Goa Politics: गोव्यात विरोधक एकत्र येऊ शकतील?

Goa assembly elections 2027: रामा काणकोणकरांवर झालेल्या खुनी हल्ल्यामुळे विरोधक एकत्र आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यावरून राजकीय विश्लेषकांचे तर्क वितर्क वर्तविणेही सुरू झाले आहे.
Yuri Alemao, Vijai Sardesai
Yuri Alemao, Vijai Sardesai Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

रामा काणकोणकरांवर झालेल्या खुनी हल्ल्यामुळे विरोधक एकत्र आल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. त्यावरून राजकीय विश्लेषकांचे तर्क वितर्क वर्तविणेही सुरू झाले आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे आगामी निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले तरच भाजपची डाळ शिजणे कठीण होईल. गेल्या दोन निवडणुकीचा अभ्यास केल्यास हेच चित्र दिसून येते.

२०१७साली भाजपला फक्त १३ जागा मिळाल्या होत्या. पण असे असूनसुद्धा ते सरकार स्थापन करू शकले याचे कारण म्हणजे कॉंग्रेस आमदारांमधली सुंदोपसुंदी. मुख्यमंत्री पदाकरता सुरू झालेली त्यांच्यामधली रस्सीखेच भाजपच्या पथ्यावर पडली. धूर्त मनोहर पर्रीकर मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांच्या साहाय्याने सरकार स्थापन करून मोकळे झाले. याचा अर्थ भाजपला सरकार स्थापन करायला कॉंग्रेसने मदत केली असाच होतो.

जनतेने १७ व त्यावेळी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आलेले पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे धरून १८ आमदार देऊनही जर कॉंग्रेस सरकार स्थापन करू शकले नाही, याला काय म्हणावे तेच कळत नाही. २०२२सालीही असेच झाले. केवळ ३३% मतदान मिळूनसुद्धा भाजप सत्तेवर येऊ शकला तो केवळ विरोधकांच्य एकत्र न येण्यामुळे!

भाजपला २० जागा मिळाल्या असल्या तरी त्यापैकी सहा जागा भाजपने अगदी कमी फरकाने जिंकल्या होत्या हे विसरता कामा नये. विरोधक एकत्र आले असते तर गेल्या निवडणुकीतही वेगळे चित्र दिसले असते. विरोधकांच्या वाट्याला ६७% मते येऊनसुद्धा ते फक्त १५ जागा (कॉंग्रेस ११, आप २, गोवा फॉरवर्ड आणि आरजी प्रत्येकी एक) प्राप्त करू शकले याचे कारण एकवाक्यतेची कमतरता, हेच गेल्यावेळी मिळालेले मतांचे आकडे सांगतात. यावरून ’डिव्हाइड अँड रुल’ हा भाजपचा फॉर्मुला बनत चालला आहे.

२०१२सालचा अपवाद वगळता गोव्यातील जनतेने भाजपला कधीही स्पष्ट बहुमत दिलेले नाही. त्यावर्षी दिले होते ते केवळ मनोहर पर्रीकरांच्या करिश्म्यामुळे. नंतर २०१७साली झालेल्या निवडणुकीवेळी पर्रीकर संरक्षण मंत्री होऊन दिल्लीला गेले आणि तो करिश्मा संपुष्टात आला. आता भाजपजवळ पर्रीकरांसारखा धडाडीचा नेता नाही ही वस्तुस्थिती कोणच नाकारू शकणार नाही. म्हणूनच तर आता त्यांच्याकडे विरोधकांमध्ये दुही माजवणे हा एकच पर्याय शिल्लक उरल्याचे दिसते.

एवढे करूनही जर बहुमत मिळाले नाही, तर मग विरोधी आमदारांना भाजपमध्ये आणणे हा दुसरा पर्याय ते वापरायला लागले आहेत. केंद्रात भाजप सरकार असल्यामुळे कॉंग्रेसचे आमदार त्यांच्या गळाला लागतही आहेत. म्हणूनच तर आता भाजप ‘कॉंग्रेसयुक्त’ झाला आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, सुभाष फळदेसाई आणि रमेश तवडकरांचा अपवाद वगळता इतर सर्वजण पूर्वी कॉंग्रेस सरकारात मंत्री होते.

