Social Media: 'लाईक्स' आणि 'फिल्टर्स'च्या आभासी जगात आपण स्वतःलाच हरवून बसतोय का? वाचा 'स्व-प्रतिमे'चे मानसशास्त्र!

Ideal Self VS Real Self Social Media: आभासी जगात वावरताना मिळणारे ‘लाईक्स’, ‘कमेंट्स’ ह्या कडे निर्मोहीपणे एक अभिप्राय म्हणून बघावे.
Ideal Self VS Real Self Social Media
Social MediaDainik Gomantak
Published on
Updated on

सुलक्षा मनेष गावस

आभासी जगात वावरताना मिळणारे ‘लाईक्स’, ‘कमेंट्स’ ह्या कडे निर्मोहीपणे एक अभिप्राय म्हणून बघावे. स्वतःच्या कर्तृत्वाचे, स्व योग्यतेचे मोजमाप या शेरेबाजीवर फार अवलंबून न ठेवणे उत्तम. आपण स्वतःला गुण दोषासकट स्वीकारून स्व कर्तृत्वाच्या बळावर आपल्या आदर्श स्व प्रतिमेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा.

मी जो ॲप इतरांशी संवाद साधण्यासाठी वापरते त्यावर एका मैत्रिणीचा मेसेज आला. ‘डीपी’ बदल आता. मलाही प्रोफाइल फोटो बदलण्याचा मोह झाला. ‘हा की तो?’ करत फोटो शोधताना अचानक स्वतःलाच विचारलं, ‘मी इतरांसमोर एक ठराविक छबी ठेवण्यासाठी तर ही धडपड करत नाही ना?’ आतून ‘हो’ असं उत्तर आलं आणि मी थोडी सावध झाले. ह्या आत्मपरीक्षणातून हेही गवसले की, हे काम जास्त वेळ खाऊ आहे.

Ideal Self VS Real Self Social Media
शुभ्र वाळू अन् निळं पाणी! कोकणच्या 'या' किनाऱ्यावर आंघोळ करताना तुम्हाला होईल परदेशात असल्याचा भास

उगाच फोटो निवड, फिल्टर कर हा उपदव्याप जास्त वेळ करत नको बसायला म्हणून जो फोटो मनापासून आवडला तो मी टाकून मोकळी झाले.(ज्या वाचकांकडे माझा नंबर आहे, त्यांनी तो फोटो शोधण्याची तसदी घेऊ नये)

समाजमाध्यमांवरील आपली छबी ही आज आपल्या स्व-प्रतिमेचा अविभाज्य भाग झाली आहे. विशेषतः जे या माध्यमांवर सक्रिय असतात, त्यांच्यासाठी ही डिजिटल ओळख केवळ एक प्रोफाइल राहात नाही; ती स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टीकोनालाही आकार देऊ लागते.

या छबीला अधिक आकर्षक, परिपूर्ण आणि सर्वमान्य बनवण्याच्या प्रयत्नात वास्तव आणि सादरीकरण यांच्यात एक सूक्ष्म अंतर निर्माण होते. सुरुवातीला ते फारसे जाणवत नाही; पण कालांतराने त्या अंतराचे ओझे जाणवू लागते. आपण जे आहोत आणि आपण स्वतःला जसे दाखवतो यातील तफावत सांभाळण्यातच बरीच ऊर्जा खर्च होते.

Ideal Self VS Real Self Social Media
Hidden Konkan: निळाशार समुद्र अन् प्राचीन मंदिरे! कोकणातील 7 'हिडन जेम्स' जे तुमची ट्रिप अविस्मरणीय करतील

‘लाईक्स’, ‘कमेंट्स’ आणि मिळणारी दाद यामागे मान्यता मिळवण्याची एक मानवी इच्छा दडलेली असते. त्यात काही गैर नाही. प्रश्न तेव्हा निर्माण होतो, जेव्हा या मान्यतेच्या शोधात आपण वास्तव फिल्टर करू लागतो. काही गोष्टी ठळक करतो, काही गोष्टी मागे सारतो आणि नकळत स्वतःची एक वेगळी छबी साकारतो.एका अर्थाने आपण अनावधानाने स्वतःचे स्वरूप नाकारू लागतो. या प्रक्रियेत आपण फक्त इतरांनाच नव्हे, तर स्वतःलाही एका कल्पित प्रतिमेवर विश्वास ठेवायला भाग पडतो.

