

मुकेश थळी
सात्विकता, शालीनता, सोज्वळता व आध्यात्मिकता हे महान गुण होय. हे सर्व रंग, ढंग लेऊन आज श्रावण अवतरला.
वि. वा. शिरवाडकरांची गाजलेली कविता आहे.
हासरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रावण आला!
पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या आवाजातील हे गीत सुमधुर आहे. श्रावण कवींना भुरळ घालतो. प्रतिभेचे सृजनात्मक झरे झुळझुळते ठेवतो. शालेय पुस्तकातील बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं ‘श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे… क्षणात फिरूनी ऊन पडे’ या कवितेचा आठव होतो. क्षणात धारा, क्षणात चकाचक सोनेरी ऊन हा श्रावणी पावसाचा स्वभाव आहे. श्रावणातील पाऊस विध्वंसक नसतो. तापदायक व त्रासदायक नसतो. संगीतात मध्य लय असते, तशी श्रावणाची लय मध्य आणि सुखकर असते.
श्रावण महिना भगवान शिव यांना आत्यंतिक प्रिय. या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा केल्याने महादेव प्रसन्न होतात, असं भगवद्भक्त मानतात. म्हणूनच श्रावणात अभिषेक, रूद्राध्ययन, रूद्रसूक्त पठण करण्यावर भक्त-भाविकांचा भर असतो. या पठणाने मी प्रसन्न होतो, अशी ग्वाही दत्तमहाराजांनी दिल्याची कथा श्रीगुरूचरीत्राच्या ३४व्या अध्यायात आहे.
श्रावण महिन्यातील पावसाला आक्रमकता ठाऊक नसते. त्याचा स्वभाव सौम्य. सर्र फर्र करत येणं, मस्करीने एक थप्पड मारून गेल्यासारखं एक सर पाडून लपंडाव खेळल्यागत अदृश्य होणं हा श्रावणी पावसाचा लहरी मूड. अचानक इंद्रधनुष्य उगवतं.
सोनेरी उन्हात ते विलोभनीय दिसतं. श्रावणात बदलत जाणाऱ्या निसर्गाचे सृष्टीकचे रूपसौंदर्याचे विभ्रम व लालित्य अगदी तरल असतं. मन मात्र मृदू संवेदनशील हवं, गवताचं पातं आपल्या टोकावर जलबिंदू झेलतं, तसं सौंदर्यग्राही. नागेश महालक्ष्मीला जाताना नागेशीच्या उतरणीवर दिसते ती हिरवाई घटाघटा पिऊन टाकावीशी वाटते.
‘श्रावणात घन निळा बरसला’ हे मंगेश पाडगांवकरांनी लिहिलेलं आणि लताजींनी गायलेलं श्रुतिमधुर गीत आहे. पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले, अशी एक ओळ त्यात आहे. अशी प्रतिमा प्रतिभावंत कवीलाच सुचावी.
श्रावण म्हणजे सण, उत्सव, व्रत वैकल्ये, पूजा-विधी, आरत्या, प्रज्वलीत वाती, धूप दीप, नैवेद्य, भजनं, कीर्तनं या सगळ्यांची एक पवित्र प्रासादीक रेलचेल. नागपंचमी, गोकुळाष्टमी, रक्षाबंधन किती तरी सण हे सात्विकतेचं आंतरीक स्नान करायचं निमित्त. श्रावण म्हणजे संमिश्र मिलाफ. तूप, द्रोण व पंचखाद्य, शिरा, उदबत्ती या सुगंधांचा मिलाफ.
श्रावण म्हणजे पखवाज, तबला, टाळ, संवादिनी म्हणजे पेटीचे झुळूझुळू सूर, भक्ती हीच शक्ती हा कीर्तनातील आशय पोहोचवणारे श्रवणभक्तीचे शब्द, संगीतमय गजर या नादांचा एकत्रित नादाविष्कार. बेलपत्रं, तुळशीपानं, दुर्वा व इतर वनस्पती यांनाही भगवंताच्या दरबारांत दिव्यत्वाचा लाभ करून देणारा हा श्रावण. अंत्रुज महालात, मंदिरं जास्त असल्यानं श्रावणाचं तेजोवलय अतीव लखलखीत, रसरशीत, खुलून, उठून दिसतं.
श्रावण पौर्णिमेला श्रवण नक्षत्र असते. त्यावरून श्रावण हे नाव पडले अशी आख्यायिका आहे. माझी आजी श्रावणी रविवाराचे साग्रसंगीत पूजन करायची. सृष्टीतील झाडांची, वेलींची पाने ती ह्या पुजेसाठी गोळा करीत असे. सायंकाळी अंगणातील तुळशी वृंदावनात विसर्जन करताना घंटा वाजवण्याची सेवा ती मला द्यायची. पूजा झाल्यावर आजी मला प्रसाद देई. काकडीची गोलाकार फोड मला कॅरमच्या स्ट्रायकरसारखी दिसे! श्रावणी रविवारला आजी पातोळ्यो, मुठले करायची त्यांची चव व लज्जत न्यारीच.
गुरू ठाकूर हा कवी, चित्रकार मला फार आवडतो. गुरू ठाकूरांच्या श्रावण या कवितेत श्रावणी दृश्यांची सांगड प्रतिकात्मक रूपात जीवनाच्या तत्वचिंतनाकडे कशी घातलीय हे समपर्कतेचं एक उदाहरण आहे.
सुख वेचिन म्हणण्या आधी
घन दु:खाचा गहिवरतो
अन् दु:ख सावरू जाता
कवडसा सुखाचा येतो
या ऊन सावली संगे
रमण्यातही मौज म्हणूनी
मी हसून हल्ली माझ्या
जगण्याला श्रावण म्हणतो...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.