

पणजी: गोव्याकडून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा मोसम खेळण्यास सज्ज होताना अर्जुन तेंडुलकर याला दुखापतीचा फटका बसला, त्यामुळे तो २०२६-२७ मोसमातील पहिल्या सामन्यास मुकण्याचे स्पष्ट झाले.
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन २०२२-२३ पासून गोव्यातर्फे ‘पाहुणा’ क्रिकेटपटू या नात्याने खेळत आहे. गोव्याचा एलिट ‘अ’ गटातील पहिला चार दिवसीय सामना रविवारपासून (ता. ११) पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर बडोद्याविरुद्ध खेळला जाईल.
गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव तुळशीदास शेट्ये यांनी गुरुवारी सांगितले, की ‘‘अर्जुनच्या जुन्या दुखापतीने डोके वर काढले आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्यास मुकणार आहे. दुसऱ्या सामन्यातील त्याची उपलब्धता वैद्यकीय चाचणीनंतर ठरेल.’’ बडोद्याविरुद्धच्या लढतीनंतर गोव्याचा स्पर्धेतील दुसरा सामना १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत कानपूर येथे उत्तर प्रदेशविरुद्ध खेळला जाईल.
डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या २७ वर्षीय अर्जुनने चार मोसमात गोव्यातर्फे रणजी करंडक स्पर्धेतील २४ सामन्यांतून ५२ गडी बाद केले आहेत. एका शतकासह त्याने ६८५ धावाही केल्या आहेत. गतमोसमात (२०२५-२६) रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटात तो गोव्यातर्फे सातही सामन्यांत खेळला होता व त्याने १५ गडी बाद केले होते. गोव्याची संघ निवड शुक्रवारी जाहीर होणे अपेक्षित असून अर्जुनच्या जागी अन्य वेगवान गोलंदाजास संधी मिळेल.
एकच सराव सामना
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखालील गोव्याचा संघ मोसमपूर्व तयारीत ओमान, तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेतील स्पर्धेत, शिवाय महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने खेळला होता. ओमान दौऱ्यातून अर्जुनने माघार घेतली होती. कर्नाटकातील स्पर्धेतील एकाही सामन्यात तो खेळला नव्हता. महाराष्ट्राविरुद्धच्या मालिकेत तो दुसऱ्या सामन्यात खेळला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.