अग्रलेख; गोड बोलणारे नेहमीच विश्वासार्ह नसतात; अभिनय करणाऱ्या नाटकी लोकांकडून काय अपेक्षा ठेवावी?

Sweet talk manipulation: काही लोक इतके गोड बोलतात की दुसऱ्याची साखर वाढावी. आपलं काम साध्य करण्यासाठी. नंतर ते धन्यवाद देत नाहीत.
Sweet talk manipulation
Sweet talk manipulationDainik Gomantak
Published on
Updated on

काही लोक इतके गोड बोलतात की दुसऱ्याची साखर वाढावी. आपलं काम साध्य करण्यासाठी. नंतर ते धन्यवाद देत नाहीत. काम झाल्यावर कळवत नाहीत. मेसेजसुद्धा वाचत नाहीत. त्यांना तात्काळ स्मृतिभ्रंश होतो. आपण फसवलो गेलो ही स्वाभिमान दुखवणारी वेदना त्रासदायक, तापदायक, अपमानास्पद असते. दक्ष राहावं.

जीवनाच्या विविध वळणांवर, वळशांवर अनेक लोक भेटतात- नात्यातील, समाजातील, नोकरी-व्यवसायातील. कव्हर पाहून पुस्तक कसं आहे हे ठरवणं न्याय्य नसतं. बाहेरून साळसूद आत बदमाश अशा लोकांचे ज्वलंत, जिवंत अनुभव शिकवून जातात. काही लोक जात्याच गोड वाणीचे असतात. त्यांना तुमच्याकडून आवळा देऊन कोहळा काढायचा नसतो. त्यांचं प्रेम कृत्रिम नसतं.

बनेल लोक तुम्हांला गोड गोड बोलून वाटाण्याच्या झाडावर चढवतात. नंतर खालची शिडी काढतात. तुम्ही मरा, उरा त्यांना बिलकूल खंत, फिकीर, संवेदनशीलता नसते. वाजवीपेक्षा जास्त कौतुक ऐकल्यावर सरळ संदेह बाळगावा, की हे प्रकरण आपल्या काही तरी कामासाठी तुमच्याकडे आलं आहे. त्याच्यासारखंच गोड बोलून त्याला टाळावं, वाट दाखवावी. नपेक्षा आपली अक्कलहुशारी फार उच्च, असं त्यांना वाटू लागतं. खोटारडेपणाची चटक वाढते.

मला एकदा मेसेज आला. ना मित्र, पण ज्ञात मनुष्य. यार, तुझा लेख फारच छान, उत्तम वगैरे. त्या क्षणी संशय येण्यास काही कारण नव्हतं. दहा दिवसांनी आणखीन एक स्तुतीवजा मेसेज - तुझं लेखन असं, तसं. स्तुतीनं हुरळून जावं असं हे वयच नव्हे. या मिडियोकरांना वाटतं, आपण हुशार, इतर ‘ढ’, आपण यांना चकवलं. थोड्या दिवसांनी त्यानं गोड बोलत एक काम सांगितलं. तत्क्षणी धूर्त कावेबाजाचा कौतुकामागील कुटील हेतू मी ताडला. काम केलं. अनुवादाचं होतं. झालं. त्या मनुष्याने आपणहून माझ्या मनातून कायमची एक्झीट घेतली. तसा तो रुतून वगैरे बसला नव्हताच.

लबाड लोक गोड पाकासारखं बोलून आपलं स्वार्थी ईप्सित साध्य करून घेतात. त्यांच्या चेहऱ्याकडे व डोळ्यांकडे जवळून भेदक नजरेने पाहा. अपराधी भाव दाट स्तर-स्वरूपात दिसतात.

Sweet talk manipulation
Goa Tiger Reserve Controversy: केंद्रीय सक्षम समितीचा 'तो' अहवाल दबाव तंत्राखालीच! व्याघ्र क्षेत्राविषयी पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांचा दावा

या बनावट लोकांच्या वल्गना मोठमोठ्या. लोकांना आपण मूर्ख केले या आनंदात हे मूर्खांच्या नंदनवनात विहरतात. सज्जनांनी सत् मार्गानेच चालावे पण अशा लोकांना वठणीवर आणावे. जे आपणाला गृहीत धरतात त्यांना धडा शिकवावा. आपण त्यांच्या सापळ्यात अडकू नये.

सभोवताली कणभर माहिती असलेले लोक आपल्याला मणभर किंवा टनभर ज्ञान असल्याची शेखी मिरवतात. पाठीवर बॅकपॅक घेऊन फिरावे तसे हे लोक आभासी आत्मविश्वासाची ही पोटली घेऊन फिरत असतात. ते भ्रमाच्या तंद्रीत बोलतच असतात. ऐकत नाहीत. भांडं उथळ असलं की त्याचा आवाज खूपच मोठा कर्कश होतो. दरम्यान, समाजात व्यवस्था, यंत्रणा असतात त्यात गढूळपणा आणण्यास (वाढवण्यास) यांचा हातभार लागतो.

