गोव्यात 'शिवसेने'ची मोर्चेबांधणी; प्रत्येक मतदारसंघात शाखा, 30 जागांवर विजयाचे लक्ष्य

Goa Shivsena: साठाव्या वर्धापनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या संभाव्य प्रवेशामुळे त्यांचे दिल्लीतील वजन व आर्थिक पाठबळ वाढणार आहे.
Shivsena
ShivsenaDainik Gomantak
Published on
Updated on

साठाव्या वर्धापनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांच्या शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या संभाव्य प्रवेशामुळे त्यांचे दिल्लीतील वजन व आर्थिक पाठबळ वाढणार आहे. म्हणूनच शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर गोव्यात तीस जागा लढवण्याची हमी ठोकत आहेत.

आमची कुठेही शाखा नाही!’ यासाठी प्रसिद्ध असलेली शिवसेना गोव्यातील चाळीसही मतदारसंघात शाखा उघडणार असल्याचे शिवसेना - एकनाथ शिंदे गटाच्या शायना एन. सी. यांनी जाहीर केले. रिव्होल्यूशनरी गोअन्स पक्षाचे माजी अध्यक्ष मनोज परब आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील वर्षा बंगल्यावरील भेट, तसेच शिंदे गटाच्या सातत्यपूर्ण पत्रकारपरिषदांमुळे गोव्यात शिंदे गट प्रकाशझोतात आला आहे.

ठाकरे परिवाराची शिवसेना आणि शिंदेंचे शिवसेनेविषयीचे धोरण यात अंतर आहे. ठाकरेंसाठी सेना प्रादेशिकतेचे संसाधन होते तर शिंदेसाठी राजकीय सत्ता. १९ जून २०२६ रोजी शिवसेनेला ६० वर्षे झाली. जून २०२२ मध्ये गोव्यात तळ ठोकून महाविकास आघाडीचे सरकार पाडणारी शिंदेसेना गोव्यात हिंदुत्वाची आघाडी उभारण्याच्या प्रयत्नात आहे.

साहित्यिक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असणारे ग. त्र्यं. माडखोलकर यांनी १९४६ मध्ये बेळगाव येथे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असताना मराठी भाषिकांच्या स्वतंत्र राज्याची मागणी केली. येथूनच ‘महाराष्ट्र धर्म’ या ऐतिहासिकतेला आणि तत्वज्ञानाला राजकीय चालना मिळाली. ऐतिहासिकदृष्ट्या ‘महाराष्ट्र धर्म’ ही प्रादेशिकता असली तरी राष्ट्रीयता हे तिचे अंतिम ध्येय होते.

इतिहासकार ए. आर. देसाईंच्या मते मध्ययुगीन काळापासून महाराष्ट्र हा विविध धर्मांचे, मुख्यत्वे फारसी धर्म, भाषा व खाद्यसंस्कृतीचे संयोगकेंद्र आहे. वि. के. राजवाडेंसाठी ‘महाराष्ट्रधर्म’ म्हणजे महाराष्ट्रीय लोकांची महाराष्ट्राप्रती सामूहिक कर्तव्यपूर्ण निष्ठा. मुघलांविरोधात मराठ्यांनी लढलेले युद्ध म्हणजेच महाराष्ट्र धर्म असे हिंदुत्ववादी मानतात.

Shivsena
Goa Weather: राज्यात उष्णतेचा जोर, पावसाची प्रतीक्षा; मान्सून सक्रिय नसल्याने तापमानात सातत्याने वाढ

अरबी व फारसीचा मराठीवरील प्रभाव कमी करण्यासाठी वि.दा. सावरकरांनी भाषाशुद्धीची मोहीम चालवली. महाराष्ट्र धर्माच्या जाणिवेतून संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे, अण्णा भाऊ साठे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, प्र. के. अत्रे, मधू दंडवते, सी. डी. देशमुख, सेनापती बापट, शंकरराव देव, अहिल्या रांगणेकर, केशवराव जेधे, ग. त्र्यं. माडखोलकर इत्यादींनी समितीची धुरा सांभाळली. प्रजा समाजवादी पक्ष, जनसंघ, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात उतरले. १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.

