

हिरवीगार शेती कुळागराने नटलेला, सांस्कृतिक वारसा लाभलेल्या शिरोड्याजवळच असलेला ‘तरवळे’ हा माझा जन्मगाव. तरवळे गाव आकाराने लहान असला तरी त्याची कीर्ती खूपच मोठी. गावांतील लोक मध्यमवर्गीय, साधे-सुधे, प्रेमळ, एकमेकांना जपणारे आणि एकोप्याने राहणारे. या गावांत कलेची श्रीमंती मात्र अफाट.
ह्या मातीत अनेक दिग्गज नाट्य कलाकारांनी जन्म घेतला. मास्टर काशिनाथ शिरोडकर, तुळशीदास लोटलीकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमी गाजवली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाबुराव पेंढारकर कंपनी तसेच हौशी संगीत नाट्यमंडळ फोंडा-गोवा या नाटक कंपनीमधून अनेक संगीत तसेच सामाजिक भूमिका रंगवून या कलाकारांनी सगळीकडे वाहवा मिळविली.
मत्स्यगंधा, सौभद्र, एकच प्याला अशा नाटकांतील बालगंधर्व स्त्री पात्र तर त्यांनी गाजवले. नाट्यकलाकार तुळशीदास लोटलीकर माझे काका. माझ्या कुटुंबातील बहुतेक सर्व मंडळी नाट्य कलाकार आहेत याचा मला अभिमान वाटतो.
लोकसंस्कृती टिकवून ठेवण्यासाठी गावांतील बांधवानी एकत्र येऊन तरवळे ग्रामस्थ सभामंडप बांधलेला आहे. ह्या मंडपात अनेक उत्सव साजरे होतात. कार्तिक महिन्यामध्ये गोवर्धन पूजा (धेंडलो) संपन्न होते.
तसेच कार्तिक एकादशीला २४ तासांचा सप्ताह येथे होतो. समई प्रज्वलित करून सप्ताहाची सुरुवात होते. भजन, आरत्या, प्रसाद व रात्री आठ वाजता पाराची मिरवणूक आणि दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून या सप्ताहाची समाप्ती होते.
ह्या मंडपाबाहेर एक जुनी मोठी तुळस आहे. कार्तिक द्वादशीला सर्व बांधव एकत्रित होऊन तिचे तुळशीविवाह लावतात. मार्गशीर्ष महिन्यात ग्रामस्थ मंडळाच्या मांडावर दिवजोत्सव होतो. तर माघ महिन्यात ह्याच मांडावर पाच दिवस धालोत्सव साजरा होतो.
फाल्गुन महिन्यात गावच्या सर्व देव-देवतांना नमन घालून नवमीपासून शिमगोत्सवाला सुरुवात होते आणि पौर्णिमेला धुलिवंदन झाल्यावर शिमग्याची सांगता होते. सतत सात-आठ दिवस गावांतील लोक सर्व देवळांत जाऊन ढोल ताशांच्या गजरात देवास नमन घालतात व गावांतील सर्व लोकांचे भले व्हावे याविषयी मागणे करतात.
फाल्गुन अमावस्येला तर बारा गांवचे बारा मेळाचे दुरीग आमच्या तरवळे गावांत करण्याचा मान आम्हा तरवळे ग्रामस्थ मंडळाला मिळाला आहे. शिमगोत्सवाच्या दिवसांत येथील मंडपात एकाचबरोबर पाच सत्यनारायण पूजा केल्या जातात. आणि विशेष म्हणजे गावांतील ११० कुटुंबे या पूजेचे अधिकारी असतात. दोन दिवस येथे नाटकांचा कार्यक्रमही होतो.गावांतील सर्व लोक ह्या नाटकांतील भूमिका वठवतात.
भाद्रपद महिन्यात गणेशचतुर्थीला इकडचा माहोल तर दृष्ट लागण्यासारखाच असतो. प्रत्येक घरांत गणपती पूजला जातो.
येथील आरती करण्याची पद्धत तर निराळीच. गावांत असलेल्या भूमिपुरुषाच्या देवळांत आरतीची सुरुवात करून नंतर सर्व घरांमध्ये आरतीपंगड जावून घुमट शामेळच्या गजरात आरत्या म्हणतात. शामेळ घुमटच्या नादात सर्व परिसर कसा तेजोमय होऊन जातो.
गणपती विसर्जनाच्या वेळी एकाच गाडीत सर्व गणपती बसवले जातात व रस्त्यावरून दिंडी काढत भजने म्हणत जयघोषांत जवळच असलेल्या पगरतळ्याच्या ओहोळात विसर्जन करतात. गावांत असलेले हे पगरतळे म्हणजे सर्वांची जीवनदायिनीच. ह्या तळ्याच्या पाण्याला काॅक्रीटचा बांध घातलेला आहे आणि त्या पाण्याचा वापर गावांत सगळीकडे केला जातो. लोकसंस्कृतीची परंपरा जपून ठेवलेला, कलेचा वारसा लाभलेला, निसर्गरम्य असा माझा ‘तरवळे’ गाव.
बबिता शेखर नार्वेकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.