Partgali Banyan Tree: 1000 वर्षे जुना, तळपण नदीच्या उजव्या काठावरती वसलेला, पर्तगाळी येथील 'पवित्र वटवृक्ष'

Partgali jivottam math banyan tree: भारतीय लोकमानसाने शेकडो वर्षांपासून वडाला पवित्र वृक्षाचे स्थान दिलेले असून, त्यामुळे अक्षयवट म्हणून त्याला पूजनीय मानलेले आहे.
Partgali jivottam math banyan tree
Partgali jivottam mathDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय लोकमानसाने शेकडो वर्षांपासून वडाला पवित्र वृक्षाचे स्थान दिलेले असून, त्यामुळे अक्षयवट म्हणून त्याला पूजनीय मानलेले आहे आणि त्याच्या संवर्धनाला आणि संरक्षणाला विशेष प्राधान्य दिलेले आहे.

गोव्याच्या एका टोकाला वसलेल्या काणकोण तालुक्यातल्या पैंगिणी गावातला शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा असलेला पर्तगाळी जीवोत्तम मठ संस्थानाच्या ऐतिहासिक आणि पवित्र संकुलापासून सुमारे २०० मीटर अंतरावर वसलेल्या वडाच्या विस्तीर्ण संकुलाला संपूर्ण गोव्यात अनन्यसाधारण महत्त्व पूर्वापार लाभलेले आहे.

श्रीसंस्थान गोकर्ण जीवोत्तम मठाच्या स्थापनेला यंदा ५५० वर्षे पूर्ण झाल्याने विशेष देवकार्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी युक्त महोत्सवाचे आयोजन केल्याने हा अक्षयवट आणि त्याच्याशी निगडित इतिहासाचा वारसा चर्चेत आला आहे.

हा वृक्ष सुमारे एक हजार वर्षांपेक्षा अधिक काळापासून अस्तित्वात आहे. इथे श्रीसंस्थान गोकर्ण जीवोत्तम मठ स्थापन झाल्यावर त्याच्या अस्तित्वाला आगळीवेगळी किनार लाभलेली आहे. खोतीगाव अभयारण्याच्या कक्षेपासून हा वड सह्याद्रीच्या डोंगररांगांतून उगम पावणाऱ्या तळपण नदीच्या उजव्या काठावरती वसलेला आहे.

उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या सधन जंगलात उगम पावणाऱ्या तळपण नदीच्या प्रवाहाला श्रीसंस्थान गोकर्ण जीवोत्तम मठाच्या आजतागायत उपलब्ध साहित्यकृतीत, या नदीचा कुशावती म्हणून प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे.

अक्षयवट इथे येणाऱ्या केवळ संस्थानाशी निगडीत भाविकांसाठीच नव्हे तर काणकोण आणि परिसरातल्या समस्त लोकमानसांसाठी भक्ती, श्रद्धा आणि पावित्र्य यांचे महत्त्वाचे संचित बनलेला आहे. या वडाच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्यांचा जमिनीत विस्तार होऊन त्यांनी खोडाचा आकार घेतलेला आहे.

अशा हवेत विस्तारलेल्या २२०च्या आसपास हवाई पारंब्यांनी सुमारे २३५ फूट पूर्वेला आणि २२५ फूट उत्तरेला भूभाग व्यापलेला आहे. मोरेसी कुळातील वटवृक्ष भारतीय पारंपरिक वनौषधी ज्ञानदालनात महत्त्वाचा मानलेला आहे.

त्याची पाने, फुले, साल ,चीक औषधी गुणधर्माने युक्त असल्याचे मानल्याने, त्याच्याजवळ असणाऱ्या औषधी घटकांचा उपयोग मानवी समाजाबरोबर पशुपक्षी त्याचप्रमाणे कृमी कीटकांच्या अस्तित्वाला पूरक मानलेला आहे. बऱ्याचदा औषधी गुणधर्माची क्षमता असलेल्या या अक्षयवटाचे पावित्र्य श्रीसंस्थान पर्तगाळी जीवोत्तम मठाद्वारे आत्मीयतेनं आणि श्रद्धेने जपण्याचा प्रयत्न आज ही केला जातो.

एकेकाळी पैंगिणी गावातील वटवृक्षाचा परिसर ‘पर्वत कानन’ म्हणून परिचित होता. बारमाही निरंतर प्रवाहित असणारी तळपणची नदी आणि विस्तीर्ण वटवृक्षाच्या शेकडो पारंब्या आणि पर्ण आच्छादनाने समृद्ध तसेच शीतल छायेच्या या परिसरात ऋषी, महंत ध्यानधारणा करायचे अशी लोकश्रद्धा प्रचलित आहे.

