संपादकीय: ‘ते’ आले अन् गेले!

Rahul Gandhi Goa Visit Analysis: राहुल गांधी येतील, राजकीय वातावरणनिर्मिती करतील व गोमंतकीयांच्या मनातील अस्‍वस्‍थतेला वाचा फोडतील, ही अपेक्षा भंग पावली आहे.
Rahul Gandhi Goa Visit Analysis
Rahul GandhiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

राहुल गांधी येतील, राजकीय वातावरणनिर्मिती करतील व गोमंतकीयांच्या मनातील अस्‍वस्‍थतेला वाचा फोडतील, ही अपेक्षा भंग पावली आहे. गोव्याची पर्यावरणीयदृष्ट्या वाताहत होत असताना राहुल म्हादईच्या मुद्यावर ठाम भूमिका मांडतील, कर्नाटक सरकारला आपली आडमुठी भूमिका बदलण्यास भाग पाडतील, असे जनतेला वाटत होते. कर्नाटकात पाण्याचे भीषण दुर्भिक्ष असले तरी गोव्याच्या हक्काचे पाणी वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गोव्याकडे (Goa) येणारे जलप्रवाह अन्यत्र वळवण्याचे प्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत. गोवा हे आकाराने छोटे राज्य आहे. अशा लहान राज्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ठोस धोरण असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने, तसे घडलेले नाही. म्हादईचे पाणी म्हणजे गोव्याच्या भवितव्याची हमी. तिचे रक्षण करण्यात अपयश आल्‍यास त्याचे परिणाम पुढील पिढ्यांनाही भोगावे लागतील. त्‍यावर राहुल यांनी अवाक्षर काढलेले नाही, ही बाब खटकणारी आहे. त्यांच्याकडून अपेक्षा होती; कारण देशात सामाजिक स्थित्यंतराचे आव्हान उभे असताना ते राष्ट्रीय राजकीय नेतृत्वाची धुरा सांभाळत आहेत.

Rahul Gandhi Goa Visit Analysis
Rahul Gandhi Goa Speech: 'गोवा बनले भ्रष्टाचाराचे केंद्र', राहुल गांधींचा भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; खाणकाम, जमीन आणि बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

‘सीजेपी’च्या आंदोलनाच्या माध्यमातून तरुणाई न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरली आहे. कारवाईची पर्वा न करता अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांचे धैर्य कौतुकास्पद आहे. परीक्षांच्या नियोजनातील गंभीर त्रुटींकडे आंदोलनामुळे सरकारला गांभीर्याने पाहावे लागले. मतचोरीच्या मुद्द्यावरही सरकारविरोधात आवाज बुलंद केला जात आहे. या आघाड्यांवर राहुल गांधी तरुणांच्या सोबत उभे राहत आहेत, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. त्यामुळे त्यांची राष्ट्रीय प्रतिमा उंचावत आहे. अर्थात यापूर्वीही त्यांनी देशभर ‘भारत जोडो यात्रा’ काढली; तरीही भाजपला निवडणुकांत यश मिळाले. त्‍याचा अभ्‍यास मात्र राहुल यांनी केलेला नाही.

Rahul Gandhi Goa Visit Analysis
Rahul Gandhi Women Statement: 'स्त्री ही कोणाचीही मालकी नाही'; राहुल गांधींच्या विधानापलीकडचा पुरुषसत्ताक व्यवस्थेवरील गंभीर सवाल

गोव्यात आज अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. पर्यावरणाची हानी, भ्रष्टाचार, वाढते स्थलांतर, हरवत चाललेला गोव्याचा सांस्कृतिक चेहरा व म्हादईच्या रक्षणाचे आव्हान जनतेला भेडसावत आहे. असे असताना काँग्रेसला जनतेचे संघटन करता आलेले नाही. विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच गिरीश चोडणकरना पॅराशूटने गोव्यात उतरवण्यात आले. आपण आल्‍यावर काही तरी निराळे घडत आहे व त्‍याद्वारे आपले अस्‍तित्‍व दिसावे, यासाठी त्‍यांनी राखण यात्रा काढली. पण त्‍यातून साध्‍य काय झाले? यात्रेच्या माध्यमातून स्थानिकांच्या अपेक्षा, कथा आणि व्यथा किती जाणून घेण्यात आल्या? त्‍याचे प्रतिबिंब काँग्रेसच्या भूमिकेत कुठे दिसले?

