Durbhat: सफर गोव्याची! छ. संभाजी महाराज, पं. नेहरूंचा पदस्पर्श लाभेलेले, झुवारी नदीकाठी वसलेले 'दुर्भाट'

Durbhat Village Goa: दुर्भाट गावची वस्ती डोंगराच्या पायथ्याशी आहे.गावातील जास्त घरे डोंगराच्या उतारावर आहे. पूर्वेला बोरीच्या सिध्दनाथ पर्वताच्या कुशीतून उगवणारा सूर्य सुखावतो.
Durbhat Village Goa
Durbhat Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

झुवारी नदीकाठी वसलेला आमचा निसर्गरम्य ''दुर्भाट'' गाव.आमच्या दुर्भाट गावाला ऐतिहासिक महत्व आहे.जेव्हा फोंड्यातील मर्दनगडावरील मराठे आणि पोर्तुगीजांमध्ये लढाई चालली होती, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या तावडीतून सुटण्यासाठी काही पोर्तुगीज सैनिक दुर्भाटच्या दिशेने पळाले.त्यांचा पाठलाग करीत संभाजी महाराजांनी दुर्भाट बंदर गाठले व सर्व पोर्तुगीजांना यमसदनी पाठवले ही रोमांचकारी घटना दुर्भाटच्या इतिहासात नोंद झाली.

दुर्भाट गावची वस्ती डोंगराच्या पायथ्याशी आहे.गावातील जास्त घरे डोंगराच्या उतारावर आहे. पूर्वेला बोरीच्या सिध्दनाथ पर्वताच्या कुशीतून उगवणारा सूर्य सुखावतो. पश्चिमेला डोंगर, लहानपणी डोंगराच्या माथ्यावरून सभोवतालचा परिसर न्याहाळताना मन प्रसन्न व्हायचं.

तिथून बोरी गावचा पूल व सुंदर अशी झुवारी नदी दिसायची. उत्तरेला अंत्रुज महालाचे व्दार आणि दक्षिणेस सुंदर व लांबलचक जुवारी नदीचं पात्र. नदी असल्यामुळे गावात मत्स्यसंपदेची कमतरता नव्हती.

दळण-वळणासाठी ‘फेरीबोट’ जी दुर्भाट ते रासई (सासष्टी तालुक्याचा भाग) जोडते. त्यामुळे वेर्णा-मुरगाव जवळचे कामधंद्यासाठी रोज हजारांच्या संख्येने ये-जा करतात. दुर्भाट बंदराचा पोर्तुगीजांना व्यापारासाठी त्या काळात मोठा उपयोग होत असे.

आजही गावात त्यावेळची खोकेवजा दुकाने दृष्टीस पडतात. त्याच काळात धर्मांतर व हिंदूंवर अत्याचार शिगेला पोहोचला होता. सासष्टीच्या काही दैवतांचे स्थलांतर दुर्भाटच्या बंदरातून झालेले आहे, त्या घटनांचा एक पुरावा म्हणून बांदोड्यातील महालक्ष्मी मंदिर आवारात ‘सट्टो-फट्टो’ असे उल्लेखित शिलालेख आहेत.

श्री महालसा देवी (म्हार्दोळ) माझे कुलदैवत पूर्वी तिचे मूळ स्थान वरण्यपुरी (वेर्णा) आमचे पूर्वज नदी ओलांडून दुर्भाट येथे स्थायिक झाल्याचे कळते, ते म्हणजे रामपुरुष देवस्थान जे शेट कुटुंबीयांचा पुरीस(पुरुष) म्हणून ओळखला जातो.

ग्राम देवस्थानतील धार्मिक कृत्ये गावच्या जल्मीव्दारे केली जातात. सातेरी देवी, डोलयो, राम पुरुष अशी बरीचशी ग्राम दैवते आहेत. गुढीपाडव्यानंतर श्रीराम नवमी मोठ्या दिमाखात साजरी होते, कारण त्याच दिवशी सिध्दनाम (सिध्दारूढ जन्मोत्सव) असतो.

Durbhat Village Goa
Dhuler: सफर गोव्याची! म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचे, मातीचे ओढ लावणारे 'धुळेर'

मठात एका दिशेला श्री सातेरी देवी विराजमान आहे तिचा उत्सव म्हणून नवरात्री मठात होते. दिवाळीत नरकासुर वध जे पाहण्यासाठी गर्दी असते. शिमगोत्सवात गड्याची रात्र झाल्यानंतर, गावची होळी जणू तरुणाईचा उत्सव असतो.सुवारी वादनानंतर गावच्या हौशी कलाकारांतर्फे नाट्य प्रयोग होतात व धुलीवंदनाने शिमगोत्सवाची सांगता होते.

गोवा मुक्त झाल्यानंतर संपूर्ण गोमंतकातील एकमेव दुर्भाट गाव ज्या गावची बालवाडी/अंगणवाडीचे उद्‍घाटन करायला खुद्द तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आले होते.

Durbhat Village Goa
Vasco: सफर गोव्याची! पोर्तुगीज काळात व्यापाराचे प्रमुख केंद्र असलेले, गोव्यातील महत्त्वाचे बंदर 'वास्को'

गावचे वैभव म्हणजे शारदा इंग्लिश हायस्कूल त्याच बालवाडीचे रूपांतर झालेला शिक्षणाचा भलामोठा वृक्ष ज्याचे अध्यक्षपद केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भूषविले आहे. शारदा हायस्कूलने आतापर्यंत अनेक डाॅक्टर, वकील, अभियंते, शिक्षक , राजपत्रित अधिकारी निर्माण केले.

आजही दुर्भाट गाव आजुबाजूच्या गावचे प्रतिनिधित्व करतो. अगस्तीपुर,आडपई,कासवाडा,तळावली ह्या परिसरात काही कार्यक्रम,सण-उत्सव होतात तेव्हा प्रामुख्याने दुर्भाट नाव त्यांच्या गावाला जोडलं जातं.      आमची दुर्भाट गावची ग्रामसंस्था ‘सोशियादीद -सिविल-ई-पार्तीकुलर-दोस-पेस्कादोरस-दी-दुर्भाट’ आजही इतिहास प्रमाण देत आहे, जे पोर्तुगीज भाषेत गोव्याच्या सरकारी कार्यालयात नोंद आहे. दुर्भाट गाव सदोदित उंच शिखरावर यश मिळवत राहो.

दत्ता दिना शेट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com