Porvorim Traffic Congestion: पर्वरीतील 300 मीटरचा पट्टा ठरू शकतो वाहतुकीचा 'हॉटस्पॉट'; उन्नत मार्ग-अटल सेतू जोडणीसाठी नेमका काय उपाय?

Porvorim Elevated Road Traffic Solution: पर्वरीतील या समस्येचे मूळ वाहनांची संख्या एवढेच नाही. खरी अडचण म्हणजे अनेक दिशांची वाहतूक अतिशय कमी अंतरात एकमेकांना छेद देणार आहे.
Porvorim Elevated Road Traffic Solution
Porvorim Traffic CongestionDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. नंदकुमार कामत

पर्वरीतील या समस्येचे मूळ वाहनांची संख्या एवढेच नाही. खरी अडचण म्हणजे अनेक दिशांची वाहतूक अतिशय कमी अंतरात एकमेकांना छेद देणार आहे. म्हणून उपायही सरळ आहे. ज्यांना सरळ जायचे आहे त्यांना सरळ जाऊ द्यावे. ज्यांना पर्वरीत उतरायचे आहे त्यांना आधीच वेगळे करावे.

म्हापसा ते पणजी रस्त्यावरील वाहतूक माझ्या पूर्ण परिचयाची आहे. त्यामुळे पर्वरी उन्नत मार्ग अटल सेतूला थेट जोडला जाणार नसल्याचे कळल्यावर धक्का बसला. ही मूळ योजना बदलण्यात आली; कारण पर्वरीकरांना अटल सेतूची गरज होती. त्यामुळे उन्नत मार्ग व अटल सेतू यांच्यामध्ये ३०० मीटर्सचा एक धोकादायक पट्टा आपोआप तयार झाला. आधी इथे दोन खांब येऊ घातले होते. या पट्ट्याजवळून जाताना माझा थरकाप उडे. सहा महिन्यांपूर्वीच मी सार्वजनिक बांधकाम खात्याला पर्वरी उन्नत मार्गामुळे या धोकादायक तीनशे मीटर लांब पट्ट्यात पुढे होणाऱ्या वाहतुकीच्या गोंधळाची कल्पना दिली होती. नंतर ऑगस्ट महिन्यात दोन्ही बाजूंनी किमान पंधरा दिवस सलग वाहतुकीची रंगीत तालीम घेण्याची सूचना केली होती. उन्नत मार्ग उद्घाटनानंतर मी खात्याला चार निवेदने दिली होती.

Porvorim Elevated Road Traffic Solution
Goa Land Dispute: 'शत्रू मालमत्ता' म्हणून जमीन जप्त करण्याचा आदेश रद्द; विक्रेती पाकिस्तानी असल्याचा पुरावाच नाही, गोवा खंडपीठाचा मोठा निर्णय

एक निवेदन या प्रकल्पासाठी उच्चस्तरीय प्रातिनिधिक शासकीय देखरेख समिती नेमण्यासाठी होते, जे मंत्री श्री दिगंबर कामत यांच्या विचाराधीन आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याला नुकत्याच दिलेल्या निवेदनात मी जो अंतिम तोडगा सुचवला आहे, त्यावर हा लेख आधारित आहे. यासंबंधी मुख्य अभियंते संदीप चोडणेकर यांच्याशी अनेकदा चर्चा झाली आहे. त्यांनी मी मागितलेली तांत्रिक माहिती व नकाशेही अभ्यासासाठी पुरवले आहेत. मी बारकाईने गुगलवरील या ३०० मीटर्स पट्ट्याची उपग्रह छायाचित्रे तपासली आहेत. पर्वरी उन्नत मार्ग आणि अटल सेतू यांच्यामधील अवघ्या ३०० मीटरच्या भागात पुढे मोठी वाहतूक समस्या निर्माण होऊ शकते. हा प्रश्‍‍न केवळ रस्ता किती रुंद आहे किंवा किती मार्गिका आहेत एवढाच नाही. या छोट्याशा अंतरात वेगवेगळ्या दिशांनी येणाऱ्या वाहनांना कुठे जायचे, कुठे वळायचे, कुठे मुख्य रस्ता सोडायचा आणि कुठे दुसऱ्या वाहतुकीत मिसळायचे, हा खरा प्रश्‍‍न आहे.

या ठिकाणचा नकाशा आणि उपग्रह छायाचित्रे पाहिल्यास परिस्थिती लगेच लक्षात येते. उन्नत मार्गावरून आलेल्या काही वाहनांना थेट अटल सेतूवर जायचे असेल. अटल सेतूवरून आलेल्या काही वाहनांना थेट उन्नत मार्गावरून गिरीच्या दिशेने जायचे असेल. पण काही वाहनांना उन्नत मार्गावरून पर्वरीत उतरायचे असेल. अटल सेतूवरून आलेल्या काही वाहनांनाही पर्वरी किंवा कळंगुटच्या दिशेने जायचे असेल. त्याच वेळी पर्वरीतील वाहनांना उन्नत मार्ग किंवा अटल सेतू पकडायचा असेल. रेईश मागूश, नेरूल, वेरे, बेती, मालीम, बिठ्ठोण, एकोशी या भागांतून येणारी वाहनेही याच परिसरात पोहोचतात.

