

पणजी: आशियातील सर्वांत जुनी १३५ वी ड्युरँड कप फुटबॉल स्पर्धा येत्या २५ जुलैपासून खेळली जाईल. सलग दुसऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत गोव्यातील एकही संघ नसेल.
स्पर्धेतील सामने कोलकता, रांची, गुवाहाटी, इंफाळ, शिलाँग या पाच शहरांत खेळले जातील.अंतिम सामना २३ ऑगस्ट रोजी कोलकता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळला जाईल. ड्युरँड कप सर्वाधिक १७ वेळा जिंकणारा मोहन बागान सुपर जायंट्स, १६ वेळा विजेतेपद पटकावलेला ईस्ट बंगाल हे स्पर्धेतील प्रमुख संघ आहेत.
गतवेळचा विजेता नॉर्थईस्ट युनायटेड संघही स्पर्धेत खेळणार आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेतील बहुतेक संघांनी २०२५-२६ मोसम संपल्यानंतर नव्या मोसमासाठी अजून संघबांधणी प्रक्रिया सुरू केलेली नाही. या कारणास्तव या आयएसएल बहुतांश संघ ड्युरँड कप स्पर्धेत नाहीत, त्यामध्ये एफसी गोवा संघाचाही समावेश आहे.
गतवर्षी झालेल्या १३४व्या ड्युरँड कप स्पर्धेतही गोव्यातील संघ खेळले नव्हते. आता सलग दुसऱ्या वर्षी या जुन्या फुटबॉल स्पर्धेत राज्यातील संघ नाहीत. एकंदरीत गोव्यातील विविध संघांनी मिळून आठ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
पाच वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना तीन वेळा विजेतेपद व दोन वेळा उपविजेतेपद मिळविणारा चर्चिल ब्रदर्स हा ड्युरँड कप स्पर्धेतील गोव्यातील यशस्वी संघ गणला जातो. साळगावकर एफसीने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली, तर धेंपो स्पोर्टस क्लब व एफसी गोवाने प्रत्येकी एक वेळ ड्युरँड कप गोव्यात आणला आहे. याशिवाय स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने एकवेळ उपविजेतेपद मिळविले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.