

अर्चना अनंत नायक
भरपूर अभ्यास करून व पुष्कळ मेहनत घेऊन सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही किंवा अपयश पदरात पडतं व त्यामुळे काही मुलं पूर्णतः खचून जातात. आयुष्यात आपण काहीही करू शकणार नाही, अशी भावना मनात दृढ होत जाते. आत्मविश्वास डळमळीत होतो. नकारात्मक विचार मनात घोंघावू लागतात व जीवघेणं नैराश्य मनाला वेढून टाकतं. अशावेळी आईवडिलांनी आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं असतं.
प्रयत्नांती परमेश्वर’ ही म्हण सर्वांच्याच परिचयाची आहे. यश प्राप्तीसाठी प्रयत्नांची महती अधोरेखित करतानाच सातत्याने प्रयत्न करत राहण्यासाठी ही म्हण आपल्याला प्रोत्साहित करते व प्रेरणा देते. प्रयत्नांती परमेश्वर ही भेटतो असं म्हणतात, पण परमेश्वरप्राप्ती होणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. पण आपल्या थोर साधू संतांनी आयुष्यभर अखंड व कठोर साधना अहोरात्र केली व ह्या दिव्य तपोबलाने त्यांना त्या परब्रह्म-स्वरुपाचा साक्षात्कार झाला. त्यांना सर्वोच्च आंतरिक आत्मानंदाची अनुभूती घेता आली व हे सर्व त्यांना आत्मसात करता आले ते त्यांनी सातत्याने केलेल्या साधनेमुळे.
आपल्या दैनंदिन जीवनात परमेश्वरप्राप्ती म्हणजेच यशप्राप्ती. कुठल्याही क्षेत्रात किंवा अन्य कुठल्याही गोष्टीत यश संपादन करायचं असेल तर त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. काहीही न करता व कसलीच मेहनत न घेता फळाची किंवा यशाची अपेक्षा करणे आणि यश मिळाले नाही म्हणून देवाला किंवा नशिबाला दोष देणं अत्यंत चुकीचे व अयोग्य आहे. संत तुकारामानी म्हटलेच आहे ‘असाध्य ते साध्य करिता सायास। कारण अभ्यास..’. यशोशिखर मिळवण्यासाठी अथक परिश्रम व प्रयास करत राहणे अत्यावश्यक आहे. त्याशिवाय काहीही साध्य होणं महाकठीण आहे. ‘यत्न तो देव म्हणावा, यत्ने वीण दरिद्रता’ समर्थ रामदास स्वामींची ही उक्ती अत्यंत उपयुक्त आहे. त्यांनी आपल्या विचारातून प्रयत्नवादाचा पुरस्कार केला. आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे.
तो आपल्या प्रगतीच्या व विकासाच्या आड येतो. म्हणून आळस सोडून नेहमी कार्यरत राहणे हेच उचित आहे. ‘दे रे हरी खाटल्यावरी’ अशी धारणा असणारे लोक आळशीपणामुळे आपला अनमोल वेळ वाया घालवतात. एकदा का वेळ निघून गेली कि पश्चात्तापाशिवाय काहीही हाती पडत नाही. म्हणून वेळेचा नीट सदुपयोग करावा. वेळ आपल्या जीवनातील अतिशय मौल्यवान व मर्यादित साधन आहे. वेळेचा गैरवापर निराशा व अपयशाला कारणीभूत ठरतो म्हणून वेळेचा योग्य वापर करावा व आपला प्रत्येक क्षण कारणी लावावा.
‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी कामना करणाऱ्याला कधीच काहीच प्राप्त होत नाही. देव देईल पण त्यालाच देईल जो आपल्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करतो, कष्ट करतो व मेहनत घेतो. ‘God Helps Those Who Help Themselves’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. जो कष्टाने व जिद्दीने प्रयत्नांचा पाठपुरावा करतो त्यालाच देव मदत करतो.
अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही प्रयत्नांनी शक्य होतात व त्यासाठी लढत राहणे हेच खरे यशाचे गमक आहे. कधी कधी असं ही होतं की, भरपूर अभ्यास करून व पुष्कळ मेहनत घेऊन सुद्धा अपेक्षित यश मिळत नाही किंवा अपयश पदरात पडतं व त्यामुळे काही मुलं पूर्णतः खचून जातात. आयुष्यात आपण काहीही करू शकणार नाही, अशी भावना मनात दृढ होत जाते. आत्मविश्वास डळमळीत होतो. नकारात्मक विचार मनात घोंघावू लागतात व जीवघेणं नैराश्य मनाला वेढून टाकतं. अशावेळी आईवडिलांनी आपल्या मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना मानसिक आधार देणं गरजेचं असतं.
त्यांच्या अपयशाचा किंवा अपेक्षित यश न मिळाल्याचा त्यांच्यासमोर परत परत उल्लेख कधीही करू नये वा दुसऱ्या मुलांशी सतत तुलना करून त्यांच्या नाकर्तेपणाचा पाढाही गिरवत राहू नये. त्यांच्याशी सतत नकारात्मक बोलण्यामुळे व रोषपूर्ण वागण्यामुळे मुलांच्या मनोबलाचं खच्चीकरण होतं. ती नैराश्याच्या गर्तेत अधिक खोलवर रुतत जातात व शेवटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. त्यांच्या ह्या अवस्थेला केवळ अपयशच नाही तर आईवडिलांची व समाजाची भीती कारणीभूत असते.
सातत्य, अढळ आत्मविश्वास, सकारात्मकतेची जोड, ह्याचबरोबर निष्ठेने, निर्धाराने व दृढतापूर्वक अखंड व अविश्रांत प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर आपलं उद्दिष्ट गाठण्यापासून व यश मिळवण्यापासून आपल्याला कोणी ही रोखू शकणार नाही. आपल्या प्रगतीच्या मार्गावरच्या अडचणी दूर होऊन आपण सर्वार्थाने यशाचे परमोच्च शिखर काबीज करू शकू हे शत प्रतिशत निश्चित.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.