Rahul Gandhi Goa Visit Analysis
Rahul Gandhi: "सेंट झेवियर आपल्याला शांततेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देवो!" राहुल गांधींनी गोमंतकीयांना दिल्या 'फेस्ताच्या शुभेच्छा'

भ्रष्टाचाराने पोखरलेल्या व्यवस्थेला पर्याय देण्याची ठाम इच्छाशक्ती काँग्रेसच्या नेतृत्वात दिसली का? उलटपक्षी ‘आपले तिकीट नक्‍की’ या धारणेत मश्‍‍गुल बहुतांश नेते दिसले, यात्रेत उफाळून आलेलेले रुसवे फुगवे लोकांनी ‘लाईव्‍ह’ पाहिले. त्यामुळे ही यात्रा जनतेच्या प्रश्‍‍नांपेक्षा नेत्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांचीच अधिक चर्चा घडवून गेली, अशी भावना निर्माण झाली.

केवळ रस्ते पालथे घालून व घोषणा देऊन जनतेचा विश्वास संपादन करता येत नाही. गोव्याला वाचवण्यासाठी नेमका काय आराखडा आहे, याचे उत्तर काँग्रेसकडे असायला हवे होते. परराज्यांतून वाढणारे स्थलांतर, गोव्याची बदलती लोकसंरचना, पर्यावरणाचा ऱ्हास आणि स्थानिकांच्या हक्कांवरील प्रश्‍‍न याबाबत नेमके काय वेगळे करणार, याची ठोस मांडणी राहुल गांधी करू शकले नाहीत. गोवा वाचवण्यासाठी आदिवासी समाजाने उभारलेली आंदोलने असोत किंवा ‘इनफ इज इनफ’सारखी जनचळवळ, या संघर्षांचा उल्लेखही राहुल यांच्या भाषणात नव्‍हता. स्थानिकांच्या आंदोलनांशी एकरूप होऊन त्यांच्या मागण्यांना राष्ट्रीय व्यासपीठ देण्याची संधी त्यांच्याकडे होती. मात्र, ती त्यांनी गमावली. ‘गोवा विकू देणार नाही’ हे वाक्य टाळ्या मिळवून देऊ शकते. पण त्‍यासाठी नेमके काय करणार, कोणत्या धोरणात्मक उपाययोजना राबवणार? पर्यावरणाचा विध्वंस कसा रोखणार, याची उत्तरे नसतील, तर ती केवळ टाळ्यांसाठी केलेली घोषणा ठरते.

Rahul Gandhi Goa Visit Analysis
Rahul Gandhi: हिंदू धर्म अन् अहिंसेच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींना धर्मगुरुंनी घेरले; अभ्यास करण्याचा दिला सल्ला

बदल घडवायचा असेल, तर सत्ता हे साधन आहे. पण सत्ता मिळवण्यासाठी निवडणुका जिंकण्याचे तंत्र आत्मसात करावे लागते. राजकीय गणिते जुळवावी लागतात, मतांची गोळाबेरीज करावी लागते, योग्य वेळी योग्य आघाड्या उभाराव्या लागतात. बलाढ्य भाजपला पराभूत करायचे असेल, तर विरोधकांच्या एकजुटीला पर्याय नाही. २०१७ मध्ये सत्ता हाताशी आलेली असतानाही ती गमावलेल्या काँग्रेसवर जनतेने पुन्हा विश्वास का ठेवावा, याचे उत्तर पक्षाला द्यावे लागेल. राहुल गांधी यांचे राष्ट्रीय राजकारणातील अस्तित्व उंचावत असताना गोव्यातील त्यांचा दौरा मात्र ठोस राजकीय परिणाम घडवू शकला नाही. स्थानिक संघर्षांशी प्रभावी नाळ जोडलेली नाही आणि सत्तेत आल्यास काय करणार याचा स्पष्ट आराखडाही नाही.

Rahul Gandhi Goa Visit Analysis
Rahul Gandhi: ''त्यांना आजचा तरुण दिवसभर मोबाईलवर राहणारा, जय श्री राम म्हणणारा अन्...''; राहुल गांधींचा मोदींना टोला

अशा परिस्थितीत राखण यात्रेचा समारोप हा काँग्रेससाठी आत्मपरीक्षणाचा क्षण ठरायला हवा होता. गोमंतकीयांना कृतीची खात्री हवी आहे. गोवा वाचवण्याची क्षमता - इच्छाशक्ती हवी आहे. मडगावातील राखण यात्रेच्या समारोपानंतर जनतेच्या पदरी पडलेली निराशा हाच या दौऱ्याचा खरा निष्कर्ष आहे. राहुल गांधी आले, भाषण झाले, यात्रा संपली. गोमंतकीयांच्या मनात एकच भावना उरली- राहुल आले अन् गेले!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Rahul Gandhi Goa Speech
Rahul Gandhi Silent On Mhadei Dispute
Mahatma Gandhi Jayanti 2026
Rahul Gandhi Pune Speech
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com