त्यामुळे जेव्हा प्रभू रामचंद्राची मूर्ती कुठे स्थापन करण्याच्या विवंचनेत गोकर्ण पर्तगाळी संस्थानाच्या मठाचे अनुयायी होते, त्यावेळी म्हणे गोमाता प्रकट होऊन मार्गक्रमण करत वटवृक्षाच्या आणि तळपण नदीच्या तीर्थक्षेत्री जाऊन आपल्या पान्ह्यातून दुधाची धार सोडली, तेथेच मूर्ती स्थापना झाली आणि अल्पावधीतच हा मठ केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्रच नव्हे तर वेदाभ्यास तसेच द्वैत सिद्धांताच्या अध्ययनाची भूमी म्हणून नावारूपास आली.

वडाचे झाड भारतीयत्वाची जननी असणाऱ्या सिंधू संस्कृतीत वंदनीय मानलेले असून, या वृक्षाच्या पानावरती बाल स्वरूपात श्रीकृष्ण नांदत सृष्टीच्या अनादी रहस्याचे अवलोकन करत असल्याची धारणा रूढ असल्याने, त्याला आदराचे स्थान लाभलेले आहे.

Partgali jivottam math banyan tree
Banyan Tree: भगवान श्रीकृष्ण आला नाही तर गोपी वडाला कृष्ण मानून फेर धरून खेळत होत्या; वटवृक्षाच्या रूपात जन्म घेणारा जटाधारी आदिनाथ

हा वृक्ष ब्रह्मदेवाचे निवासस्थानही मानलेला असून, मघा नक्षत्राचा आराध्य वृक्ष म्हणून त्याला पुजला जातो. या महाकाय वृक्षाची फळे मात्र खूपच छोटी असून त्यात प्रवेश करून अंजीर माशी अंडी घालून, आपल्या जीवनचक्राला आणि वृक्षाच्या परागीकरणाच्या प्रक्रियेला चालना देण्याचे कार्य बजावत असते.

गेल्या कित्येक शतकांपासून अक्षय सांस्कृतिक आणि पर्यावरणीय संचित ठरलेल्या या वृक्षाचे स्थान श्रीगोकर्ण पर्तगाळी संस्थानचे २३वे मठाधिपती श्री विद्याधिराज स्वामी यांनी जाणल्याने, त्यांनीच या वृक्षाला आपल्या मठाचे प्रतीक मानून, दरवर्षी कर्तृत्ववान आणि समाजोपयोगी व्यक्तिमत्त्वाला पुरस्काराने गौरवण्यासाठी याच अक्षयवटाचे सन्मान चिन्ह भेट देण्याची परंपरा सुरू करून एक चांगला पायंडा पाडला आहे.

Partgali jivottam math banyan tree
Banyan Tree Replanting: ..वृक्षवल्ली आम्हा सोंयरे! 'तो' वटवृक्ष वाचवला; बीट्स पिलानीलगतच्या रस्त्याकडेला केली पुनर्लागवड

पर्तगाळीचा हा अक्षयवट इथल्या लोकमानसाबरोबर पशुपक्षी, कृमीकीटक यांच्यासाठी नैसर्गिक अधिवास ठरलेला आहे. मलाबारी राखाडी धनेशसारख्या प्रदेशनिष्ठ पक्ष्याप्रमाणे अन्य वन्यजिवांचे आश्रयस्थान असणारा हा महावृक्ष एकेकाळी बऱ्याच मोठ्या जागेत विस्तारला होता, परंतु आज मानवी समाजाने त्याच्या नैसर्गिक विस्ताराला रोखण्यासाठी नानाविध क्लृप्त्या लढवून नियंत्रित करण्याला प्रारंभ केलेला आहे.

केवळ पर्तगाळी संस्थानालाच नव्हे तर संपूर्ण गोव्यासाठी हा महावृक्ष नैसर्गिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संचित आहे. शीतल आणि आल्हाददायक सावली देण्याबरोबर प्राणवायूचा अविरत पुरवठा करत असल्याने त्याचे संवर्धन आणि संरक्षण महत्त्वाचे ठरलेले आहे. तळपण नदीच्या किनारी वसलेला हा अक्षयवट चैतन्याचे आणि दिव्यत्वाचे प्रतीक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com