म्हणजे आज सरकार भाजपचे असूनसुद्धा मुखवटा कॉंग्रेसचा दिसतो. खरे सांगायचे तर राज्यात अजूनही काही मतदारसंघात कॉंग्रेसचे वर्चस्व अधोरेखित होत आहे. खास करून दक्षिण गोव्यात याचा जास्त प्रत्यय येत आहे. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात ही गोष्ट सिद्ध झालेली आहेच. त्यामुळे कॉंग्रेसला जर आम आदमी, आरजी, तृणमूल, गोवा फॉरवर्ड यांसारख्या पक्षांची साथ मिळाली आणि कॉंग्रेसने ती घेतली, तर ते भाजपला धोबीपछाड देऊ शकतात.

परवाच्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातील मतदारांनी ही गोष्ट दाखवून दिली आहेच. पण प्रश्न आहे तो विरोधी पक्ष एकत्र येणार की नाही हा. परवाच्या रामा काणकोणकरांच्या प्रकरणाने विरोधी पक्ष एकत्र येण्याची आशा दाखविली असली तरी ही एकीची नांदी ठरते की भैरवी, ते बघावे लागेल. आपचे तर सध्या ’तळ्यात मळ्यात’ सुरू आहे.

आपचे गोवा अध्यक्ष अमित पालेकर हे परवाच्या एका मुलाखतीत युतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवत असताना त्यांच्याच दोन्हीही आमदारांनी दिल्लीचे ‘निवडणूक प्रकरण’ काढून कॉंग्रेसशी असहकार करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे युतीबाबतचा गोंधळ वाढू लागला आहे. मागच्या वेळी कॉंग्रेसनेच अति महत्त्वाकांक्षेपोटी युतीकडे पाठ फिरवली होती. आपण स्वबळावर निवडून येऊ या गैरसमजुतीमुळे त्यांनी युतीच्या प्रस्तावाला नारळ दिला होता.

मांडवी- जुवारी पुलांखालून गेल्या काही वर्षांत बरेच पाणी वाहून गेले आहे. गोव्यात आता कॉंग्रेसची स्थिती, पूर्वीसारखी राहिलेली नाही. हे जोपर्यंत कॉंग्रेसला समजत नाही तोपर्यंत कॉंग्रेस ’मुंगेरी लाल की हसीन सपने’ बघत राहणार आणि पक्षाबरोबर राज्याचेही नुकसान करणार हे निश्चित आहे. आज राज्यात भाजपची स्थिती समाधानकारक नाही असे त्यांचेच कार्यकर्ते बोलताना दिसतात. वाढती बेकारी, गुन्हेगारी, मागच्या काही घोषणांची न झालेली अंमलबजावणी, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मिळणारी सापत्न वागणूक, यामुळे राज्यात भाजपविरोधी वातावरण तयार व्हायला लागले आहे.

Yuri Alemao, Vijai Sardesai
Goa Politics: '2027 मध्ये भाजपचे 27 आमदार येणारच'! मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; तेंडुलकरांचे केले कौतुक

मागच्या निवडणुकीवेळी भाजपने महिलांना तीन स्वयंपाकाचे सिलिंडर मोफत देणार अशी घोषणा केली होती. अजूनही हे सिलिंडर गृहिणींना मिळालेले नाहीत. परवाच्या एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी भाजपच्या महिला नेत्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपच्या ’त्या’ महिला नेत्यांचा श्‍वास, नाकातोंडात चुलीचा धूर गेल्यागत कोंडला व काय ’अवस्था’ झाली हे सर्वांनी बघितले आहे.

Yuri Alemao, Vijai Sardesai
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांचे भोजन

असे अनेक मुद्दे सध्या त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत. यावरून परिस्थिती भाजपला अनुकूल नाही हे स्पष्टपणे प्रतीत होत आहे. पण प्रश्न आहे तो विरोधी पक्ष याचा फायदा घेण्याच्या स्थितीत आहेत की नाही हा! विरोधकांनी दहा दिशांना आपली तोंडे ठेवली तर परिस्थिती प्रतिकूल असूनसुद्धा २०२२प्रमाणे २०२७सालीही भाजप परत सत्तेवर येऊ शकतो. त्यामुळे चेंडू सध्या विरोधकांच्या रिंगणात आहे. आता हा चेंडू ते कसे टोलवतात, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकेल एवढे निश्चित!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com