

माझी जन्मभूमी सावईवेरे. श्री देव मदनंताच्या कृपाशीर्वादाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजेच माझा गाव सावईवेरे. गोव्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंत्रूज महालातून वाहणाऱ्या मांडवीच्या कडेवर वसलेला माझा गाव. चोहोबांजूनी नैसर्गिक हिरवी चादर, झुळझुळ वाहणारे शीतल झरे, बागायतींनी नटलेला परिसर अन् आराध्य दैवत श्री देव अनंताच्या चरणी लीन होणारी गावकरी मंडळी!
खरं सांगू का, माझा जन्म सावईवेरे गावात झाला याचा मला प्रचंड अभिमान आहे. माझ्या गावाशी माझं एक वेगळंच नातं आहे. शब्दांच्या पलिकडलं म्हणतात ना तसं. यामागचं कारणही तसंच आहे. माझी नोकरी गोव्याच्या राजधानीत. गजबजलेलं असं हे शहर. नोकरदार माणसांची लगबग, हे शहर एक विकसित शहर म्हणून उदयास आले आहे, पण शहरी वातावरणात एक वेगळाच थकवा जाणवतो हेही तितकेच खरे.
शहराची दगदग पाहून मानसिकदृष्ट्या थकायला होतं ते वेगळं. पण कसं कोण जाणे संध्याकाळी गावाच्या हद्दीत प्रवेशताच सारा शीण कुठच्या कुठे पळून जातो. स्वच्छ हवा, हवेतील गारवा, मानसिक शांतता अफलातून असते, शब्दात मांडता न येण्यासारखी. सावईवेरे गावाला लोक आंदोलनाचा मोठा इतिहास आहे. साल १९८८ मध्ये थापर-ड्युपोन्ट या कंपनीने गावातील भूतखांब पठारावर प्रदूषणकारी नायलॉन ६,६ प्रकल्प आणला होता.
तेव्हा तर माझा जन्मही झाला नव्हता. हा प्रदूषणकारी प्रकल्प गावातून हद्दपार करण्यासाठी सावईवेरे व पंचक्रोशीतील लोकांनी लोकलढा उभारला. १९९५ मध्ये गावचे सुपुत्र, आंदोलनकर्ता नीलेश नाईक यांचा बळी गेला व हे आंदोलन तीव्र झाले व लागलीच हा प्रकल्प रद्द करण्यात आला. कधी कधी मनात विचार येतो. तेव्हा हे आंदोलन झाले नसते तर? लोकांनी ह्या प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध केला नसता तर?
गावचे लोक, येथील निसर्गप्रेमींनी पुढाकार घेतला नसता तर? केरीहून खांडेपार ते करमळीहून आपेव्हाळपर्यंत व्यापलेला भला मोठा भूखंड आज प्रदूषणाने बरबटला असता. आज गावात अनुभवायला मिळणारी निखळ शांतता, प्रसन्नता, झऱ्यांची खळखळ, स्वच्छ-शुद्ध हवा, निसर्ग सौदर्यं दिसलं असतं? माझ्या गावाची अवस्था आज काय असती हा विचारही करवत नाही.
पंचक्रोशीतील सदाहरित जंगले, भूतखांब पठार, शितोळ तळे, काजू- कुळागरांनी समृद्ध बागायती मी आजही अनुभवू शकते ही खरं तर त्याकाळी गावच्या हितार्थ वावरलेल्या आंदोलकांचीच देण. माझ्या गावात अजूनही देवचाराक रोट, राखणदाराक गोडशें, भूता-खेतांना शीते, पारंपरिक धालो मांडावर धालोत्सव व शिमगो मांडावर शिमगोत्सव खेळला जातो. अखंड भजनी सप्ताह, असे असंख्य सण-उत्सव भक्तिभावाने साजरे केले जातात.
मात्र हल्ली गांवच्या टपरी-नाक्यांवर ग्रामस्थांची कुजबूज ऐकून मन अस्वस्थ होते. हे भाट विकायला काढले आहे, ते कुळागार विकायला काढले आहे, गावातील ही जागा कुणी परप्रांतीय विकत घेण्याच्या मार्गावर आहे, अशा गोष्टी कानावर येतात. तेव्हा अस्वस्थ मन देवाचा धावा करत एकच प्रार्थना करते, माझ्या गावाला ‘किसी की नजर ना लगे’.
स्त्रिग्धरा नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.