
पणजी: गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष देवानंद नाईक यांनी आर्थिक व्यवहाराबाबत समोरासमोर बसून चर्चा करावी. सदस्यत्व दिलेल्यांच्या पावत्या तपासून घ्याव्यात. तसे न केल्यास त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे समांतर समितीचे अध्यक्ष उपेंद्र गावकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
गावकर म्हणाले, मी सरचिटणीस असताना हे सगळेजण हिशेब मागत होते, तेव्हा तो दिला आहे. २०१२ मध्ये समाजाचे केवळ ७०५ जण सदस्य होते. त्यावेळे ५०५ रुपये शुल्कासह २ हजार जणांनी सदस्यत्वासाठी अर्ज केले होते. त्यावेळी निवडणूक होणार असल्याने त्यांच्या सदस्यत्वावर नंतर निर्णय घेऊ असे ठरवण्यात आले.
पुढे त्यांना सदस्यत्व द्यावे, असे ठरले. त्यानुसार पावती आणा व सदस्यत्व घ्या, असे कळवण्यात आले. आताही देवानंद यांना काही जणांना सदस्यत्व मिळाले नाही, असे वाटत असल्यास त्यांनी त्या सदस्यांना पावती आणण्यास सांगावे. टेबलावर समोरासमोर बसून चर्चा करण्याचा हा विषय आहे आणि चर्चेला येण्याची माझी तयारी आहे.
या समितीचे प्रवक्ते संजीव नाईक म्हणाले, समाजाची जनगणना येत्या ३० रोजी सुरू करण्यात येईल व ३१ मे पर्यंत राज्यात भंडारी किती याची आकडेवारी सरकारला सादर करण्यात येईल. देशात १९३१ मध्ये जातनिहाय जनगणना झाली होती, त्यानंतर तशी झाली नाही, त्यामुळे ती आता करावी, अशी आमची मागणी आहे.
ओबीसींत भंडारी समाज सर्वाधिक असल्याने २७ टक्क्यांपैकी २० टक्के आरक्षण भंडारी समाजाला मिळावे, अशी आमची मागणी आहे. त्याच्या समर्थनार्थ आम्ही ही जनगणना करणार आहोत.
शिफारशीचा अधिकार!
गोमंतक भंडारी समाज संस्थेचा अधिकृत नोंदणी क्रमांक वापरून समाज दाखला दिल्यास कारवाई करण्याचा देवानंद यांनी दिलेल्या इशाऱ्यावर संजीव म्हणाले, जातीचा दाखला हा तलाठ्याने केलेले तपासकाम, दोन साक्षीदार यांच्या आधारे दिला जातो. समाज केवळ शिफारस करतो. तशी शिफारस करण्याचा अधिकार कोणालाही आहे. समाज कोणताही जातीचा दाखला देत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.