Pope Francis: 'पोप फ्रान्सिस' ख्रिस्तमार्गावर चालणारे युगनायक

प्रत्येक माणूस आपल्या विचारधारेनुसार चालत असतो. कधी कधी ही विचारांची धार इतकी तीव्र असते की, अन्य विचारांचे लोक कापले जातात किंवा तीव्र विचारधारेचा माणूस त्यांच्याजवळ जात नाही.
Pope Francis
Pope FrancisDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. ऑस्कर रिबेलो

प्रत्येक माणूस आपल्या विचारधारेनुसार चालत असतो. कधी कधी ही विचारांची धार इतकी तीव्र असते की, अन्य विचारांचे लोक कापले जातात किंवा तीव्र विचारधारेचा माणूस त्यांच्याजवळ जात नाही. त्यामुळे, समाजात झुंडशाही माजते. पण, समाजात काही अशीही माणसे असतात जी प्रत्येक झुंडशाहीला आणि झुंडशाहीतील प्रत्येकाला, सामान्य माणसांप्रमाणे वंदनीय असतात.

पोप फ्रान्सिस हे अशा दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकीच एक. ज्यांच्यावर आस्तिक, नास्तिक, निंदक कुणीही असो; अगदी नि:संशय विश्वास ठेवत. या शतकातील दया, करुणा आणि मानवतेचा चेहरा असलेले पोप फ्रान्सिस काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

आजारी असतानाही त्यांनी ईस्टरचा आशीर्वाद दिला. त्यानंतर त्या कोमलहृदयी भव्यदिव्य मूर्तीने तितक्याच सहजतेने निरोप घेतला.

देदीप्यमान जीवन!

तेजोमय प्रकाश!!

आपल्या सर्वांसाठी ‘आत्मदीपो भव:’चा वस्तुपाठ!!!

Pope Francis
Bhandari Samaj Goa: ...तसे न केल्यास देवानंद नाईकांवर अब्रू नुकसानीचा दावा करणार, गावकर यांचा इशारा

युगनायकांचा उदय युगाच्या संधिकाली होतो. जेवढी परिस्थिती विपरीत होत जाईल, क्लेशदायक होत जाईल, तितक्याच कठोरपणे त्याविरुद्ध लढणारा एक नायक ती परिस्थितीच जन्माला घालत असते. हा नायक केवळ तत्कालीन परिस्थितीचा विचार करत नाही; त्याहीपलीकडे जात सर्वांच्या भल्याचा, सर्वंकष विचार तो मांडतो आणि कृतीत आणतो.

भारतात ब्रिटिशांच्या क्रूर राजवटीच्या भयानक काळाने महात्मा गांधी निर्माण केले. माणुसकीचा अंत पाहिला जाऊ लागला त्या काळाने अमेरिकेस मार्टिन लूथर किंग दिले. वर्णभेदाच्या निरर्थक अपमानाच्या काळाने जगाला नेल्सन मंडेला दिले. प्रत्येक पराकोटीच्या आघाताने जगाला तितक्याच पराकोटीचे नायक दिले आहेत.

यात पोप फ्रान्सिस कुठे बसतात?

आपण मानवी इतिहासातील सर्वांत यशस्वी आणि सुविधांनी युक्त काळात जगत आहोत हे निश्चितच खरे आहे. तळहातावर विसावलेले जगच बोटांवर चालत आहे. एक बोट दाबताच सर्व काही उपलब्ध होते.

प्रवास, इंटरनेट, संवाद, अन्न मनोरंजन, सापेक्ष शांती आणि खरे तर बरेच काही! आपण मानवी इतिहासातील सर्वांत चांगल्या काळात जगत आहोत. पण, आपल्याकडे पैसा आहे; श्रीमंती नाही, सुख आहे; समाधान नाही. याचे कारण आत कुठेतरी द्वेष आहे, भेद आहे. दुष्टपणा आता निराशेशी हातमिळवणी करत आहे. युद्ध आणि संशयाचे ढग दाटत आहेत. कुठले तरी प्रचंड मोठे वादळ मानवताच संपवायला घोंघावत आहे. हे सगळे वेळेच्या आधी ओळखणारे व त्यावर कृती करणारे महामानव म्हणजे पोप फ्रान्सिस!

Pope Francis
Goa News: मकाझन येथील तलावात आढळला अज्ञाताचा मृतदेह; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

या अंधारमय जगात, ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणत अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाताना करुणा, प्रेम, न्याय आणि शांती या कालातीत गुणांमधून, त्यांनी आपला संदेश अथकपणे सर्वांसमोर मांडला. त्यांच्या बिघडत्या आरोग्याला आणि मानवी सामर्थ्याची कसोटी पाहणाऱ्या सर्व परीक्षांना तोंड द्यावे लागले, तरीही ते नेहमी येशूच्याच मार्गावर चालत राहिले. ‘आपण ज्या नकारात्मक, द्वेषाने भरलेल्या विषारी मार्गाने अधिकाधिक प्रेमात पडतो त्याशिवाय आपले जीवन जगण्याचा आणखी एक मार्ग आहे’, असे ते कायम सांगत राहिले.

