Shubhanshu Shukla
Shubhanshu ShuklaDainik Gomantak

Opinion: गाजराचा हलवा ते आमरस; भारतीय पदार्थांनी गाठले अंतराळ! शुभांशूंच्या प्रयत्नांना यश

Shubhanshu Shukla: भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात नवीन अध्याय लिहिला जात आहे. या पर्वाचे नायक आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला.
Published on

भारतीय अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात नवीन अध्याय लिहिला जात आहे. या पर्वाचे नायक आहेत ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था `नासा`च्या संयुक्त प्रयत्नांतून सुरू झालेल्या ‘ऑक्झिअम चार’ या खासगी व बहुराष्ट्रीय मोहिमेअंतर्गत, शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचले. त्यांच्यासोबत अमेरिका, पोलंड, हंगेरी या देशांचे अवकाशवीरही आहेत. या मोहिमेचे नेतृत्व अमेरिकेच्या अनुभवी अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्याकडे आहे. त्यांना ६७५ दिवस अंतराळात वास्तव्याचा आणि दहा स्पेसवॉकचा अनुभव आहे.

पोलंडचा स्लावोश उझनानस्की विस्नेईवस्की हा जीनिव्हातील लार्ज हॅड्रॉन कोलायडरप्रकल्पात अभियंता आहे, तर हंगेरीचा अभियंता व अंतराळातील विकिरणांवर संशोधन करणारा तिबोर कापूही मोहिमेत आहे. अंतराळातील वैज्ञानिक संशोधनक्षेत्रात प्रामुख्याने प्रगत पाश्चात्त्य देश आघाडीवर असले तरी इतरही देशांचे योगदान लक्षणीय म्हणावे असे आहे आणि त्यात भारताची कामगिरी लखलखती आहे. त्याची आणखी एक खूण म्हणजे ही मोहीम.

Shubhanshu Shukla
Goa Government Job: गोव्यात 45,000 पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; DRDA, GSPCB ची जाहीरात प्रसिद्ध, वाचा संपूर्ण माहिती

त्याची आणखी एक खूण म्हणजे ही मोहीम. ती भारतीय विज्ञानक्षेत्रालाच नवी दिशा देणारी आहे. शुभांशू यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. कारगिल युद्धातून प्रेरणा घेऊन त्यांनी सैन्यदलात जाण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला. पुढे ते हवाईदलात रुजू झाले. दोन हजार तासांचा विमानउड्डाणाचा त्यांना अनुभव आहे.

भारताने पहिली मानवी अवकाशमोहीम ‘गगनयान’ जाहीर केली व `व्योमनॉट`ची पहिली तुकडी २०१९मध्ये निवडली. त्यात प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप यांच्या जोडीने शुभांशू यांची निवड झाली. भारतासाठी ही केवळ शौर्याची नाही, तर शास्त्रीय आत्मभानाची आणि तंत्रज्ञानातील परिपक्वतेचीही साक्ष देणारी मोहीम आहे.

राकेश शर्मा यांच्यानंतर अवकाशात जाणारा शुभांशू हा केवळ दुसरा भारतीय, तर अंतराळस्थानकात पोहोचणारा ६३४वा अंतराळवीर. पुन्हा अंतराळात पोहोचण्यासाठी भारताला ४१ वर्षांचा कालावधी लागला असला तरी केवळ संख्या या निकषावर त्याकडे बघता येणार नाही. राकेश शर्मा १९८४ मध्ये ‘सोयूझ टी ११ मोहिमे’द्वारे अवकाशात गेले होते. ते सोव्हिएट युगात भारताच्या सहभागाचे प्रतीक होते.

त्यांनी भारताच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून दिले. तर शुभांशू यांची मोहीम स्वदेशी तंत्रज्ञान, शांततेची उद्दिष्टे यांवर भर देणारी, खासगीकरणाच्या युगात अमेरिकेसारख्या महासत्तेबरोबर भागीदारी दर्शविणारी आहे. यात एक स्वप्न आहे, भारताला क्षितिजाच्या पलीकडे नेण्याचे. आपल्या १४ दिवसांच्या वास्तव्यात सुमारे ६० प्रयोग हे सर्व अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात करणार आहेत.

