पृथ्वीच्या अंगावर जसे ऋतू खेळतात त्याच प्रकारे आपल्या शरीरात पचन इंद्रिये ऋतूंचे खेळ खेळतात; विचारांचे ऋतुचक्र

Seasons Memories: उन्हाळ्याच्या उष्णतेने अंधार दूर होऊन आयुष्याचे कोपरे उजळून जातात. त्याच्या सहवासाने दिवस म्हणजे आपल्या जीवनाला एक गोड स्वप्न असते.
Seasons Memories
Seasons MemoriesDainik Gomantak
Published on
Updated on

वसुंधरेच्या अंगावर वर्षभर आठवणीचे ऋतू खेळत असतात. मनावर उमटणाऱ्या हळव्या भावनेतील जीवनाच्या प्रवासात उन्हाळा, पावसाळा आणि ज्याची जिव्हाळ्याने वाट पाहावी, तो हिवाळा मागे सारून उन्हाळा सुरू झाला म्हणजे देहाची काहिली होऊ लागते. भाजून काढणारा उन्हाळा नको म्हणून वर्षा ऋतूची आराधना माणूस करतो.

तो प्रकट होण्याअगोदर वारा काळ्यानिळ्या यमदूतरूपी ढगांना ढकलीत अरुण राजाची मखमली किरणे गिळून त्यातून वर्षाऋतूच्या रुपेरी धारांचा वर्षाव मनोहारी वसुंधरेवर करून तिच्यावरील जैवविविधतेची तहान भागवतो. मात्र तहान भागवता भागवता प्रत्येक प्राणिमात्रांच्या नाकातोंडात पाणी गेल्यावर तो प्रत्येकाला नकोसा वाटू लागल्याने वसुंधरा परत हिवाळ्याला बोलावणे पाठवते.

सर्व प्राणिमात्र एखाद्या प्रियकराच्या वाटेला डोळे लावून पाहावे, तशी त्याची वाट पाहत राहतात. पृथ्वीवरील सारे ऋतू मानवी जीवनाला वेगळेपणाचे सौंदर्य देतात. आपल्या स्मृतीशी जोडलेल्या ऋतूचे अनुभव मनात दाटलेल्या खजिन्यात कायम भावस्पर्शी वाटतात.

उन्हाळ्याच्या उष्णतेने अंधार दूर होऊन आयुष्याचे कोपरे उजळून जातात. त्याच्या सहवासात दिवस म्हणजे आपल्या जीवनाला पडलेले एक गोड स्वप्न असते. हिवाळ्यातील कोवळ्या उन्हात उभे राहिलो की जुन्या आठवणींचा खजिना डोळ्यासमोर उभा राहत मनात उमटलेल्या सावल्यांचे गोडवे आठवतात. उन्हाळ्यात साकारलेल्या क्षणामधून अंगात नव्याने ऊर्जा उभी राहते.

त्या ऋतूच्या आगमनात हलकासा थंड वारा जेव्हा अंगावर फिरतो. तेव्हा आपल्या प्रियेने हलकेसे आलिंगन दिल्याचा भास होतो आणि त्या स्पर्शाने मन शांत होते. त्याने एखाद्याच्या मनातील ताप एकदम उतरत जाऊन त्या गारव्याने दिलासा मिळतो.

पण तो नसल्यास आपल्या देहाला जाणवणारा त्रास त्याची आठवण करून देतो. वर्षाऋतू हा नेहमीच मनातील आठवणी साठवून ठेवतो. पहिल्या पावसाच्या सरींनी मनातील आठवणी आठवत जमिनीवर पडून सुकलेल्या पानावर पडलेले पावसाचे पाणी झिरपलेले आठवते.

पण त्या सरींनी मनाला उभारी मिळते. तेच पाणी धरणीच्या अंगावरील बियाण्यातून अंकुरांना वाट मोकळी करून देत जग दाखवते. पडणाऱ्या पावसाच्या सरीत अनुभवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब मनातील आठवणींच्या पानावर जमा होतो.

वर्षाऋतू जसा ओलावा देतो, तसाच आपल्या आयुष्याला सहवासाचा ओलावा मिळतो. हिवाळ्यातील शिशिरात झाडांची पाने गळून खाली पडून कोमेजतात. तसेच मनात साठवलेले विचार कधी-कधी विरून जातात.

पण त्या कोमेजलेल्या विचारांच्या पानातील सौंदर्यात वेगळेपणा असतो. प्राणी जोपर्यंत जिवंत असतो, त्याचप्रकारे झाडावरील पान पिकेपर्यंत त्या वृक्षाला चिकटून राहते. त्या ओलाव्याने मनातील कोठार भरून जाते आणि स्वप्नातील रोपांना मनातील घरात जागा मिळते. त्यातला ओलावा मनातील मुळात खोलवर साठतो.

वर्षभरातले ऋतू सतत बदलत असतात. पण आठवणीतील ऋतू देहात जीव असेपर्यंत सोबत असतात. ते चिरंतन ऋतू होय. काळवेळाच्या टप्प्यात तो बहरत असतो. उन्हाळ्याच्या उन्हात तो आठवणीच्या सावलीत आपल्याला सावरतो. हिवाळ्याच्या थंडगार रात्रीत एखाद्याच्या सहवासात उबेसाठी राहण्यास तडफडतो.

