

आयुष्यभर धनसंग्रहात बिलकुल रस नसलेल्या पंडितजींनी लोकसंग्रह मात्र अफाट केला होता. तेच त्यांचे कमावलेले धन होते. हा माणूसपिपासू माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊन ‘सावकार’ हे नाव सार्थ ठरवले.
बालपणापासूनच माझे अत्यंत आवडते असलेले गायकनट पं. प्रसाद सावकार निवर्तल्याला आज काही दिवस उलटले. गायनक्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबद्दल लिहायला माझी लेखणी थिटी पडेल, ही भीती मला त्यांच्यावर लेख लिहण्यापासून परावृत्त करत होती. परंतु माझे-त्यांचे नाते एका वेगळ्या आपुलकीने बांधले गेले होते, त्यामुळे त्यांच्याविषयी लिहिल्याशिवाय मनाला स्वस्थता लाभली नसती.
अगदी बालपणापासून माझ्या नाटकवेड्या आई-वडिलांसोबत कारवारला लागलेली सगळी नाटकं बघण्याची गोडी मला लागलेली. इयत्ता सातवीत असताना म्युनिसिपालिटीच्या आवारात झावळ्यांनी बांधलेल्या उघड्या नाट्यगृहामध्ये, रात्रीच्या वेळी कुणाकुणाच्या सोबतीने सलग तीन दिवस मी ‘मंदारमाला’ चे प्रयोग पाहण्याचा विक्रम केला होता.
तो केवळ पंडितजींच्या गाण्यांच्या हव्यासाने मंदारमाला पाहून भारावून गेलेल्या आणि दुसऱ्या दिवशीही त्या गाण्यांची नशा न उतरलेल्या इवल्याशा मला. शाळेत शिक्षकांकडून मिळालेल्या धारदार शब्दांचा मुका मार मिळाल्याची कथा मी पंडितजींना पहिल्या भेटीतच कथन केली. तेव्हा त्यांच्या डोळ्यांत ‘त्या इवल्याशा’ पोरीच्या गायनप्रेमाविषयीचे त्यांच्या डोळ्यांत प्रतिबिंबित झालेले कौतुक आणि सोबतच उडालेला हास्याचा फवारा आजही माझ्या कानात-डोळ्यांत भरून आहे.
मात्र त्यावेळी शालिनीताईंनी माझ्यावर टाकलेला (कडक) नजर कटाक्ष माझ्या नजरेतून सुटला नव्हता. बालपणात त्यांची भेट होण्याची आंतरिक प्रबळ इच्छा, मी विवाहानंतर गोव्यात आल्यानंतर पूर्ण झाली, ती पर्वरीला मराठी भवन च्या उद्घाटन समारंभात तिथे सावकार दांपत्याची अकल्पित भेट झाली.
त्यानंतर नाट्यक्षेत्रातील प्रतिष्ठित असा ‘विष्णुदास भावे’ पुरस्काराने ते सन्मानित झाल्याचे कळले आणि पणजी आकाशवाणी केंद्रावर जाऊन त्यांची मुलाखत घेण्याचे भाग्य मला लाभले. ती मुलाखत आमच्या वरवरचा परिचय, गाढ होण्यास कारणीभूत ठरली. या पुनर्भेटीचे परिवर्तन पुढे आदरयुक्त स्नेहात झाले. १४ डिसेंबरला येणाऱ्या त्यांच्या जन्मदिवसाला दरवर्षी न विसरता शुभेच्छा देण्यासाठी आणि अधूनमधून त्यांची ख्यालीखुशाली जाणून घेण्यासाठी माझा फोन त्यांना जात असे.
तेव्हा प्रत्येकवेळी या की एकदा घरी, गप्पा मारू हा त्यांच्या आवर्जून बोलावण्याचा मान राखण्यासाठी, दोन-चारवेळाच त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. गप्पीष्ट, मनमोकळ्या आणि अत्यंत साध्या वृत्तीमुळे ते भरभरून बोलत असत. त्यात नाटकवाल्यांचे किस्सेच अधिक असत. हसत हसत बोलण्याची त्यांची ती ढब आणि मिश्कील कथनशैली यामुळे त्यांच्याकडून पाय बाहेर काढणे जड होई. लौकिक मिळवलेला एवढा मोठा माणूस, परंतु लहान-मोठा हा भेदच त्यांना स्पर्शिला नव्हता.
म्हणून सर्वांना समान त्यामुळे वरिष्ठ-कनिष्ठ, उच्चस्तरीय-निम्नस्तरीय सर्वांना त्यांच्याकडून समान वागणूक मिळे. नाट्यक्षेत्रात प्रचंड कीर्ती मिळवूनही अत्यंत साधे वागणे हा त्यांचा स्थायीभाव होता. आता हेच पहा ना, आपल्या स्कुटीवर आरूढ होऊन हा सुप्रसिद्ध नट मासे गरायला मांडवी तीरावर रोज पहाटे जाई, तो छंदच होता त्यांचा.
एवढी सारी वर्षे त्यांच्या वाढदिवसाला फोनवरून शुभेच्छा देणाऱ्या मला, परवाच्या १४ डिसेंबरला त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रत्यक्षात शुभेच्छा देण्याचा तो ईश्वरी संकेत तर नसावा? कारण तो त्यांचा ९८ वा वाढदिवस शेवटचाच ठरला. मला तिथे जाण्याची इच्छा झाली, मी गेले, आणि खाटेवर पडल्या पडल्याच स्वतःहूनच नाट्यगीत गायला सुरुवात केली. हे त्यांचे वागणे मनात कुठेतरी काहूर माजवून गेले त्यावेळी!
आयुष्यभर धनसंग्रहात बिलकुल रस नसलेल्या पंडितजींनी लोकसंग्रह मात्र अफाट केला होता. तेच त्यांचे कमावलेले धन होते. हा माणूसपिपासू माणूस खऱ्या अर्थाने श्रीमंत होऊन ‘सावकार’ हे नाव सार्थ ठरवले. सर्वांसाठी घराण्याचा सांगीतिक ‘प्रसाद’ आपल्यासाठी मागे ठेवून ते स्वर्गलोकी निघून गेले आणि गायनी सावकार पर्व अस्तास गेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.