बेळगाव, कारवार व निपाणीचाही महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी एस. एम. जोशी, श्रीपाद डांगे, ना. ग. गोरे या समाजवाद्यांनी ‘संपूर्ण महाराष्ट्र परिषद’ स्थापन केली. समाजवाद्यांची कास न धरता प्रबोधनकारांनी छत्रपती शिवराय व जोतिबा फुलेंच्या विचारांचा मार्ग धरला. जातीनिर्मूलनाच्या लढ्यात बाबासाहेब आंबेडकर व भंडारी समाजातील सुधारक एस. के. बोले यांना प्रबोधनकारांनी सहाय्य केले. महाराष्ट्रातील पुरोहितांच्या अधिसत्तेला ‘भिक्षुकशाही’ म्हणून संबोधले. १९६० नंतर बाळ ठाकरेंनी गोव्यात मगोबरोबर सत्तेत असलेल्या प्रजासमाजवादी पक्षावर टीकेची झोड उठवली. ‘प्रजासमाजवादी पक्षाचा व्याभिचार’ हा लेख मार्मिकमध्ये छापला. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्याशी असलेल्या स्नेहामुळे शिवसेनेला ‘वसंतसेना’ म्हणूनही हिणवले गेले.

Shivsena
Goa Politics: फोंड्यात 'मगो'बाबत भाजप 'सावध'! युती कायम, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील- रितेश नाईक

१९ जून, १९६६ च्या पहिल्याच सभेत प्रबोधनकारांच्या उपस्थितीत बाळ ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘महाराष्ट्राला महाराष्ट्रवादाची गरज आहे’ या विधानाने केली. १९६७ च्या बॉम्बे म्युनिसिपल निवडणुकीत भारतीय जन संघ आणि नागरी संघटना या उजव्या विचारसरणीच्या पक्षांविरोधात निवडणूक लढविली. १९७०च्या दशकात शिवसेनेने दलित पँथर व आंबेडकरवादी संघटनांना विरोध करत १९८४ मध्ये भाजपशी युती केली.

१९९५ मध्ये सेना-भाजपचे सरकार आले. २००५ मध्ये राज ठाकरे व नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. २००८ ते २००९ च्या दरम्यान शिवशक्ती व भिमशक्ती एकत्र आणण्याचे बाळ ठाकरेंचे प्रयत्न होते. २००९ मध्ये दलित पँथरचे नामदेव ढसाळ व शिवसेना एकत्र आले. आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर ठाकरेंना ‘महाराष्ट्र धर्म’ जागवायचा होता. हिंदूहृदयसम्राट म्हणून कीर्ती मिळवलेले ठाकरे मनाने ‘महाराष्ट्रवादी’ होते.

नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळ ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे भाजपला महाराष्ट्र धर्माची आठवण करू लागले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा दिल्यांनतर नामुष्कीने शिवसेना-भाजप युती झाली. २०१९ मध्ये शिवसेनेने हिंदुत्वापेक्षा ‘महाराष्ट्र धर्मास’ प्राधान्य दिले व यातूनच बिगर-भाजप ‘महाविकास आघाडी सरकार’ स्थापन झाले. जुलै २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पाडून ‘हिंदुत्वासाठी’ भाजपबरोबर जात असल्याचे शिंदेंनी जाहीर केले.

६०ठाव्या वर्धापनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील सहा खासदारांच्या शिंदेंच्या सेनेत होणाऱ्या संभाव्य प्रवेशामुळे त्यांचे दिल्लीतील वजन व आर्थिक पाठबळ वाढणार आहे. म्हणूनच शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर गोव्यात ३० जागा लढवण्याची हमी ठोकत आहेत. १९९४ मध्ये साळगावात शिवसेनेच्या दिलीप कळंगुटकर यांना मिळलेली ५१८४ मते सोडता १९८९ पासून सेनेच्या सर्व उमेदवारांची अनामत जप्त झाली. २०२२ मध्ये हिंदुत्वासाठी शिवसेनेने उत्पल पर्रीकरांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतली. मगोचे मर्यादित यश पाहता सर्व मतदारसंघ लढणारा साथी भाजपला हवाय. त्यामुळे शिंदेंची सेना गोमंतकीय प्रादेशिकतेला बिलगणार की, हिंदुत्वाला हे येणारी निवडणूकच ठरवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com