juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Tiswadi juva Village Goa: तिसवाडीतील तीस गावांपैकी एक ‘जुवा’ हे माझे गाव, एक सुंदर बेट. चारही बाजूने नदी आणि मध्ये हा वसलेला गाव. एक बेट असल्याने ह्या गावाला नाव पडले जुवे.
Tiswadi juva Village Goa
Tiswadi juva Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडीतील तीस गावांपैकी एक ‘जुवा’ हे माझे गाव, एक सुंदर बेट. चारही बाजूने नदी आणि मध्ये हा वसलेला गाव. एक बेट असल्याने ह्या गावाला नाव पडले जुवे. गोव्यात तशी दोन तीन गावे आहेत, त्यांना जुवे नाव आहे पण आमचे हे जुवे गाव ‘शाखेचे जुवें’ म्हणून ओळखले जायचे. कारण येथे पूर्वी भाजीची पिके खूप होत अन् गावची भेंडी खूप प्रसिद्ध होती.

याच भेंडीला जीआय टॅग मानांकन मिळाले होते. येथील लोकांनाही पूर्वी ‘सात शिरांचो भेणो’ म्हणून हिणवले जायचे. तसा हा आमचा गाव जुवा म्हणूनच ओळखायचे, कारण सरकार दप्तरी हा गाव जुवा म्हणूनच नोंद आहे. पण नंतर हे नाव बदलण्यात आले आणि ‘सांत ईस्तेव्ह’ ठेवण्यात आले. आता हे गाव सांत ईस्तेव्ह म्हणून ओळखतात. पण जास्ती लोक त्याला जुवेंच म्हणतात.

तर हा गाव चारी बाजूने नदीने वेढलेला आहे आणि तो दुसऱ्या गावाला जोडलेला आहे, तो फक्त एका लहानशा पुलाने जो पन्नास वर्षांपूर्वी बांधलेला होता. या पुलाची बांधणी आम्ही प्रत्यक्ष पाहिली होती. या पुलाच्या बांधकामाला त्या वेळी खूप विरोध झाला होता, कारण काय तर बाहेरचे लोक इथे येऊन चोऱ्यामाऱ्या करतील वगैरे वगैरे या भयाने. पण मग कळलं की हा पूल किती गरजेचा होता. आमच्या गावांत दोन तीन मंदिरे आणि दोन चर्चेस आहेत.

शिगम्याची तीन नाटकं एका देवळांत पूर्वीपासून चालू होती ती आजतागायत चालू आहेत. ही नाटकं त्यावेळी एवढी प्रसिद्ध होती की, फोंडा तालुक्यातील असंख्य नाट्यप्रेमी ही नाटकं बघायला यायचे. त्याशिवाय इथं दत्तजयंती, लक्ष्मी पूजन हे उत्सवही धुमधडाक्यात साजरे होतात. सांत ईस्तेव्ह ह्या संताचे फेस्त नाताळच्या दुसऱ्या दिवशी साजरे करतात आणि तिसऱ्या दिवशी आणखी एक फेस्त साजरे करतात.

Tiswadi juva Village Goa
Cuncolim: सफर गोव्याची! गोवा मुक्ती लढ्याची‌ ठिणगी पडलेले, 12 बांधाच्या पाण्याने समृद्ध असलेले 'कुंकळ्ळी'

आमच्या गावाला लाभलेली एक लहानशी टेकडी आहे आणि या टेकडीच्या सभोवताली आमचा गाव वसलेला आहे. या टेकडीवर एक लहानसा किल्ला आणि चर्च आहे. कुणी म्हणतात हा किल्ला छत्रपती संभाजी राजेंनी बांधलेला होता आणि काही लोक म्हणतात तो पोर्तुगीजांनी बांधला आणि तो काबीज करण्यासाठी संभाजीराजे डिचोलीमार्गे जुव्याला यायचे होते, पण ते मध्येच अडकून पडले.

Tiswadi juva Village Goa
Nerul: सफर गोव्याची! 400 वर्षांपूर्वी दैवत हलवून मांद्रे येथे सुरक्षितपणे स्थलांतरित करण्यात आले; भक्तीरसातले 'नेरुळ'

या टेकडीवरून पणजीसुध्दा बघता येते. आमच्या गावात पूर्वी देव रवळनाथाचे देऊळ होते. पोर्तुगीजांनी केलेल्या बाटाबाटीच्या वेळी नदीच्या पलीकडे फोंडा तालुक्यातील कुरडुव गावांत हलवण्यात आले आणि तेथे पण विविध उत्सव साजरे होतात. आमच्या गावात खूप नामवंत संगीत तसेच नाट्य कलाकार होऊन गेले आणि आताची पिढी पण संगीत क्षेत्रात राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवत आहे. असा हा आमचा ‘जुवा’ गाव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com