काही वर्षांपूर्वी आठवणी जपण्यासाठी फोटो अल्बम आणि कॅमेरा रोल्स हाच मुख्य आधार होता. फोटो काढणे ही खास प्रसंगांची गोष्ट होती. मर्यादित फोटो, टेक-रिटेकची सोय नाही, फिल्टर्स नाहीत आणि फोटोग्राफरने दिलेल्या फोटोंमध्येच समाधान मानावे लागायचे. स्वतःची प्रतिमा कृत्रिमरीत्या बदलण्याचा फार अट्टाहास नव्हता.मोबाईल क्रांतीनंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली. प्रत्येकाच्या हातात क्षणोक्षणी फोटो आणि व्हिडिओ टिपण्याचे साधन आले.

Ideal Self VS Real Self Social Media
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

त्यात भर म्हणून गेल्या पाच-सहा वर्षांत समाजमाध्यमांचा प्रभाव वाढला आणि प्रत्येक क्षण शेअर करून त्यावर प्रतिक्रिया, पसंती आणि वाहवा मिळवण्याची एक नवी संस्कृतीच रुजली. आज आठवणी जपण्याइतकेच त्या जगाला दाखवण्यालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. मग ओघाने प्रतिसादाची अपेक्षा असते.अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही, लाईक्स कमी आले किंवा कुणी टीका केली तर त्याचा परिणाम मनावर होतो.

अनोळखी लोकांची वाहवा सहज स्वीकारली जाते, पण त्यांची टीका मात्र अस्वस्थ करून जाते. या टीकास्त्रांचा मारा थेट आपल्या आत्मसन्मानावर घाव घालतो आणि आपण खचत जातो. अशावेळी आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो. माणूस नकळत स्वतःमध्येच गुरफटत जातो. या स्पर्धेत पैसा, वेळ आणि सर्वांत महत्त्वाची म्हणजे मनःशांती पणाला लागते.

Ideal Self VS Real Self Social Media
Goa Opinion: ‘प्रभु व्हायोलेटा’ प्रकरणातून निर्माण झालेले नवे प्रश्न

हे लिहिताना मला निळा कोल्हा या गोष्टीची आठवण होते. रंगाच्या डबक्यात पडल्यामुळे निळा झालेला कोल्हा स्वतःला इतरांपेक्षा वेगळा आणि असामान्य समजू लागतो. पण त्याची ही वेगळी ओळख केवळ बाह्य रंगावर आधारलेली असते. रूप बदलले या भ्रमात तो मूळ स्वरूपाला विसरतो. सत्य परिस्थिती समोर येताच तो तोंडघशी पडतो. समाजमाध्यमांच्या आभासी जगातही अनेकदा फिल्टर्स, संपादित प्रतिमा खरी मानून अनेकदा आपणही असाच भ्रमाचा भोपळा गोंजारत बसतो.

या आभासी पाऊलखुणा आता केवळ आठवणी जपण्यापुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. नकळत त्यांचा संबंध आपल्या स्वप्रतिमेशी आणि व्यक्तिमत्त्वाशी जोडला जातो. समाजमाध्यमांवरील सततची तुलना आणि परिपूर्णतेचा अट्टाहास आपल्याला वास्तवापासून दूर नेत राहतो. फिल्टर्स आणि काळजीपूर्वक निवडलेल्या क्षणांच्या आधारे आपण स्वतःची एक आदर्श प्रतिमा इतरांसमोर उभी करतो.

Ideal Self VS Real Self Social Media
अग्रलेख: एका दिवसात 5 ठिकाणी आंदोलने होणे हा योगायोग नाही! उभयतांनी संवादच टाळला तर प्रश्‍न सुटायचे कसे?

