

धुळेर हे नाव ऐकल्यानंतर मनात एक चित्र उभे राहते, की या गावात खूप धूळ असेल त्यामुळे या गावाला धुळेर हे नाव पडले असावे. मी गावात लग्न होऊन आल्यानंतर माझा हा भ्रम तुटला अन् या गावाचे, मातीचे त्या मातीतील लोकांविषयी मला आकर्षण वाटले.
धुळेर हा गाव म्हापसा आणि कुचेली या गावच्या सीमेवरचा छोटासा गाव, डोंगराच्या माथ्यावरून पूर्व-पश्चिम-दक्षिण-उत्तर पसरलेला हा गाव. या गावाकडे येताना - येणाऱ्याला कुठेतरी चढण-उत्तरण लागेल, हे नक्की. गच्च लोकवस्ती हे या गावाचे वैशिष्टय. एक मुख्य रस्ता या गावाचे दोन भाग करत शिवोलीला तसेच थिवी-पेडणेकडे पळून जातो. त्यामुळे या गावात राहाणाऱ्या लोकांना आपल्या पोटापाण्यासाठी इकडे तिकडे धावल्याशिवाय गत्यंतर नसते.
म्हापसाच्या या डोंगरावर मोठे कॉलेज अन् इंड्रस्ट्रीयल इस्टेट झाल्यानंतर आजूबाजूला जी लोकवस्ती निर्माण होत गेली, त्यामुळे धुळेर गाव वसले असेल असा माझा समज.
गावातून उत्तरेच्या बाजूला खाली उतरले तर आपण शिवोली गावच्या सीमेवर उतरतो. तेथे पूर्वी पाव-उंडे बनविणाऱ्या पदेरांची खूप वस्ती होती, असे काही वयस्क सांगत. हेच पदेर फार पूर्वी गावच्या लोकांची सकाळी न्याहरीची व्यवस्था करायचे, गाव-लोकवस्ती उंच डोंगरावर असल्याने वरून खाली येण्या-जाण्यासाठी लोकांनी फार पूर्वी लाल पायवाटा बनवलेल्या होत्या. त्या आता डांबराने काळ्या झाल्या आहेत.
या गावाचे नाव राखले ते आमच्या गावातील फुटबॉल-ग्राऊंडने. या ग्राउंडवर पूर्वी गोव्यातील अनेक फुटबॉलचे सामने होत. यावेळी धुळेर-म्हापसा रोडवर चक्का जाम होत असे. मुलांना घेऊन आम्हीही अनेकदा या ग्राऊंडवर जाऊन आलो आहे.
आता या ग्राऊंडवर पूर्वीसारखे माठे खेळ होत नाहीत, पण नवीन खेळाडूंना प्रशिक्षित करण्याचे काम चालू असते. या ग्राऊंडवर खेळणारे गावचे तरूण मात्र तंदुरुरत राहिले, हे नक्की.
गावचे दुसरे आकर्षण म्हणजे आमच्या गावची शेतकी खात्याची रोपवाटिका, अनेक झाडांचे हे इस्पितळच जणू. नारळी, काजू, आंब्याची, निरफणसाची लहानमोठी रोपटी येथूनच उत्तर गोव्यात लोक घेऊन जातात.आताही अनेक लोक आपल्या शेतात - नवीन जागेत नवी झाडे लावण्यासाठी याच रोपवाटिकेला भेट देतात.
आमचा गाव छोटासा असला तर अनेक इस्पितळांनी युक्त आहे. पूर्वी या गावाला - अथवा आजूबाजूच्या गावाला एकच इस्पितळावर अवलंबून रहावं लागे, अन् ते म्हणजे जुने आझिलो हॉस्पिटल. आतातर अनेक प्रकारच्या रोगांवर आधुनिक सोयी-सुविधांनी युक्त इस्पितळ आमच्या गावात- गावच्या सीमेवर स्थापन झालेले आहे.
पूर्वी धुळेर डोंगरावर पाण्याची विहीर नव्हती. गावचे लोक डांगी कॉलनीमधून खाली उतरून पाण्याचे घडे भरून वर चढण काढीत असत,असे वयस्क सांगतात. हे काही खोटं नाही, कारण आता जर धुळेरच्या या माथ्यावरच्या कॉलनीत नळानून पाणी नाही आले,तर गरजेसाठी अनेकजण स्कूटरवरून पाण्याचे धडे भरून आणताना आपण पाहिले आहे.
मात्र, या गावचे गुणगान गावेसे वाटते. ते याचसाठी की, सर्वजण आपापल्या घरात रहात असले तर कुठला उत्सव असो, सार्वजनिक कार्यक्रम असो, अथवा गोठणेश्वर देवाचा वर्धापनदिन असो. सगळेजण , एकत्र येऊन, हातात हात घालून कार्य करतात.
पूर्वी तर आमच्या घरात गणेशचतुर्थी, दिवाळीपूर्वी अथवा कोणाचा लग्नाचा कार्यक्रम असेल तर, आमच्या घरातील छोटी- मोठी आया-बया न बोलवता, घरी येऊन कार्यात मदत करीत असत. त्यावेळी त्यांचे बोलणे, वागणे अन् सहकार्यासाठी उत्सुकता बघतिल्यावर मला धन्यधन्य वाटले की आपण एक खरोखरच भाग्यवान. एक-सासू, सासरा अन् नवरा मिळाला त्याबरोबर माणूसकी अन् सद्भावना आपुलकीने चौकशी करणारी सोन्याच्या मातीची माणसं आपल्या धुळेर गावात भेटली.
युती रूपेश साखळकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.