

सरिता नंदा माजीक
साने गुरुजींनी आपल्या विचारांद्वारे, प्रेमाने हृदयाच्या भाषेने लोकांच्या मनात प्रेमाचे अंकुर रुजवले.
खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
या प्रेमाच्या अंकुराद्वारे माणसे जोडली गेली. माणसांची मने संस्कारित करून सोडली. साने गुरुजी खर्या अर्थाने सर्वांच्या घराघरांत पोहोचले ते ‘श्यामची आई’ या पुस्तकातून.हे पुस्तक म्हणजे जणू काही संस्काराची शिदोरीच.
एके ठिकाणी साने गुरुजी म्हणतात, मातेबद्दल ज्यांना ज्यांना म्हणून काही भावना आहेत. माय लेकरांच्या थोर व पवित्र प्रेमाबद्दल ज्यांना म्हणून काही वाटत असेल, त्या सर्व लहान थोर बंधू भगिनींना ‘श्यामची आई’ हे कथात्मक पुस्तक आवडेल व ते हृदयाशी धरतील अशी मला आशा आहे’. साने गुरुजींना घडवणार्या त्यांच्या आईला तरी विसरून कसे चालेल? कारण लहान लहान गोष्टीमधून अनेक संस्कार व प्रसंग आईने शामला दिले.
लहानपणी आईने श्यामला घातलेली आंघोळ व श्यामने पायाचे तळवे पुसण्यासाठी केलेला हट्ट यातून आईने श्यामला हळुवारपणे दिलेली शिकवण दिसते. मुकी फुले, मोरी गाय, पत्रावळ, श्यामचे पोहणे या विविध गोष्टींतून भूतदया, स्वावलंबन, धीटपणा, धाडसीपणा संयमीपणा अशा अनेक संस्कारमय गोष्टींचा संगम या छोट्या छोट्या कथांमधून आढळतो. खरे तर आजच्या पिढीतील आईने आवर्जून वाचावं अशा प्रकारचं हे संस्कारमय पुस्तक आहे. या पुस्तकातील किमान एक एक गोष्ट जरी आपल्या मुलांना सांगितली तर निदान आपण मुलांना चांगल्या वागणुकीचे धडे देऊ शकतो.
आचार्य अत्रे एके ठिकाणी लिहितात, ‘जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी आईसंबंधी लिहिलेले असेल. कविता केल्या असतील, गोष्टी लिहिल्या असतील पण मराठी भाषेत साने गुरुजींनी ‘श्यामची आई’मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसर्या कोणत्याही वाङ्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही’.
करी मनोरंजन जो मुलांचे
जडेल नाते प्रभूशी तयांचे
असे म्हणणार्या साने गुरुजींनी मुलांना कथांमधून जणू काही जीवनाचे सार उलगडून दाखवले. बालकांसाठी विपुल असे साहित्य लिहिले. मुलांमध्ये देशभक्ती, मातृभक्ती या मूल्यांची रुजवण केली.
प्रेम हे जीवनाचे जीवन आहे. प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्यात परम आनंद असतो असे ते सांगण्यास विसरले नाही. त्याचबरोबर आपला देश बलशाली व्हावा सगळ्या विश्वात शोभून दिसावा असे त्यांचे स्वप्न होते.
साने गुरुजींचे जीवन मांगल्याने भरलेले होते .व मांगल्याची प्रेरणा देणारे होते. त्यांचे सारे साहित्य बालकांना राष्ट्रीय विचार देत आले आहे. जीवनभर आपल्या वाणीने व कृतीने सर्वांना मंगल विचार दिले.
१९३० मध्ये हिंदुस्थानात स्वराज्याच्या चळवळीने जोर धरला आणि गुरुजींनी माय भूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपण काहीतरी करावे असा निश्चय करून महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या सत्याग्रहात भाग घेतला. अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा व गांधीजींच्या चळवळीचा फार मोठा परिणाम गुरुजींच्या मनावर झाला. खानदेशात काँग्रेसच्या प्रचारासाठी गेले असता आचार्य विनोबा भावे यांचा परिचय झाला. गुरुजींची श्रद्धा विनोबा भावेवर होती. शेतकर्यांची चळवळ सुरू करून त्यांनी उपोषण केले. गुरुजींना अटक करून धुळ्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले कित्येक वेळा त्यांना तुरुंगात जावे लागले.
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला जोर चढत असता तरी देशातील भेदाभेद कमी झाले नव्हते. पंढरपूरचे मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून गुरुजींनी फार प्रयत्न केले. सत्याग्रह व उपोषण याचा अवलंब केला. साने गुरुजींनी आंतरभारतीचे भव्य स्वप्न पाहिले होते .आपले मन लोभ, भीती, द्वेष, मत्सर, क्रोध या विकारांपासून दूर राहावे असे ते सांगतात. गुरुजींनी बालमनावर संस्कार घडविले, त्यांना माणुसकीची शिकवण देऊन माणूस घडवले. म्हणूनच आजही गुरुजींच्या जाण्यानंतरही त्यांच्या कार्याचे महत्त्व व विचार नंदादीपासारखे अखंडितपणे तेवत आहेत.
गुरुजींचे परम शिष्य प्रकाशभाई मोहाडीकर यांनी पुढाकार घेऊन २४ डिसेंबर १९५१ रोजी दादर मुंबई येथे अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा शुभारंभ केला. गोव्यातही कथामाला पोहोचली. माधव पंडित यांनी एक ऑगस्ट १९६२ रोजी मडगावातून सुरू केलेल्या या कथामालेच्या चळवळीचा चांगलाच विस्तार झाला आहे.
आज संपूर्ण गोव्यामध्ये १८ केंद्र आहेत या १८ ही केंद्रावर विविध कार्यकर्ते आपापल्यापरीने अगदी नि:स्वार्थी वृत्तीने काम करत आहेत. साने गुरुजींनी बालकांसाठी, आपल्या समाजासाठी चिरंतन मूल्यांचा ठेवा दिला. आपल्या समाजाच्या हितासाठी समाजातील मूल्य संवर्धनासाठी जणू काही साने गुरुजीं निरंतर झटत राहिले.
गरिबीतही अगदी कष्टाने जीवन कसे जगावे आणि ह्या कष्टाची फळे चाखताना जो आनंद मिळतो त्या आनंदाला पारावार नाही आणि याची प्रचिती त्याने स्वतः घेतली होती. आपल्या सुसंस्कृत विचारांनी दुसर्यांना संजीवनी व चैतन्य देणार्या पूज्य साने गुरुजींना या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन! त्यांचे संस्काररूपी विचार आपण सगळ्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न करूया.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.