‘लाईक्स’, ‘कमेंट्स’ व ‘फॉलोअर्स’च्या माध्यमातून या स्व प्रतिमेला खतपाणी घालत जातो. जितकी ही आदर्श प्रतिमा वास्तवापासून वेगळी असते तेवढीच आंतरिक विसंगती आणि असमाधान नकळत वाढत जाते. ‘पर्सन सेण्टर्ड थेरपी’चे जनक कार्ल रॉजर्स ह्यांचा व्यक्तिमत्व सिद्धांत सांगतो की, आपली स्वप्रतिमा आणि आपले अनुभव जेवढे सुसंगत असतील तेवढे मानसिक स्वास्थ्यासाठी चांगले.

इथे आपणच हे अंतर निर्माण करत जातो. आयडियल सेल्फ (आदर्श स्व) रियल सेल्फ (वास्तविक स्व) यामधील अंतर जेव्हा वाढत जाते, तेव्हा असमाधान,न्यूनगंड अशा समस्या निर्माण होतात, ज्याचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो.

परिपूर्णतेच्या अट्टहासापोटी आपण आपली प्रतिमा संपादित करतो, मात्र हे करताना आपण वास्तवापासून दूर जात आहोत हे भान सुटते.

Ideal Self VS Real Self Social Media
सालाझारने गोवा हा पोर्तुगालचाच एक ‘ऑफशोर’ प्रांत आहे अशी उठवलेली आवईही कुठल्याही तणावाशिवाय आपण पचवली; ओपिनियन पोलचे कवित्व

आदर्श स्व आणि वास्तविक स्व यामध्ये जितके अंतर कमी करता येईल तेवढी घालमेल कमी. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मसन्मान हा स्व कर्तृत्वाने, चांगल्या गुणांनी,समाज उपयोगी धोरणांनी साधता आला तर उत्तम.

आभासी जगात वावरताना मिळणारे ‘लाईक्स’, ‘कमेंट्स’ ह्या कडे निर्मोहीपणे एक अभिप्राय म्हणून बघावे. स्वतःच्या कर्तृत्वाचे, स्व योग्यतेचे मोजमाप या शेरेबाजीवर फार अवलंबून न ठेवणे उत्तम.

आपण स्वतःला गुण दोषासकट स्वीकारून स्व कर्तृत्वाच्या बळावर आपल्या आदर्श स्व प्रतिमेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा.

राहता राहिला प्रश्न इतरांनी आपल्याला स्वीकारण्याचा, आपले कोडकौतुक करण्याचा तर त्यावर तुकाराम महाराज सांगतात,

‘ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीती ॥’ असे निस्सीम, कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्यावर माया करणाऱ्या अनेक व्यक्ती असतातच आपल्या बरोबर. माणूस मोठा होतो स्व कर्तृत्वाने.

Ideal Self VS Real Self Social Media
Opinion: गोवा, गोव्याची ओळख आणि ‘गोंयकारपण’ नष्ट होण्यापासून वाचवायचे असल्यास काय करावे?

आपण कसे दिसतो, आपल्याकडे किती सुखसोयी आहेत, आपले राहणीमान कसे आहे, या सगळ्यांपेक्षा आपण माणूस म्हणून कसे आहोत, ह्याला अधिक महत्व आहे. स्वतःशी प्रतारणा करून मिळवलेली वाहवा जशी कामाची नाही, तशी आपल्या उत्तम कामगिरीची, एखादे समाजहिताचे ध्येय मनी बाळगून केलेल्या कामगिरीला कोणी ऐऱ्या गैऱ्याने बोल लावला तरी त्यावरून आपला हिरमोड होऊ नये. इतकी खबरदारी या आभासी जगात वावरताना घ्यावी. फिल्टर वापरून उभी केलेली छबी न्याहाळत बसण्यापेक्षा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन स्व कर्तृत्वावर घडवण्यातून जी ऊर्जा मिळते ती शाश्वत आणि चिरंतन टिकणारी आहे.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com