म्हणजे ३०० मीटरच्या छोट्या पट्ट्यात अनेक दिशांची वाहतूक एकत्र येते. मुख्य अडचण इथेच आहे. सरळ जाणारी वाहने आणि रस्ता बदलणारी वाहने एकाच जागेत मिसळली तर चालकांना वारंवार मार्गिका बदलावी लागते. एखाद्या वाहनाला दोन-तीन मार्गिका ओलांडून दुसऱ्या बाजूला जायचे असेल तर मागून वेगाने येणाऱ्या वाहनांसाठीही धोका निर्माण होतो. गर्दीच्या वेळी अशा हालचालींमुळे वाहतूक मंदावते आणि त्यातून कोंडी वाढत जाते. उन्नत मार्ग आणि अटल सेतू यांच्या वेगमर्यादेतही फरक आहे. उन्नत मार्गावर वेगमर्यादा ६५ किलोमीटर प्रतितास आहे, तर अटल सेतूवर ती ५० किलोमीटर प्रतितास आहे. पर्वरीतील सेवा रस्त्यांवरील वाहतूक यापेक्षा कमी वेगाने चालते. म्हणजे वेगवान वाहतूक आणि स्थानिक मंद वाहतूक या दोन्ही एकाच ३०० मीटरच्या जागेत येणार आहेत. म्हणून या भागाकडे साधा चौक म्हणून पाहून चालणार नाही.

बस आणि मालवाहू वाहनांचा विचार केला तर हा मुद्दा आणखी महत्त्वाचा होतो. उन्नत मार्गावरील एका मार्गिकेची रुंदी सुमारे ३.५० मीटर आहे. मोठ्या बस किंवा ट्रकची रुंदी सुमारे २.६० मीटर असू शकते. अशा दोन मोठ्या गाड्या शेजारी चालत असताना मार्गिका बदलणे सोपे नसते. त्यात वाहनांचे आरसे, चालकाला लागणारी सुरक्षित जागा आणि वेग यांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे शेवटच्या क्षणी मार्गिका बदलण्याची वेळ चालकांवर येऊ नये. यावर सर्वांत सोपा विचार असा करता येईल की, ज्या वाहनांना पर्वरीत जायचेच नाही, त्यांना पर्वरीच्या स्थानिक वाहतुकीत मिसळायचेच कशाला? उन्नत मार्गावरून थेट अटल सेतूकडे जाणारी आणि अटल सेतूवरून थेट उन्नत मार्गाकडे जाणारी वाहने मध्यभागातून सरळ जाऊ शकतील, अशी व्यवस्था करता येईल. या मुख्य मार्गिका शक्यतो विनासिग्नल ठेवल्या तर सरळ जाणाऱ्या वाहतुकीला थांबण्याची गरज पडणार नाही.

Porvorim Elevated Road Traffic Solution
IPL Auction Goa: गोव्यात पुन्हा रंगणार 'आयपीएल'चा लिलाव; डिसेंबरमध्ये होणार भव्य आयोजन, 15-16 तारखेची शक्यता

ज्या वाहनांना पर्वरीत उतरायचे आहे, त्यांना ३०० मीटरच्या भागात पोहोचण्याआधीच बाहेरच्या मार्गिकेत आणले पाहिजे. गिरीहून येऊन पर्वरीत उतरणाऱ्या वाहनांसाठी एक बाजू ठेवता येईल. अटल सेतूवरून येऊन पर्वरी किंवा कळंगुटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनाही वेगळा मार्ग देता येईल. त्यामुळे मुख्य वाहतुकीच्या मधून अचानक आडवे जाण्याची गरज कमी होईल. पर्वरीतून उन्नत मार्ग किंवा अटल सेतूवर जाणाऱ्या वाहनांसाठीही अशीच स्वतंत्र प्रवेश व्यवस्था हवी. स्थानिक वाहनांनी थेट वेगवान वाहतुकीत घुसण्याऐवजी एका ठरावीक मार्गिकेतून पुढे जाऊन योग्य ठिकाणी मुख्य वाहतुकीत मिसळावे. आसपासच्या गावांतून आणि बेती-नेरूलच्या बाजूने येणाऱ्या वाहनांनाही सेवा रस्त्यांवरून याच ठरावीक प्रवेशमार्गाकडे वळवता येईल.

