Goa Economy: पूर्वी भव्य वृक्षाखाली दगड ठेवला की तो 'राखणदार' व्हायचा, जगण्यातून विसरला गेलेला साधेपणा

Goa Opinion: प्रत्येक अर्थव्यवस्था ही तेथील प्राथमिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते.‌ शेती, पशुपालन, मच्छीमारी यासारख्या प्राथमिक व्यवसायांवर आधारुनच आजचे आधुनिक व्यवसाय विकसित झालेले आहेत.‌
Economic growth in Goa
Goa primary economyDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. प्रदीप सरमोकादम

प्रत्येक अर्थव्यवस्था ही तेथील प्राथमिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते.‌ शेती, पशुपालन, मच्छीमारी यासारख्या प्राथमिक व्यवसायांवर आधारुनच आजचे आधुनिक व्यवसाय विकसित झालेले आहेत.‌  ज्यांनी राने वसवली आणि माणसाला राहण्याजोगी केली तो मूळ भटके समाजच होता. रानातील कुठले कंद कसे खावेत याचा शोध त्यांनी स्वतःवर प्रयोग करूनच लावला असेल.

हे काम एखाद्या शास्त्रज्ञाइतकेच महत्त्वाचे आहे. पोटॅशियम सायनाईडमधील विषाच्या तिव्रतेचे प्रमाण समजून घेण्यासाठी कितीतरी वैज्ञानिकांनी स्वतःचा प्राण गमावला असेल.

त्या शास्त्रज्ञांप्रमाणेच रानातील कुठली कंदमुळे खाण्यायोग्य आहे हे समजून घेण्यासाठी कितीतरी आदिम मानवांनी आपले प्राण गमावले असतील. त्यांच्यामुळेच 'अन्नसुरक्षीतते'ची वर्दी समाजाला प्राथमिक स्तरावर लाभली हे आपण विसरता कामा नये. 

आदि मानवाने मिळवलेले हे ज्ञान दोन विभागात वाटले गेले आहे- एक लिखित ज्ञान (codified) आणि अलिखित ज्ञान (uncodified). आयुर्वेदासारखे शास्त्रीय ग्रंथ अनेक अनामिक संशोधकांच्या कामातून निर्माण झाले तर ज्या समाजाकडे लिहिण्याची, दस्तऐवजीकरण करण्याची किंवा शास्त्रीय चाचणी करण्याची क्षमता नव्हती किंवा जे समाज वेगळे आणि अलग राहिले त्यांचे ज्ञान मात्र त्यांच्यापुरतेच मर्यादित राहिले. 

‘जीवो जीवस्य जीवनम्' हे जरी जीवनसाखळीचे सूत्र असले तरी पोट भरल्यानंतर रानातील जनावरे एरवी त्यांचा आहार असलेल्या भक्ष्याकडेसुद्धा साधे ढुंकून देखील पाहत नाहीत. प्राथमिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेला माणूस देखील असाच जगत आला आहे.

'मिनीमिलिस्ट' असे ज्यांच्याबद्दल आपल्याला म्हणता येईल असा केवळ हाच समाज आहे. अवतीभवती उपलब्ध असणाऱ्या घटकांवरच त्यांनी आपली गुजराण केली आहे आणि ती करत असताना त्यांनी निसर्गाची शाश्वतताही राखण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे. माशांची अंडी किंवा छोटी पिल्ले मच्छीमारांच्या आहाराचा भाग कधीच नव्हती हे आपण लक्षात घ्यायला हवे. मत्स्य संवर्धनासाठी आपल्याला मात्र अलीकडच्या काळात समुद्रावर मासेमारी बंदी कायद्याने लागू करावी लागते. 

आज अर्थव्यवस्था प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. 'स्मॉल इज ब्युटीफूल' या तत्त्वाचे अनुसरण करायचे झाल्यास, ‘निसर्गसंपदेचा शहाणपणाने वापर’ ही निसर्ग विज्ञानातील एक मोठी संकल्पना आहे.

याचे उदाहरण म्हणजे एखादे जनावर मेले ही त्याच्या मांसाचा, त्वचेचा, हाडांचा, वापर उपयुक्तपणे कसा करावा याचे ज्ञान प्राथमिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेल्या समाजाला होते. होते. वर्षभर मोसमानुसार आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या भाज्या त्यांचे पोट भरण्यासाठी समर्थ होत्या. खऱ्या अर्थाने ही अर्थव्यवस्था स्वावलंबी म्हणावी अशी होती. सांगायचे झाल्यास, बेळगावहून भाजी आली नाही तरी त्यांच्यापैकी कोणीही उपाशी मेले नसते.

