
विनायक खेडेकर
संगीत यात केवळ गीत गायन, फक्त वाद्य वादन तसेच गायनाला वाद्यसाथ या तिन्ही प्रकारांचा समावेश आहे. शास्त्रात ‘गीतं वाद्यं तथा नृत्यं त्रयं संगीतमुच्यते‘ असे सांगितले आहे. लोकसंगीतात वाद्यसाथ असा प्रकारच नसून तेथे दोन्ही घटक समान आहेत. शिगमा या लोक-उत्सवात मांडावर फक्त वाद्य वादन हा विधी आहे.
शिगम्याच्या दिवसांत रोज मांडावर प्रथम ढोल, ताशा, कासाळे यांचे वादन मागाहून तालगडीची किमान एक फेरी झाल्यानंतर देवतांसमोर वा लोकांघरी खेळायला जायचे, ही प्रथा. असे वाजविणारे व नाचणारे एकत्र असतात याला मध्य गोमंतकात ‘मेळ‘, उत्तरेत ‘रोमाट‘व दक्षिण गोव्यात ‘खेळ‘ अशी संज्ञा आहे. अलीकडे वृत्तपत्रांनी सगळ्यालाच ‘रोमट’ वा ‘रोंबाट‘ शब्द प्रचारात आणला आहे. प्रदूषण?
जागर व रणमाले या दोन लोकनाट्य प्रकारात तालवाद्य संगीताची साथ असते. रणमालेत बहुधा फक्त ढोल हे एकमेव वाद्य. गावडा जागरात थोडी निराळी प्रथा आहे.
येथे घुमट - एकाहून अधिक, डोब, कासांळे अगर झांज असा सरंजाम असतो. यातच किंवा स्वतंत्र असा गायक. जो गीतगायनातून मंचावर येणाऱ्या पात्राची ओळख करून देतो. कधी गीताचे पहिले कडवे त्याने म्हणायचे तर पुढील गीत मंचावरील पात्राने म्हणावयाचे अशा पद्धतीने रात्रभर जागर होतो.
लोक-परंपरेतील संगीत, नृत्य, नाट्य कोणत्याही प्रकारात गायकासह साथीची इतर वाद्ये एका बाजूला -बहुधा मंचाच्या डाव्या बाजूला - उभी राहून संहितेतील गीते म्हणत. विद्यमान काळात बंदिस्त जागेत, ठरावीक आकाराच्या मंचावर सादर करताना गायक वादक बाजूला उभे करणे; याची गरज भासते. यालाही प्रदूषण म्हणावयाचे का?
जुन्या काळी ढोल, घूम अशी मोठी वाद्ये बैलाच्या चामड्याने मढविली जायची. हे काम करणारी परवार ही आताच्या कालात दलित जमात, परंपरेने काम करणारी. यांच्या गावातच आड बाजूला स्वतंत्र वस्त्या. पण बारा वांगडात त्यांना स्थान. ग्रामसंस्थेने यांच्यासाठी जमिनी सोडलेल्या. विद्यमान काळात, त्यांचे काम थांबलेले. परिणामी बाजारात मिळणारे ‘वेस्टर्न ड्रम्स‘ आले. नाद, ध्वनी सगळेच बदलले. हेही प्रदूषण?
प्रमुख गायकाला काही ठिकाणी, यात लग्नगीते वा धालो, धिल्लोसम प्रकारातील महिला गायिकेलाही ‘गाणेली‘ काही ठिकाणी ‘गानेली‘अभिधान आहे. इतरांना पेलेल असा परंपरेने ठरल्या स्वरात-पीचमध्ये-गीत गायन होते. ध्वनिमुद्रण करून केलेल्या अभ्यासानंतरचे निष्कर्ष सांगतात ही दहा-बारा वर्षानंतरही त्या गाणेलीने तोच ठरला स्वर-पीच पकडला.
अर्थात ही घटना-अभ्यास ऐंशीच्या दशकातील आहे. श्रमगीते सोडून. स्वतंत्र गायन नाही. त्याला नृत्य वा पदन्यासाची साथ असते. दळणाला जात्याची घरघर, कांडताना मुसळाचा ठेका, श्रमपरिहारार्थ गाईलेल्या गीतांना - शेतकाम आदी - त्या त्या कामाची लय-ठेका मिळतो. परंपरागत संगीतात कालो नाट्य व पेणे-सुरात लावलेले मृदंग वा पखवाज यावरील थाप गाण्याला पीच देतात. ढोलकी भजनात हे काम करते. अशा ठिकाणी ‘ड्रमसम‘ वाद्ये आली तरी लोकसंगीतात सोबत करणारे वाद्य काही वेळा कामी येते.
