

सुमारे १,००० वर्षांपूर्वी सारस्वत ब्राह्मण काश्मीरहून पंजाब, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या मार्गे गोव्यात आले. हे सर्व सारस्वत शैव पंथीय होते. ६०० वर्षांपूर्वी मध्वाचार्यानी त्यातील काही सारस्वतांना वैष्णव पंथात आणले.
पूर्वी स्मार्त आणि वैष्णवात वैमनस्य होते. रोटी व्यवहार होत असला तरी बेटी व्यवहार होत नव्हता. वैष्णवांनी शिवाचे नाव उच्चारू नये म्हणून ‘कपडे शिव’ असे न म्हणता ‘कपडे विष्णू कर’ असे म्हणत. वैष्णव व स्मार्तांचे स्वभाव विशेष वेगळे होते.
बहुतेक वैष्णव व्यापार धंदा करायचे. स्मार्त हे बहुतांशी शिक्षण, वैद्यकी, सरकारी नोकरी करायचे. वैष्णव हे व्यवहारी, वास्तववादी, आपसातील भांडणे आपसातच मिटवणारे, उदारमतवादी होते; तर स्मार्त बरेचसे सनातनी, डूख धरणारे, सूडबुद्धीचे होते.
पुढे एकीबेकीच्या चळवळीत एकीचा विजय झाल्यामुळे वैष्णव व स्मार्तांतले वैमनस्य संपले. वैष्णव, स्मार्त, बारदेसकर, कुडाळदेसकर व चित्रापूर ह्या सारस्वतांच्या पोटजातीपैकीं चित्रापूर सारस्वतांत अनेक बुद्धिमान, सर्जनशील व कर्तबगार व्यक्ती आहेत. त्यात नंदन नीलेकणी, गिरीश कर्नाड, गुरुदत्त, श्याम बेनेगल, प्रकाश पडुकोन, दीपिका पडुकोन ह्यांचा समावेश होतो.
५५० वर्षांपूर्वी वैष्णवांनी पर्तगाळीत मठ बांधला. ह्या मठाच्या ५५०व्या वर्धापनवर्षी पर्तगाळला आध्यात्मिक पर्यटन केंद्र करण्याची घोषणा करण्यात आली. ‘आध्यात्मिक पर्यटन’ हे शब्द मला खटकतात. धार्मिक किंवा आध्यात्मिक तीर्थयात्रा असू शकते.
पण आध्यात्मिक पर्यटन म्हणजे धर्मक्षेत्राचे बाजारीकरण करणे योग्य नव्हे. आपल्या अतिउत्साही पर्यटनमंत्र्यांनी गंगा आरतीचे अनुकरण करून नार्व्याला मांडवी आरती करायचे ठरवले आहे. त्यासाठी १० कोटी खर्च येणार आहे.
पर्तगाळ मठाने यापुढे केवळ वैष्णवांनाच नव्हे तर अन्य सर्व सारस्वतांच्या पोटजातींना आपल्या भक्तांत समाविष्ट केले पाहिजे. पर्तगाळ मठाचे अनेक भक्त श्रीमंत आहेत. पर्तगाळ मठाने कोणताच ज्ञातीभेद न करता गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या द्याव्यात.
विद्याधिराज पुरस्कार देतानाही बिगर सारस्वतांचा विचार व्हावा. वैष्णवांची उदारमतवादी परंपरा अधिकाधिक बळकट व्हावी. नैतिकतेला स्मरून भक्तांनी रक्तदान, मरणोत्तर नेत्रदान, अवयवदान, देहदान करावे. पर्तगाळ मठ हे शिक्षण क्षेत्र व्हावे. संस्कृत भाषा, तत्त्वज्ञान, मानवशास्त्र, गणित, विज्ञान, कृषी हे विषय शिकवण्यात यावेत.
हिंदू धर्मातील अंधश्रद्धा नष्ट करण्यास पर्तगाळ मठाने पुढाकार घ्यावा. रजस्वला स्त्रियांना अपवित्र मानले जाऊ नये.
आंतरजातीय विवाहांना विरोध होऊ नये. २१वे शतक संपेल तेव्हा गोव्यातील बहुसंख्य सारस्वतांनी गोव्याबाहेर स्थलांतर केलेले असेल. १,१०० वर्षानंतरचे सारस्वतांचे दुसरे स्थलांतर असेल तेव्हा पर्तगाळ मठाच्या शाखा अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, कॅनडा येथे काढाव्या लागतील.
सारस्वतांना धर्मापेक्षा धन अधिक प्रिय आहे हे पोर्तुगीजकाळात सिद्ध झाले आहे. दक्षिणेकडे गेलेल्या सारस्वतांचा अपवाद सोडल्यास गोव्यातील बहुसंख्य सारस्वतांनी जमिनी राखण्यासाठी ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले हा इतिहास आहे.
इतिहासाच्या दोन वाक्यांमधली रिक्त जागा वाचण्याचे मला कुतूहल आहे. सारस्वतांपैकी वैष्णव हे श्रीमंत, व्यापारधंदा व जमीनजुमला असलेले असल्यामुळे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित झालेल्या सारस्वतांमध्ये वैष्णव अधिक होते की पर्तगाळ मठाच्या अनुयायांत असंख्य स्थलांतरित सारस्वत आहेत हे लक्षात घेता बहुसंख्य वैष्णवांनी स्थलांतर करून धर्म राखला का, हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
ओपिनियन पोल चळवळीत मराठीवादी व महाराष्ट्रवादी यांमध्ये वैष्णव अधिक होते व स्मार्त बहुतांशी कोकणी व संघप्रदेशाच्या बाजूने होते असे विधान करणेही धाडसाचे ठरेल.
कारण नायक शंखवाळकर (काशिनाथ दामोदर नायक शाखा), तळावलीकर, कारे हे वैष्णव महाराष्ट्रवादी तर केणी, तिंबले, नायक शंखवाळकर (नरसिंह दामोदर नायक शाखा) हे वैष्णव कोकणीच्या बाजूने होते. धेंपे कुटुंब तटस्थ होते.
भविष्यकाळात धनार्जनासाठी धर्मभूमी सोडून सारस्वत स्थलांतर करतील. वसुधैव कुटुंबकम् हा मंत्र असलेल्यांनी सारस्वतांना स्थलांतरासाठी दोष देता येणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.