हे करताना संपूर्ण मुख्य रस्ता सिग्नल लावून थांबवण्याची गरज नाही. सिग्नल फक्त जिथे स्थानिक वाहतूक मुख्य प्रवाहात येते किंवा बाहेर पडते तिथेच वापरता येतील. एका वेळी पर्वरीतून बाहेर पडणाऱ्या वाहनांना हिरवा सिग्नल देता येईल आणि दुसऱ्या वेळी पर्वरीत प्रवेश करणाऱ्या वाहनांना. मध्यभागातून उन्नत मार्ग आणि अटल सेतू यांच्यात सरळ जाणारी वाहतूक मात्र सुरू ठेवता येईल. सिग्नलची वेळही कायम एकसारखी ठेवण्याची गरज नाही. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी वाहनांची संख्या वेगळी असते. त्यामुळे प्रत्यक्ष वाहतुकीनुसार सिग्नलची वेळ ठरवता येईल. एका बाजूची वाहने पूर्णपणे पुढे गेल्यानंतरच दुसऱ्या बाजूला हिरवा सिग्नल मिळाला पाहिजे. विशेषतः बस आणि मोठ्या मालवाहू वाहनांना जागा मोकळी करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो. दोन सिग्नलच्या मध्ये काही सेकंद सर्व बाजूंना लाल सिग्नल ठेवल्यास सुरक्षितता वाढू शकते.

आणखी एक महत्त्वाचा प्रश्‍‍न वेगाचा आहे. उन्नत मार्गावरून ६५ किलोमीटर प्रतितास वेगाने येणाऱ्या वाहनाला पुढे स्थानिक वाहतूक आहे हे शेवटच्या क्षणी कळून उपयोग नाही. ३०० मीटरच्या भागात येण्यापूर्वीच वाहनांचा वेग हळूहळू कमी झाला पाहिजे. त्यासाठी योग्य अंतरावर रम्बल पट्टे लावता येतील. वेग अचानक कमी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने तो ४० ते ५० किलोमीटर प्रतितासापर्यंत आणता येईल. दिशादर्शक फलकांचीही येथे फार मोठी भूमिका आहे. चालकाने कुठे जायचे हे शेवटच्या ५० किंवा १०० मीटरमध्ये ठरवण्याची वेळ येऊ नये. किमान ५०० मीटर आधी मोठ्या आणि स्पष्ट फलकांवर कोणती मार्गिका पणजीसाठी, कोणती गिरीसाठी आणि कोणती पर्वरी व आसपासच्या भागांसाठी आहे हे दिसले पाहिजे. रात्री आणि पावसातही हे फलक स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. चालकाने आपली मार्गिका आधीच निवडली तर शेवटच्या क्षणी होणारी धावपळ बरीच कमी होईल.

केवळ रस्त्यावर रंगवलेल्या पांढऱ्या रेषा पुरेशा ठरणार नाहीत. जिथे आवश्यक आहे तिथे सुरक्षित विभाजक किंवा लवचिक खांब लावून काही मार्गिका वेगळ्या ठेवता येतील. त्यामुळे वाहनांना अचानक एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत जाणे कठीण होईल. मात्र रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन वाहनांना अडथळा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या सगळ्यासाठी लगेच मोठी नवीन बांधकामे करण्याची गरज आहे असे नाही. आधी उपलब्ध ३०० मीटर जागेचा नीट उपयोग करता येतो का, हे पाहणे योग्य ठरेल. तात्पुरते विभाजक, दिशादर्शक फलक, रम्बल पट्टे आणि सिग्नल लावून काही काळ ही व्यवस्था प्रत्यक्ष वापरून पाहता येईल. सकाळ-संध्याकाळ किती वाहने कोणत्या दिशेने जातात, कुठे रांगा लागतात, कुठे चालकांना मार्गिका बदलावी लागते आणि बस-ट्रकांना किती वेळ लागतो याची नोंद घेता येईल. त्यानंतर आवश्यक बदल करून कायमस्वरूपी व्यवस्था करता येईल.

Porvorim Elevated Road Traffic Solution
Goa BJP: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा संघटनात्मक बदल; भारती पवार प्रभारी तर अनिल अँथनी सहप्रभारी

पर्वरीतील या समस्येचे मूळ वाहनांची संख्या एवढेच नाही. खरी अडचण म्हणजे अनेक दिशांची वाहतूक अतिशय कमी अंतरात एकमेकांना छेद देणार आहे. म्हणून उपायही सरळ आहे. ज्यांना सरळ जायचे आहे त्यांना सरळ जाऊ द्यावे. ज्यांना पर्वरीत उतरायचे आहे त्यांना आधीच वेगळे करावे. ज्यांना पर्वरीतून मुख्य मार्गावर यायचे आहे त्यांना ठरावीक जागेतूनच प्रवेश द्यावा. जिथे दोन प्रवाह एकमेकांना छेद देणे टाळता येत नाही, तिथेच सिग्नल वापरावा. उन्नत मार्ग सुरू झाल्यानंतर समस्या निर्माण होण्याची वाट पाहण्यापेक्षा ही व्यवस्था आधीच तपासून पाहणे अधिक योग्य ठरेल. रस्ता तयार करणे हा प्रकल्पाचा एक भाग आहे; त्या रस्त्यावर वाहने सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे कशी चालतील हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. पर्वरीतील या ३०० मीटरच्या पट्ट्यात हे साध्य झाले, तर उन्नत मार्ग आणि अटल सेतू यांची जोडणी वाहतुकीसाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com