
पणजी: गोव्यात व्हिसा संपूनही बेकायदेशीर वास्तव्य करून असलेल्या विदेशी नागरिकांविरुद्ध गोवा पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. यावर्षी आत्तापर्यंत ७९ नागरिकांना भारतातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामध्ये ३२ पुरुष व ४७ महिलांचा समावेश आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये ४९ जण रशिया व बांगलादेशमधील आहेत, अशी माहिती एफआरआरओ पोलिस अधीक्षक अर्शी आदिल (आयपीएस) यांनी दिली.
अधिक माहिती देताना अधीक्षक आदिल म्हणाल्या की, हद्दपार करण्यात आलेल्या ३२ पुरुषांमध्ये १३ रशिया, १२ बांगलादेशी, युगांडा, नायजेरिया, पोलंड, मोरोक्को, ब्रिटिश, युक्रेन व मॉरिशस देशाचे प्रत्येक एक नागरिक आहे. ४७ महिलांमध्ये १७ युगांडा, १४ बांगलादेशी, १२ रशिया, ब्रिटीश, युक्रेन, बेलारूस व अर्जेंटिना देशाचा प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
यावर्षी करण्यात आलेल्या कारवाईवेळी एप्रिलमध्ये १४ जणांना हद्दपार केले. त्यामध्ये ५ पुरुष व ९ महिलांचा समावेश आहे. मे मध्ये १० जणांना हद्दपार केले, त्यामध्ये प्रत्येकी ५ पुरुष व महिला होते. जूनमध्ये २० जणांना हद्दपार करण्यात आले. त्यामध्ये १३ पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे.
राज्यात अनेक विदेशी नागरिक व्हिसा संपूनही बेकायदेशीर वास्तव्य करून आहेत. काहीजणांकडे व्हिसा असूनही ते ड्रग्ज व इतर बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळे उत्तर गोवा पोलिस स्थानाकामार्फत किनारपट्टी भागात भाडेकरूंची तपासणी तसेच रात्रीच्यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या विदेशी नागरिकांची चौकशी केली जाते.
ज्या विदेशी नागरिकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांना अटक करण्यात आलेले आहे. जर त्यांचा व्हिसा संपलेला असेल, तर त्यांची म्हापशातील स्थानबद्ध केंद्रात रवानगी करण्यात येत आहे. खटला संपेपर्यंत त्यांना हद्दपार करता येत नाही. काहीजण व्हिसा मुतदवाढीसाठी अर्ज करतात. मात्र, त्याचा पाठपुरावाच करत नाहीत, अशी माहिती आदिल यांनी दिली.
पोलिसांना माहिती देण्याचे घरमालकांना आवाहन
विदेशी नागरिकांना भाडेपट्टीवर राहण्यास जागा देणाऱ्या मालकांनी त्यांचा ‘सी फॉर्म’ जवळच्या पोलिस स्थानकात नोंदवणे सक्तीचे आहे. ते भारतात आल्यानंतर २४ तासांच्या आत तो फॉर्म भरणे आवश्यक आहे. तसेच ते भाडेपट्टीवर घेतलेला फ्लॅट किंवा खोली सोडली, तर त्याची माहिती पोलिसांना मालकाने देण्याची गरज आहे.
ही माहिती मालकाने दिली नाही, तर त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद होऊ शकतो. तसेच दंडात्मक कारवाई होऊ शकते. जर एखादा विदेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव्य करून राहत असल्यास त्याची माहिती गोमंतकीयांनी पोलिस स्थानकाला द्यावी, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक वेरेकर यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.