या अशा वर्तनाचं कारण शोधण्याचं कार्य मानसशास्त्रात चालू होतं. या वृत्तीला ‘डनिंग-क्रुगर इफेक्ट’ हे नांव दिलं गेलं. विशिष्ट क्षेत्रात कमी क्षमता असलेले लोक त्यांच्या स्वतःच्या क्षमतेचा अतिरेक करतात कारण त्यांच्याकडे त्यांच्या उणिवा, सुमारपणा ओळखण्याचं भान नसतं. याउलट, अत्यंत सक्षम व्यक्ती आपल्या क्षमतांना कमी लेखतात. क्रुगर परिणामाच्या अभ्यासात अनेक निष्कर्ष आहेत, त्यावर दगलबाजी करणाऱ्यांसहित अन्य संशोधन चालू आहे.

एक ओळखीचा कलाकार माझ्याकडे आला. भाई, भाई बोलत त्यानं गुलाबपाण्याचा शिडकावा केला. त्याला एक नाट्यसंहिता कोकणीतून इंग्रजीत अनुवादित करून हवी होती. चार पाच दिवसांच्या मुदतीत ती पूर्ण करावयाची होती. माझी इतर कामे चालू होती. त्याचं त्याला पडून गेलेलं नव्हतं. तो मागेच लागला. तुम्हीच करू शकता वगैरे वगैरे. जागरणं मारून केलं एकदाचं. ई मेल केल्यावर सहज म्हणतो, भाई तो प्रकल्प राहिला. ताबडतोब माझे अमुक पैसे घेऊन उद्या ये. प्रकल्पाला आग लागो, तो माझा विषय नव्हे. मी आदेश दिला. आला, पैसे देऊन गेला. माझ्या जीवनाचा मूल्यवान वेळ थापाड्यांनी गृहीत धरून फुकट घालवलेला मला आवडत नाही.

एका गावात गवळी रोज जंगलात जाऊन जनावरांना चारायचा. एक दिवस त्याला झाडाखाली जखमी साप सापडला. साप गोड बोलून गवळ्याला विनंती करू लागला, माझे प्राण वाचवशील का? मी तुला काहीही त्रास देणार नाही. गवळ्याला दया आली. त्याने सापाला उचलून घरी नेलं, औषध दिलं आणि बरे केलं.

साप बरा झाल्यावरही गवळ्याच्या घरातच राहू लागला. एक दिवस गवळ्याच्या मुलाने सापाला खेळायला घेतलं. सापाने त्याला दंश केला. गवळी धावत आला आणि रागाने विचारलं, तू असं का केलंस? साप म्हणाला, मी साप आहे. माझं विषारी असणं हाच माझा स्वभावधर्म आहे.

तात्पर्य: गोड बोलणं हे नेहमी विश्वासार्ह नसतं. स्वभाव कधीही लपवता येत नाही. आपला वेळ, ऊर्जा राखण्यासाठी अति सावध राहणं गरजेचं आहे.

अभिनय करणाऱ्या नाटकी लोकांचा स्वभावधर्म हा गोड बोलून नागवणूक करायचा असतो. त्यांच्याकडून करुणा, प्रेम, स्नेह, दया यांची अपेक्षाच नसते. लोक त्यांना भुलतात, वाकतात, फसतात व त्यांना आयतं मिळवून जगण्याची सवय होते. ऑनलाइन फसवणुकीची प्रकरणे चालूच आहेत.

काही लोक इतके गोड बोलतात की दुसऱ्याची साखर वाढावी. आपलं काम साध्य करण्यासाठी. नंतर ते धन्यवाद देत नाहीत. काम झाल्यावर कळवत नाहीत. मेसेजसुद्धा वाचत नाहीत. त्यांना तात्काळ स्मृतिभ्रंश होतो. आपण फसवलो गेलो ही स्वाभिमान दुखवणारी वेदना त्रासदायक, तापदायक, अपमानास्पद असते. दक्ष राहावं.

एकदा जंगलात एक कावळा झाडावर बसला होता. त्याच्या मुठीत एक चविष्ट पनिराचा तुकडा होता. तेवढ्यात एक ससा त्याच्याकडे आला, गोड आवाजात म्हणाला, ‘कावळा भाऊ, तुझा पनीर मला दाखवशील का? मी तुझा मित्र आहे, मी तुझ्यासाठी फळांचा रस आणीन.’ कावळा सशाच्या गोड संवादांना भुलला. त्याने पनिराचा तुकडा सशाकडे दिला. त्याने तो खाऊन टाकला आणि पसार झाला. कावळा रडू लागला, इतक्यात एक बुद्धिमान घुबड आलं आणि म्हणालं, ‘गोड बोलून फसवणारे नेहमीच कायम आपला खाऊ, वेळ चोरतात. तू सावध राहा.’ तेव्हापासून कावळा कोणाच्याही गोड शब्दांना सहजासहजी भुलत नाही, असं म्हणतात.

Sweet talk manipulation
Goa Tourism: क्रूझ पर्यटन हंगामाला सुरुवात, पहिले जहाज दाखल; 2 हजार पर्यटकांनी घेतले गोवा दर्शन

गोड बोलून मस्का, लोणी लावून आपणाला कुणी फसवायचा प्रयत्न केला तर जाळ्यात पडू नये. झंझट मागे लागल्यास झापावं, झाडावं. आपण कधीही कुणाला फसवू नये. कधीही फसवून घेऊ नये. गुड लक.

मुकेश थळी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com