
Tragic Death of Ex-DYSP & Former MLA Lavoo Mamledar in Belgaum
जगातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू! पशू-पक्षी, तरू-वेली आणि मनुष्य यांचा अंत हा ठरलेला असतो. प्रत्येकाची जीवनमर्यादा ठरलेली असते. काही आधी तर काही नंतर या जगाचा निरोप घेतात. या ब्रह्मांडात अनेक ग्रह आणि उपग्रह आहेत परंतु पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे ज्याच्यावर जीवसृष्टी आहे. अन्य कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे किंवा नाही याचा शोध अद्याप तरी लागलेला नाही.
साहित्य क्षेत्रात मृत्यूवर अनेक साहित्यकृती निर्माण झाल्या आहेत. आंग्ल कवी John Donne आपल्या एका कवितेत Death Be Not Proud म्हणतो आणि मृत्यूला आव्हान देतो, मृत्यूला कमी लेखतो. आपल्या ऋषिमुनींनी संस्कृत भाषेत "ओम असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय | मृत्योर्मा अमृतम् गमय ॥"असे म्हणून मृत्यूचे जणू स्वागतच केले आहे. हिंदू समाजात पूर्वापार अशी धारणा आहे की, मरावे तर काशीत नाहीतर गावच्या वेशीत! याची कारणे धार्मिक भावनेशी निगडीत असतील किंवा व्यावहारिक, परंतु प्रत्येकाला वाटते की आपला मृत्यू पवित्र ठिकाणी व्हावा नाहीतर निदान आपल्या घरी, जिथे आपले निकटवर्ती आपल्या अवतीभवती असतील. या जगाचा निरोप घेताना त्यांना आपण डोळे भरून पाहू. आपली शेवटची इच्छा त्यांच्या कानी घालू आणि समाधानाने या जगाचा निरोप घेऊ. मात्र अनेकदा असे घडत नाही. प्रापंचिक कारणाने माणूस मूळ घरापासून, आपल्या गावापासून दूर जातो. निकटवर्ती माणसे दूर राहतात आणि एखाद्याला एकाकी मरण येते. अशावेळी आप्तेष्टांच्या मनाला चुटपुट लागते. काहीवेळा आज पाहिलेला, भेटलेला माणूस दुसऱ्या दिवशी भेटेलच याची शाश्वती नाही. मानवी जीवन बेभरवशाचे आणि क्षणभंगुर असते.
अचानक मृत्यू येणे किंवा झोपलेल्या जागी शांतपणे मृत्यू येणे ही माझ्या दृष्टीने सर्वांत उत्तम गोष्ट होय. कारण अंथरुणात पडून अनेक रोगांशी झुंज देत किंवा इस्पितळातील रुग्णशय्येवर मृत्यू येणे ही क्लेशकारक गोष्ट आहे. रोग्यासह इतर अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. एखाद्याला दीर्घ काळ अंथरुणात खिळून राहावे लागले की तो परावलंबी होतो. त्याची सेवा शुश्रूषा करता करता जवळचे नातेवाईक कंटाळतात आणि कधी एकदा ही ब्याद जाते याची उत्कंठा त्यांना लागते. हा मनुष्यस्वभाव आहे.
मृत्यू हे कटू सत्य असले तरी काही व्यक्तींचे मृत्यू मनाला चटका लावून जातात. मृत्यू कोणाला, कसा आणि कुठे येईल याचे भाकीत आजपर्यंत कुणालाच करता आलेले नाही. अशीच एक घटना मागील शनिवारी घडली. गोव्याचे निस्पृह आणि निष्कलंक चारित्र्य असलेले माजी पोलीस उपअधीक्षक तथा माजी आमदार लवू मामलेदार यांच्या बाबतीत घडली आणि मनाला चटका लावून गेली. आपल्या काही कामानिमित्त ते बेळगावी गेले होते. तिथे त्यांची गाडी दुसऱ्या एका वाहनाला जराशी घासली गेली. बेळगावी हे शहर व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) तळकोकण आणि गोवा यांची ती आवडीची बाजारपेठ. कोणताही धार्मिक सण समारंभ असला की त्यासाठीची खरेदी बेळगावी करायची हा जणू अलिखित स्थायिभाव इथल्या भागातील लोकांचा झालेला आहे. याचे कारण तिथे मिळणारी वस्त्रप्रावरणे, भेटवस्तू यांची विपुलता आणि घाऊक बाजारभाव सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असा असतो. यामुळे येथील बाजार पेठेत नेहमीच वर्दळ असते. तिथले दुचाकी चालक आणि रिक्षावाले बिनदिक्कत आपले वाहन पळवत असतात. थोडी जरी जागा मिळाली तरी आपले वाहन पुढे घुसवतात. अशावेळी नवख्या माणसाला आपले वाहन चालवणे कठीण होऊन बसते.
कै. लवू मामलेदार (Lavoo Mamledar) यांचे वाहन दुसऱ्या वाहनाला अशाच प्रकारे घासले गेले असेल. परराज्यातील वाहन म्हटले की स्थानिक वाहन चालकांना कोणती खुमखुमी येते कुणास ठाऊक! आपल्या चुकीने जरी अपघात झाला असला तरी दोष परराज्यातील वाहनचालकांना दिला जातो आणि स्थानिक लोक त्याचीच बाजू उचलून धरतात. मामलेदार यांची गाडी अशाच गर्दीच्या ठिकाणी दुसऱ्या वाहनाला घासली गेली आणि त्या गाडीचा चालक हमरीतुमरीवर उतरला. वास्तविक त्या गाडीचे मोठेसे नुकसान झाले नव्हते असे कळते. अगदी किरकोळ नुकसान झाले होते आणि त्याची भरपाई सहज करून देता आली असती. परंतु तो वाहनचालक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. म्हणून मामलेदार यांनी त्याच्याशी हुज्जत घालण्याऐवजी पोलीस स्थानकात तक्रार करण्याची त्याला सूचना केली आणि ते आपल्या नेहमीच्या हॉटेलमध्ये परतले. हा वाहन चालक त्यांचा पाठलाग करीत त्यांच्या हॉटेलपर्यंत पोहोचला आणि ते हॉटेलच्या पायऱ्या चढत असताना त्यांच्यावर हल्ला केला आणि त्या अनपेक्षित हल्ल्यामुळे ते खाली कोसळले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली !
एक शिस्तबद्ध पोलीस अधिकाऱ्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाला. ना गावच्या वेशीत ना पवित्र तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या काशीत! मृत्यूचा काळवेळ, मृत्यूचे कारण आणि मृत्यूचे ठिकाण कुणाला सांगता येत नाही. कविवर्य ग. दि. माडगूळकर ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या गीतातल चौथ्या कडव्याच्या शेवटी ‘मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा’, असे म्हणतात तेच खरे! एक सुस्वभावी, कर्तव्यदक्ष, निष्कलंक चारित्र्य आणि स्पष्टवक्तेपणा हाच ज्यांचा स्थायिभाव होता अशा एका प्रामाणिक व्यक्तीला अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू आला याचे शल्य अनेकांच्या मनाला दीर्घ काळ टोचत राहील. ज्याच्या आततायीपणाने हे घडले आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी एवढीच अपेक्षा! ईश्वराने लवू मामलेदार यांच्या आत्म्यास चिरशांती द्यावी अशी प्रार्थना!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.