कुठल्याही वस्तूचा 'संचय' न करणाऱ्या या संस्कृतीत घरी अचानक पाहुणे आले तरी त्यांच्या पोटात चार घास पडतील याची तजवीज त्यातील माणसे सहज करत होती. घराच्या परसदारी असलेल्या मांडवावरील तोंडली किंवा दुधीभोपळा तेव्हा त्यांच्या स्वयंपाक घरात शिजत असे किंवा मातीच्या मडक्यात असलेली ठेवणीतील कंदमुळे अशावेळी उपयोगात येत असत.

औषधोपचारासाठी लागणाऱ्या गोष्टींचीही तजवीज त्यांनी केलेली असायची.‌ अडुळशाचे झुडूप जवळपास असायचे, घरात मध असायचा, जखम झाली असता चानविड्याचा सालीचा डिंकसदृश्य रस त्यावर लावायचा हे त्यांना ठाऊक होते. अशा प्रकारे त्यांची 'लाईफ सपोर्ट सिस्टम' जय्यत तयार होती. सुईणीना आणि वखदळीना (औषधोपचार करणारे) रानावनातील औषधी वनस्पतींची माहिती होती. ती माहिती वारसाहक्काने पुढे चालू राहायची. 

त्यांचे सारे जीवनच अशा प्रकारे निसर्गावर अवलंबून होते. म्हणून त्यांचे देव हे मोठ्या मंदिरात नव्हते. एखाद्या भव्य वृक्षाखाली अनोख्या रचनेचा दगड स्थापन केला गेला की तो त्यांचा 'दैवी' राखणदार ठरत असे.

Economic growth in Goa
Goa Culture: गोव्यात ढोल- घूम वाजणे बंद झाले, त्याची जागा 'वेस्टर्न ड्रम्स'नी घेतली; सांस्कृतिक प्रदूषण?

त्यांचा धर्म 'प्रमाणित' नव्हता. शेवटी देव श्रद्धेतच असतो, नाही का? भावनिक, शारीरिक, सामाजिक गरजांचा विचार केल्यास त्यांच्या सणांच्या साजरीकरणातही खरीखुरी उदात्तता होती. काणकोण तालुक्यातील खोतीगावाता 'कोडवाची परब' नावाचा सण साजरा होतो.

या सणाच्या वेळी तिथले सारे आदिवासी रानात जातात आणि तेथील विविध प्रकारची कडू पाने एकत्र करून त्याचा रस काढतात. गावातील प्रत्येक जण हा रस  पितो. या सणासाठी गावातील साऱ्या माहेरवाशीणी गावात आवर्जून येतात. त्यांना त्यादिवशी गावात विशेष मान असतो.‌ उपजत लिंग समानतेचे हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

Economic growth in Goa
Goa Culture: गोव्याचा सांस्कृतिक ठेवा धोक्यात? वेळुझ येथील गजलक्ष्मीचे अर्धवर्तुळाकार शिल्प उपेक्षेच्या छायेत

आज आम्ही आमचा हा साधेपणा विसरून गेलो आहोत. कृत्रिमतेच्या हव्यासातून आम्ही एक वेगळे पारतंत्र्य पत्करले आहे. स्वयंपूर्ण प्राथमिक जीवनशैली आज हरवून गेलेली आम्ही पाहतो आहोत. माडावर चढणारे माडली, पाडेली हे देखील या प्राथमिक अर्थव्यवस्थेचे भाग होते. आज बहुचर्चित असलेली 'हरित कौशल्य' ही संकल्पना त्यावेळी नैसर्गिक जीवनशैलीचाच भाग होती.

रानात हाके घालणारे 'हाकारे' देखील शिकारीतील तज्ज्ञ असायचे. औद्योगीकरणामुळे आणि आधुनिकीकरणामुळे आपली ही ओळख नाहीशी होत चालली आहे.‌ म्हणून ‘जतन आणि संवर्धन’ हे तत्व सांभाळण्याची खरी गरज आज उत्पन्न झाली आहे. आपणाला एक जबाबदार वापरकर्ता बनवून जीवनाचा आस्वाद घ्यायचा आहे व त्याची वेळ आली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com