धिल्लो, धालो असे महिलांचे उत्सव. फुगडी खेळ असे नृत्य प्रकार यात कधीही कोठेही वाद्यसाथ नाही. हे सर्व पूर्ण जबाबदारीने, नशापाणी न करता केलेे आहे का?
अशा सवालाला उत्तर नसलेली अशी, नीटपणे नोंदवावी अशी घटना, बहुधा सत्तरच्या दशकातली. कलाअकादमीने आयोजित केलेला विभागीय लोककला महोत्सव, केपे तालुका. ‘लोककला‘ असले काही असते, हे बऱ्याच लोकांना माहिती नसण्याचा काळ.
आधी माहिती गोळा करून त्या त्या गावी जाऊन वा तेथील जाणकारांकडून, व्यक्तिशः फिरून कलाकार मेळ-पथकांना महोत्सवात भाग घेण्यासाठी प्रवृत्त करायचे. येण्या-जाण्यासाठी पिकअप्चा खर्च व ठरले मानधनही. तरी नकारच. ‘ते देवा-धर्माचे, मांड-मानकरी, ‘धाजण’, ‘कोमीसांव’ अशांना विचारायला हवे वगैरे.
या संदर्भात घडलेला प्रकार महत्त्वपूर्ण असा आहे. डिचोलीतील घोडेमोडणी, पाहुण्यांसाठीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आवश्यक होती. कलाकारांचे म्हणणे ‘घोडे देवाजवळ ठेवलेले, परंपरेने ठरलेल्या दिवसाखेरीज काढता येत नाहीत‘. माझे सांगणे होते, आपण देवाला विचारूया. तेथे होकार आला तर पणजीत येऊन सादर करायची तयारी आहे का?’
सामुदायिक स्वरात ‘हो’ आले. ही पद्धती अशी होती की, समान पद्धतीने बांधलेल्या कागदी तुकड्याच्या दोन पुड्या; एकीत तुळशीचे पान तर दुसरीत फूल. या पुड्या देवासमोरच्या उंबऱ्यावर ठेवायच्या. नेहमीचा पुजारी देवाला ‘गाराणे’ घालून पुडी मागतो. अजाण बालकाने त्यातील एक पुडी उचलून गुरवाहाती द्यायची.
तुलसीपत्र आले तर ‘हो’ आणि फूल आले तर ‘नाही’, ‘नको’ हा ठरलेला अर्थ. माझ्यासह सर्व माणसे ग्रामदेवतेकडे गेली. तेथे पुड्या टाकण्यात आल्या. गाराण्यात ‘घोडेमोडणी राजधानी पणजीत नेऊन पाहुण्यासमोर सादर करावी का?’, असे विचारण्यात आले. माझी खात्री होती त्यानुसार देवाचा होकार आला.
अनेक ठिकाणी हे सांगायला मिळाले की तुम्ही देवाला विचारा, तो कधीच नाही/नको म्हणणार नाही. ही मात्रा लागू पडली. कार्यक्रम सादर करणाऱ्या लोकांना लोककला महोत्सवात भाग घेणे सोपे झाले.
केपे महोत्सव निमित्त अवेडे नामक वाड्यावर ख्रिस्ती गावडा महिलांचे पथक कळवले. ते आले. त्यांनी काही खेळ केले. ताल-लयीवर पूर्ण हुकूमत, गीतांचे स्पष्ट शब्दोच्चार, दमदार पदन्यास व हालचालीत कमालीची विविधता; हा कला अकादमीचा ‘फेवरेट ग्रुप’ झाला. परंतु वाद्यसाथ नसल्याने तो उघडा-बोडका वाटत होता. दुसरे व्यावहारिक कारण असे होते की, पुरुषांच्या सोबतीखेरीज वाड्यावरील बायका-मुलींनी दूर, कधी भारताच्या इतर भागात जाणे प्रशस्त, शिष्टसंमत नव्हते. पूर्ण विचारांनी या खेळाला किमान घुमट व झांज एवढी वाद्यसाथ द्यावी, असे ठरवले. त्यांचाही ठेक्याचा पदन्यास होत असल्याने पहिल्यांदाच पाहणाऱ्याला ती वाद्यसाथ ‘ओरिजिनल’ वाटते.
गोव्यात महनीयांसाठीचा कोणताही कार्यक्रम यांना वगळून होत नव्हता. भारत महोत्सवात त्यांना मॉस्कोवारीही घडविली. मागाहून काही व्यावसायिक महिला पथकांनी याची ‘उचले’गिरी केली. पण ती भ्रष्ट नक्कल वाटते. म्हणजेच प्रदूषित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.