

पणजी: तडाखेबंद द्विशतक केलेल्या अभिमन्यू याच्यासह चंडीगडच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवत कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात संघाला १४९ धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. यजमान संघाला आता अनिर्णित निकालाचे वेध लागले असून त्यादृष्टीने शुक्रवारी अखेरचा दिवस महत्त्वाचा असेल.
गोव्याचा लेगस्पिनर शिवेन बोरकर याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना सहा गडी टिपले. वास्को येथील या फिरकी गोलंदाजाने एका टोकावरून टिच्चून मारा करताना यंदाच्या मोसमात प्रथमच डावात पाच गडी बाद करण्याची किमया साधली. त्याने ४०.३ षटकांत ११७ धावा मोजल्या.
पर्वरी येथील जीसीए मैदानावर एलिट ड गटातील सामना सुरू आहे. गोव्याच्या पहिल्या डावातील ३०८ धावांना उत्तर देताना चंडीगडने दुसऱ्या दिवसअखेरच्या ४ बाद २७० वरुन ४५७ धावांचा पर्वत रचला.
सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर गोव्याने दुसऱ्या डावात १ बाद १०६ धावा केल्या असून ते अजून ४३ धावांनी मागे आहेत.
गोव्याच्या दुसऱ्या डावात नाबाद अर्धशतक केलेला आदित्य कोटा ६० धावांवर खेळत असून त्याने १३४ चेंडूंतील खेळीत सात चौकार मारले, तर शंतनू नेवगी १० धावांवर नाबाद आहे. आदित्यने सार्थक भिके (३२) याच्यासमवेत ७८ धावांची सलामी दिली.
त्यापूर्वी, १२० धावांवरुन चंडीगडच्या अभिमन्यू याने धडाकेबाज फलंदाजी करत द्विशतक झळकावले. त्याने ३६२ चेंडूंतील मॅरेथॉन खेळीत २२० धावा करताना १५ चौकार लगावले, तसेच सहा उत्तुंग षटकारही खेचले. आदित्यने पार्थ सेन गुप्ता याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी १०२ धावांनी महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अभिमन्यूने आदित्य गुसैन याच्यासह पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची, तर गगनप्रीत सिंग याच्यासह सातव्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली.
गोवा, पहिला डाव ः ३०८
चंडीगड, पहिला डाव (४ बाद २७० वरुन) ः १२३.३ षटकांत सर्वबाद ४५७ (अभिमन्यू २२०, आदित्य गुसैन ३६, पार्थ सेन गुप्ता ३९, गगनप्रीत सिंग २६, चिगुरुपती व्यंकट १६-१-६४-१, सात्विक नाईक ९-१-३३-०, यश कसवणकर २७-२-१२२-१, मिहीर कुडाळकर २६-१-८४-२, शिवेन बोरकर ४०.३-५-११७-६, आराध्य गोयल ५-०-२१-०).
गोवा, दुसरा डाव ः ४४ षटकांत १ बाद १०६ (आदित्य कोटा नाबाद ६०, सार्थक भिके ३२, शंतनू नेवगी नाबाद १०, अंकन लटका १-१०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.