प्रभू येशूच्या त्या मार्गावरून अनेकांना घेऊन जात राहिले. राजनिती, राजकारण करणे काही त्यांना फारसे कठीण नव्हते. तरीही त्यांनी ती सगळी प्रलोभने दूर सारत शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ते ख्रिस्ताच्या मार्गावरच चालले. म्हणूनच ते या युगाचे नायक आहेत. त्यांनी केलेले अनिर्वचनीय कार्य पाहता, येत्या काही दिवसांत तीन गोष्टी निश्चितच घडतील.

शनिवारी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी रोममध्ये गर्दी होईल. जवळजवळ सर्वजण तिथे असतील. मित्र आणि शत्रू, रंक आणि राव. प्रत्येक धार्मिक, राजकीय आणि भौगोलिक संप्रदायाचे लोक उपस्थित असतील. कारण या मानवाने जीवनाच्या प्रत्येक पैलूला खूप खोलवर आणि अर्थपूर्ण स्पर्श केला आहे.

त्यांचे दफनस्थान, प्रथेप्रमाणे व्हॅटिकनच्या परिसरात नाही, तर रोममधील सांता मारिया मॅगीओर येथे होईल. भविष्यात ते सर्वांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र बनेल; मग तो विश्वास ठेवणारा असो अथवा न ठेवणारा असो, पर्यावरणवादी असो,

योद्धा असो किंवा शांतता निर्माण करणारा असो, सर्वांसाठीच आणि मानवाच्या शेवटच्या पिढीपर्यंत हे तीर्थक्षेत्र राहील.

सामान्यतः जॅकेट घातलेल्या चर्चला सूचना देण्यात येईल. पुढील पोपला फ्रान्सिस यांच्या ‘लाल’ शूजमध्ये अनुसरण करावे लागेल. कोणतीही तडजोड नाही. एक कट्टरतावादी आणि सिद्धांतवादी पोप आता अधिक स्वीकारार्ह राहणार नाही.

आपल्या बारा वर्षांच्या पोपपदाच्या कारकिर्दीत, फ्रान्सिस यांनी हे दाखवून दिले की आज जगात ते वंदनीय ठरले त्यामागे चर्चची रचना नाही तर ख्रिस्ताच्या संदेशावर चालणे आहे. सहिष्णुता, सर्वसमावेशकता, सर्वांचा स्वीकार आणि न्यायाप्रति नम्रता आहे. इतिहासातील सर्वांत प्रिय मानवांपैकी एक असलेल्या मानवाच्या युगात आपण आहोत, हे आपले भाग्यच आहे. त्यांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचेल का हा एक खुला प्रश्न आहे, परंतु आपण तो स्वीकारला पाहिजे. आपल्या युगात तो एकमेव संदेश आहे जो महत्त्वाचा आहे. एका मित्राने मला म्हटल्याप्रमाणे, ‘पोप फ्रान्सिस यांचे माझे आवडते वाक्य म्हणजे ते मानतात की नरक रिकामा आहे’.

माणसाचा माणुसकीवर, चांगुलपणावर विश्वासच उरला नाही अशा जगात पोप फ्रान्सिस यांनी अंत्यत कर्मठपणे सर्व माणसांच्या मूलगामी चांगुलपणावर विश्वास ठेवला. आपल्याला त्यांच्या त्या विश्वासावर खरे उतरायचे आहे.मानवतेच्या इतिहासात मूलतः तीन प्रकारचे नेते आहेत. बहुसंख्य जे त्यांच्या धूर्त मेंदूचा वापर सोयीचे आणि गैरसोयीचे दोन्ही करण्यासाठी करतात. दुसरे क्षुद्र भित्रे जे फक्त वेळ घालवतात, त्यांचा वेळ संपेपर्यंत काहीही करत नाहीत.

विची, नेव्हिल चेंबरलेन. तिसऱ्या प्रकारचे नेते म्हणजे परमहंस पदाला पोहोचलेले दुर्मीळ लोक जे योग्य आणि अयोग्य यात नीरक्षीरविवेकबुद्धीने फरक करतात. जे योग्य असेल त्याचा स्वीकार करतात व जे अयोग्य असेल ते निष्ठूरपणे त्यागतात. पोप फ्रान्सिस यांनी नेहमीच जे योग्य होते ते केले. अगदी नेहमीच!! देवासही दुर्लभ असणारा पोप फ्रान्सिस हा माणूस त्याने आमच्यामध्ये पाठवला, यासाठी देवाचे आभार!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com