांना जीसीए सचिवपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. नंतर जीसीए उपाध्यक्ष शंभा नाईक देसाई यांच्यावर राज्य संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

Rohan Gawas Desai
Goa Accident: तिळामळ येथे बसची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार जखमी; बसचालक फरार

जीसीए निवडणूक १६ सप्टेंबर रोजी नियोजित आहे, तर बीसीसीआय आमसभा व निवडणूक २८ सप्टेंबरला होणार आहे. बीसीसीआय निवडणुकीसाठी १२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येतील. रोहन यांना बीसीसीआय संयुक्त सचिवपदी अनुकूलता असली, तरी त्यांना बीसीसीआय आमसभेसाठी प्रतिनिधी या नात्याने ‘जीसीए’ने नियुक्त करणे आवश्यक आहे.

आता जीसीए निवडणुकीत चेतन देसाई-विनोद फडके या माजी अध्यक्षांचा गट एका बाजूने, तर दुसऱ्या बाजूने रोहन यांचा पाठिंबा असलेला गट आहे. जीसीए निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या कालावधीत मागे घेता येतील.

तर बीसीसीआय संयुक्तपद हुकणार

१. ‘जीसीए’ने रोहन गावस देसाई यांना प्रतिनिधित्व दिले नाही, तर हमखास असलेले बीसीसीआय संयुक्त सचिवपद त्यांना हुकणार, हे स्पष्ट आहे. ‘‘जीसीएने प्रतिनिधित्व दिले नाही, तर रोहन बीसीसीआयची निवडणूक लढवू शकणार नाहीत, हे सत्य आहेत. तसे घडले, तर ती गोमंतकीय क्रिकेटसाठी नामुष्की ठरेल. बीसीसीआयसारख्या मोठ्या संघटनेत गोव्याला प्रतिनिधित्व मिळणे भूषणावह आहे.

२. यापूर्वी प्रशांत जोशी आणि दयानंद नार्वेकर यांनाच बीसीसीआय उपाध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे,’ असे रोहन यांना समर्थन देणाऱ्या एका सदस्याने सांगितले. जीसीएने आडकाठी आणल्यास रोहन गोव्यातील क्रिकेटसाठी बीसीसीआयचे पद त्यागण्यास तयार आहेत; पण कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही, असे रोहन यांच्या गटातील एका प्रतिनिधीने नमूद केले.

Rohan Gawas Desai
Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

तडजोडीचा प्रयत्न विफल?

रोहन गावस देसाई हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अत्यंत विश्वासू असून कुडचडे मतदारसंघातून भविष्यात निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. चेतन देसाई-विनोद फडके गट व रोहन गट यांच्यात तडजोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले; पण ते विफल ठरल्याची माहिती सूत्राने दिली.

आपल्या बाजूने साठपेक्षा जास्त संलग्न क्लब आहेत. त्यामुळे आम्ही माघार घेणार नाही, असे चेतन देसाई-विनोद फडके गटाने ठासून सांगितल्याचे सूत्राने नमूद केले. जीसीए निवडणुकीत एकूण १०७ संलग्न क्लबना मतदानाचा हक्क आहे.

देसाई-फडके गटाची ‘खेळी’

जीसीए अध्यक्षपदी विनोद यांचे पुत्र विपुल फडके असून सचिवपदी चेतन यांचे समर्थक शंभा नाईक देसाई आहेत. जीसीए निवडणुकीत रोहन यांचा पाठिंबा असलेल्या गटाने माघार घेतली नाही तर बीसीसीआय आमसभेसाठी जीसीएचे प्रतिनिधित्व रोहन यांना दिले जाणार नाही, अशी भिती रोहन यांच्या समर्थकांना वाटते.

अध्यक्ष आणि सचिव ही दोन्ही महत्त्वाची पदे त्यांच्याकडे असल्याने रोहन यांची कोंडी झाली आहे. जीसीएचे प्रतिनिधित्व नसल्यास रोहन बीसीसीआय आमसभेत प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत, तसेच बीसीसीआय निवडणूकही लढवू शकणार नाहीत, अशी माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com