Shubhanshu Shukla
Goa Illegal Residence: गोव्यातून 79 विदेशी नागरिक हद्दपार! बेकायदेशीर वास्तव्याप्रकरणी कारवाई; 49 जण रशिया व बांगलादेशमधील

यात प्रामुख्याने सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील जैविक प्रतिक्रियांचा अभ्यास केला जाईल. अवकाशात गुरुत्वाकर्षण जवळपास नसल्याने मानवी शरीर, पेशी, आणि जैविक प्रक्रियांमध्ये बदल होतात. या स्थितीत भारतीय संशोधकांनी तयार केलेल्या सूक्ष्म जैविक यंत्रणांवर प्रयोग केले जात आहेत. भारतीय अन्नप्रणालींची चाचणी घेतली जाईल.

भविष्यातील दीर्घकालीन मानवयुक्त मोहिमांसाठी पोषणदृष्ट्या समृद्ध, टिकणारे आणि भारतीय पर्यावरणात तयार होणारे अन्नपदार्थ अवकाशात किती उपयुक्त आहेत, याची चाचणी घेतली जात आहे. शुभांशू यांनी गाजराचा हलवा, आमरस, मूग डाळ हलवा व इतर पारंपरिक पदार्थ सोबत नेले आहेत. यात कोणतेही `प्रिझर्व्हेटिव्ह` वापरलेले नाहीत, त्यांची घनता व उष्मांक अंतराळातील अन्नासाठी योग्य आहे, तसेच ते अंतराळस्थानकात वर्षभर टिकू शकतात.

अंतराळातही भारताची चव व संस्कृती पोहोचविण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. संपर्कसाधनांचा प्रयोगही निमित्ताने होईल. भारतीय बनावटीच्या संवादप्रणाली, विशेषतः क्वांटम-आधारित संपर्क यंत्रणा, अत्यंत कमी वीजखर्चात आणि उच्च सुरक्षेसह संवाद साधू शकतात का, याची पडताळणी चालू आहे. जैववैद्यकीय निरीक्षणाचा पैलूही महत्त्वाचा आहे. मानवाच्या शरीरातील बदलांचे निरीक्षण करण्यासाठी काही वैद्यकीय उपकरणे वापरली जात आहेत.

विशेषतः हृदयगती, रक्तदाब, स्नायूंची क्षमता आणि हाडांची घनता यांचे निरीक्षण केले जात आहे. ही संपूर्ण मोहीम ‘गगनयान’साठी पाया तयार करत आहे. शुक्ला यांचे गुरुत्वाकर्षणरहीत स्थितीतील प्रयोग यासाठी महत्त्वाचे ठरतील. संशोधन, तंत्रज्ञान व संस्कृती यांचा समन्वय जगाला नवीन दिशा देण्यास सक्षम आहेत, असा संदेशही शुभांशू यांच्या मोहिमेच्या निमित्ताने जगाला दिला गेला आहे.

Shubhanshu Shukla
Goa Accident: बस नसल्याने लिफ्ट घेतली अन् मद्यधुंद ट्रक चालकाने धडक दिली; महिला सुरक्षा रक्षक जागीच ठार

अवकाशात गेल्यानंतर राकेश शर्मा यांनी तेथून भारत कसा दिसतो, याचे वर्णन `सारे जहाँ से अच्छा` असे केले होते. शुभांशू यांनीही अवकाशात गेल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया तितकीच प्रेरणादायी आहे. ते म्हणाले, ‘‘ही झेप माझी वैयक्तिक नाही, तर आपल्या संपूर्ण राष्ट्राची आहे. मी आज अंतराळात आहे, कारण माझ्या मागे लाखो भारतीयांचे स्वप्न उभे आहे. मी सर्व भारतीयांना सांगू इच्छितो, आकाश ही मर्यादा नाही, तर आमंत्रण आहे.

स्वप्न बघा, अभ्यास करा आणि या महान देशासाठी अवकाशातही आपली जागा निर्माण करा. भारताच्या अंतराळक्षेत्रासाठी ही फक्त सुरुवात आहे. ‘गगनयाना’ची दिशा निश्चित आहे, आणि माझी भूमिका या यशाचा पाया घालणारी आहे.’’ भारत आता नवी क्षितिजे पादाक्रांत करत आहे; पण त्याचा उगम बुद्धीच्या तेजात आहे. शुभांशू यांची भरारी हे त्याचे तेजोमय प्रतिबिंब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com