

मुकेश थळी
गणेश चतुर्थीचं आध्यात्मिक महत्व लक्षात घेऊन, भक्तीचे संस्कार या सर्व उत्सवातून दृढ व्हावेत. त्यासाठी जाणकारांची ज्ञानसंपन्न प्रवचनं व कीर्तनं यांचा अंतर्भाव गणेशोत्सव कार्यक्रमात व्हायला हवा.
माजिक आणि कौटुंबिक एकता साधणारा गणेश चतुर्थी हा गोव्याचा सर्वांत मोठा सण. नोकरी धंदा व्यवसायानिमित्त गोव्याबाहेर, विदेशातही असलेले काही गोवेकर या निमित्ताने आपल्या घरी येतात. चवथीचा हा उत्साह सध्या शिगेला पोचला आहे. चवथीच्या आधी एक महिना या सणाचे वेध लागतात. पुढचे ११ दिवस वातावरण भारीत असतं.
हल्ली चवथीचे बाजार भरू लागले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. माटोळीचे सामान एकत्रित स्तरावर मिळतं. जैवविविधतेच्या संवर्धनाचा एक प्रचंड संदेश या माटोळीतून मिळतो. मोदक, करंज्या म्हणजे नेवऱ्या हे चवथीचे विशेष पदार्थ. चवथीनिमित्त आम्ही एकत्र जमलो होतो. कुठल्या देशाच्या चलनी नोटांवर गणेशची प्रतिमा छापली आहे? मी माझ्या चुलतभावाला प्रश्न केला. त्याला माहीत नव्हतं. मी उत्तर दिलं, इंडोनेशिया. नंतर त्याला मी प्रश्न केला. सुखकर्ता दुखहर्ता, लवथवती विक्राळा या आरतींचे रचनाकार कवी कोण? त्याला जमलं नाही. या आरत्या समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिल्या आहेत. गणेश या विषयावर नंतर आम्ही एक प्रश्न मंजुषेचा खेळ केला. सर्वांनाच तो भारी आवडला.
सुमारे तीस प्रश्न असतील. त्यातील काही प्रश्न असे होते - पुढील नांवाच्या यादीत गणपतीचं नांव नाही असं एका देवाचं नांव आहे. कोणतं सांगा - लंबोदर, विनायक, गजानन, मुरलीधर. (मुरलीधर) श्रीगणेशाच्या दोन सुपुत्रांची नांवे सांगा. (शुभ अथवा क्षेम, लाभ) गणपतीच्या भावाची तिन्ही नांवे सांगा. (षडानन, कार्तिकेय, स्कंध) गणपतीच्या आईची अऩेक नांवे आहेत. पुढील यादीतील एक नांव त्यांचं नाही, कोणतं ते सांगा. पार्वती, गौरी, चामुंडा, नंदिनी, अंबिका. (चामुंडा). घराघरात संयुक्त कुटुंबात, मूळ घरी लोक जमतात. तिथं पत्त्यांनी खेळतात. इतर मनोरंजनाचे कार्यक्रम करतात. त्यात हा एक करावा - गणेश क्वीझ. सार्वजनिक गणपती उत्सवात अशा प्रश्नमंच स्पर्धा व्हाव्यात. इतके कार्यक्रम होतात, त्यात हा ज्ञान व माहिती देणारा कार्यक्रम असावा. क्वीझ कार्यक्रमात एक थ्रिल असतं. नव्या पिढीला सणाविषयी, गणेशदेवाविषयी जाणून घ्यायला संधी मिळेल.
गोव्यात हल्ली सार्वजनिक गणपती उत्सव वाढलेले आहेत. या ११ दिवसांच्या कार्यक्रमात दर दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम तसंच विविध स्पर्धा होतात. काही ठिकाणी स्कूल, कॉलेज मुलांसाठी प्रश्नमंच स्पर्धा होतात. ही स्वागतार्ह बाब आहे. क्वीझसाठी गोवा हा विषय आत्यंतिक समर्पक आहे. गोव्याचा इतिहास, भूगोल, संस्कृती, राजकारण, चालू घडामोडी आणि इतर वृत्त या विषयावर क्वीझ घेतलं तर ती उत्तरं सर्व प्रेक्षकांच्याही लक्षात कायम राहतील. मडगांवला सार्वजनिक गणपती उत्सवात काही वर्षांमागे अशा प्रश्नमंच स्पर्धा मी घेतल्या होत्या. प्रतिसाद उत्तम होता.
गोव्यात काही सार्वजनिक उत्सवात कथ्थक व इतर नृत्य यांचा समावेश केलेला आहे. नृत्य शिकणाऱ्या मुलांना व्यावहारीक स्तरावर यातून खूप काही शिकता येईल. गायन वादन ऑर्केस्ट्रा असतातच. घुमट आरती स्पर्धातून नवी पिढी या वाद्याचं जतन करताना दिसत आहे ही समाधानाची बाब. भजन स्पर्धातून पखवाज वाद्याचं संवर्धन होत आहे. युवक युवती पखवाज वादनात प्रशिक्षित होत आहेत. गोव्याच्या मातीत लय आहे. संगीत आहे. ते तरूणाईनं पकडलं आहे. उत्तमच.
वक्तृत्व स्पर्धेसाठी पर्यावरण संरक्षण, संस्कृतीचं रक्षण असे विषय जागृती करणारे ठरतात. गोव्यातील ज्वलंत विषयावरही वक्तृत्व स्पर्धा घेता येईल. रांगोळी, चित्रकला पेंटींग या स्पर्धा घेऊ शकतो. होत आहेत. सार्वजनिक गणेश उत्सवाचे कार्यक्रम सांघिक म्हणजे टीम भावनेने, प्रेमाने, सद्भाव व स्नेहपूर्ण सेवाभावाने होतात व व्हावेत. शेवटी एकच, गणेश चतुर्थीचं आध्यात्मिक महत्व लक्षात घेऊन, भक्तीचे संस्कार या सर्व उत्सवातून दृढ व्हावेत. त्यासाठी जाणकारांची ज्ञानसंपन्न प्रवचनं व कीर्तनं यांचा अंतर्भाव कार्यक्रमात व्हावा, हीच सदिच्छा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.