त्या प्रेमळ उबेच्या चादरीत लपेटून आपले मन शांत करतो. पहाटे पडणाऱ्या धुक्याच्या थेंबामध्ये हसण्याचा नाद मनाला ऐकू येतो. शरीरातून जेव्हा आठवणीची पाने गळतात. तेव्हा त्याच्या नसण्याच्या जाणिवेचे ओझे मनात जास्त असते. त्याच्या पानावर कोरलेल्या आठवणींनी मन भरून येते. अशा आठवणींनी प्रत्येकाने प्रत्येकाचे आयुष्य इतके व्यापते की त्या आठवणीच्या सावलीत बोलणे, चालणे, वागणे, विचार करणे हे सारे सवयीचेच होते.

त्या विचारांच्या सावल्या कधीच एकट्या सोडत नाहीत. त्या पुढच्या वाटा दाखवण्यास आधार देतात. आठवणीने भरलेले आयुष्य एक अनमोल ठेवा असतो. त्या अस्तित्वाची अतूट छाप आयुष्यातील प्रत्येक क्षणी जाणवते. कधी ती ओल्या नेत्रातून, हसण्यातून, अतीव दु:खातून, हर्षभरातून हे आठवणीतील सहा ऋतू व त्यांचे सोहळे, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. ते प्रत्येकाला नव्या उमेदीने जगायला शिकवतात. त्यातून सावरण्याचे बळ मिळते.

पृथ्वीच्या अंगावरील ऋतुचक्र कधी थांबत नाही आणि ती असेपर्यंत थांबणारही नाही. तशाच प्रकारे आठवणींच्या ओलाव्याचे ऋतू देहातील मनात सतत फिरत असतात. त्या आठवणींच्या चक्रात मन सुगंधित होऊन जीवन प्रफुल्लित होते.

त्यातून वाटचाल करणाऱ्या आयुष्याचा पुढचा रस्ता सुखकर बनतो. आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत आठवणींच्या ऋतूत हरवून जाताना मनावर स्वप्नभावनांच्या अंतिम क्षणापर्यंत मोत्याचे हार विणले जातात. ते प्रत्येकाचे आयुष्य उजळून टाकतात.

त्या आठवणीत स्वत:लाच शोधले जाते. जगताना तो एखाद्याच्या सहवासाची प्रतीक्षा करीत असतो. हसणाऱ्या मुखावर प्रकटणारे अश्रू लपवणारा तो आठवणीचा ऋतू म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्याचा शाश्‍वत श्‍वास असतो. तो शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहतो. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात अस्तित्व साठवतो. फिरत्या ऋतूच्या चक्रात जीवनात कोजागिरी चंद्र बनून झळाळून त्या सावलीत आठवणीच्या गारव्यात मनाला बहर येतो.

Seasons Memories
Goa Winter: धुक्यात हरवला गोवा! हुडहुडी वाढली; पुढचे 2 दिवस कसे राहणार हवामान? वाचा..

हे सारे त्या निसर्गचक्राचे काम आहे. वसुंधरेच्या ऋतूंतील सोहळे येऊन जात राहतील. पण हृदयातील ऋतू देह असेपर्यंत रक्तातील थेंबात ठाण मांडून राहणार आणि बाहेरील वारा त्याच्या सभोवार फेर धरून पिंगा घालीत असणार. हिवाळ्याच्या दिवसात झावळांच्या झोपडीत झोप घेताना झोंबणाऱ्या थंडीत गारठलेल्या अंगावर जुन्या लुगड्यांची शिवलेली गोधडी लपेटल्याने मिळणारी ऊर्जा म्हणजेच अंतर्मनातील ऋतूचे सुख होय.

पाऊस घेऊन येणारा वर्षा ऋतूतील वारा माळरानावरील शेतात काम करणाऱ्या माणसाच्या अंगाला झोंबल्यावर तो हातातील कुदळ जिथेच टाकून धापा टाकीत पळत जवळच उभारलेल्या झुडपांच्या पाल्यापाचोळ्याने शाकारणी केलेल्या झोपडीत जाऊन बसतो.

Seasons Memories
Goa Winter: राज्यात हुडहुडी कायम! पुढील 4 दिवस कसे राहणार तापमान? वाचा..

ऊर्जा मिळवून सुखाचा श्‍वास सोडीत पाऊस जाण्याची वाट पाहत मनात चिंतन करतो, तेच अंतरमनातील ऋतूचे सुख होय. उन्हाळ्यातील ग्रीष्मात शेतात काम करताना अंगावर पडणारी सूर्याची उष्णता किरणांनी शरीरातून पाझरणाऱ्या घामाच्या धारा वाहत राहिल्याने, सुकलेल्या घशाला लागलेली तहान भागवण्यासाठी फुटलेल्या कळशीच्या तळाशी असलेले घोटभर थंड पाणी पिऊन तृप्त होत,

सोडलेला दीर्घ लांब श्‍वास घेत, पोटाच्या भुकेची आग तांबवण्यासाठी बोचक्यात गुंडाळून आणलेली चटणी आणि भाकर हातावर धरून खात देणारा ढेकर म्हणजेच अंतरातील आत्मा-ऋतूचे सुख होय. पृथ्वीच्या अंगावर जसे ऋतू खेळतात. त्याच प्रकारे आपल्या शरीरात पचन इंद्रिये ऋतूंचे खेळ खेळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com