

मी २०२६ वर्षाच्या सुरुवातीला सोमनाथ स्वाभिमान पर्वात सहभागी होण्यासाठी सोमनाथ येथे गेलो. सोमनाथच्या मंदिरावर झालेल्या पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण झाल्याचे स्मरण म्हणून हे पर्व आयोजित करण्यात आले होते. आता येत्या ११ मे रोजी मी पुन्हा सोमनाथला जाणार आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सोमनाथच्या पुनरुज्जीवित मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते.
त्या घटनेला ७५ वर्षे होत असल्याच्या निमित्ताने तिथे उत्सव होणार आहे. अगदी सहा महिन्यांच्या आत सोमनाथ मंदिराशी संबंधित दोन महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले असून, उद्ध्वस्त केलेल्या मंदिराच्या पुनरुज्जीवनाचा प्रवास म्हणजेच ज्याला आपण विध्वंस ते सृजन असे म्हणतो, तसा हा प्रवास आहे. आपल्या प्राचीन ग्रंथात सांगितले आहे : ‘प्रभासं च परिक्रम्य पृथिवीक्रमसंभवम्.’ याचा अर्थ या पवित्र प्रभासाची (सोमनाथ) प्रदक्षिणा संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा घालण्याइतकी पवित्र आहे.
भाविक येथे प्रार्थना आणि दर्शनासाठी येत असले, तरीही त्यांनी येथे एका संस्कृतीच्या कधीही न विझलेल्या ज्योतीचा अनुभव घेतला आहे, त्याची शाश्वतता त्यांनी अनुभवली आहे. साम्राज्ये उभी राहतात आणि लयाला जातात, लाटा बदलतात, युद्ध आणि क्रांतीच्या प्रदेशातून इतिहास आपली वाटचाल करत होता, तरीही, सोमनाथ आपल्या आतील चेतनेमध्ये सदैव कुठेतरी जागे होते. ही वेळ अशा सगळ्या अनाम अगणित लोकांचे स्मरण करण्याची आहे, जे हुकूमशाही अत्याचारांच्या विरोधात ठामपणे पाय रोवून उभे राहिले.
लाकुलिशा आणि सोमा सरमन यांनी या प्रभासाचे रूपांतर तत्त्वज्ञानाच्या एका मोठ्या केंद्रात केले. वल्लभीचे चक्रवर्ती महाराज धरासेन चौथे यांनी, कित्येक शतकांपूर्वी येथे दुसरे मंदिर बांधले. भीमा देवी, जयपाल आणि आनंदपाल यांनीही आक्रमकांविरोधात लढून आपल्या संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन केले. असे म्हटले जाते की, राजा भोजनेदेखील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली. कर्णदेव आणि सिद्धराजा जयसिंह यांनीही गुजरातची राजकीय आणि सांस्कृतिक ताकद पुनरुज्जीवित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९४०च्या दशकात ज्यावेळी संपूर्ण भारत स्वातंत्र्याची भावना जोर धरू लागली होती आणि सरदार पटेल यांच्यासारख्या उत्तुंग नेत्यांच्या नेतृत्वाखाली एका नवीन प्रजासत्ताकाचा पाया रचला जात होता, त्यावेळी सरदार पटेल यांना एक गोष्ट मनापासून अस्वस्थ करत होती, ती म्हणजे सोमनाथ मंदिराची दूरवस्था. एकदा दिवाळीचा सण असताना १३ नोव्हेंबर १९४७ रोजी, ते मंदिराच्या त्या भग्न अवशेषांजवळ उभे राहिले आणि ओंजळीत समुद्राचे पाणी घेऊन ते म्हणाले होते की, या नववर्षाच्या (गुजराती) शुभदिनी आम्ही सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी केली जावी असा संकल्प केला आहे.
तुम्ही सौराष्ट्रातील जनतेने यासाठी जे शक्य आहे ते केले पाहिजे. हे एक पवित्र कार्य असून यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. सरदार पटेल यांच्या त्या एका आवाहनाला केवळ गुजरातच नाही, तर संपूर्ण भारतातील जनतेने मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. दुर्दैवाने नियतीने मात्र सरदार पटेल यांना त्यांनी अत्यंत तळमळीने जोपासलेले हे स्वप्न पूर्ण होताना पाहण्याची संधी दिली नाही. जीर्णोद्धार झालेल्या सोमनाथ मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यापूर्वीच ते हे जग सोडून निघून गेले होते. असे असले तरी, प्रभास पाटणच्या त्या पवित्र किनाऱ्यावर त्यांचा प्रभाव सातत्याने जाणवत राहिला. के. एम. मुंशी यांनी सरदार पटेलांचा हा संकल्प पुढे नेला, या कार्यात त्यांना नवानगरच्या जामसाहेबांनीही मोलाची साथ दिली.
१९५१ मध्ये मंदिराचे काम पूर्ण झाले. त्यावेळी या सोहळ्यासाठी राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना निमंत्रित करण्याचा निर्णय झाला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांचा तीव्र विरोध असतानाही डॉ. राजेंद्र प्रसाद या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिकच खास आणि ऐतिहासिक ठरला. आज मागे वळून पाहिल्यावर ऑक्टोबर २००१ मधल्या घडामोडी मला ठळकपणे आठवतात. त्यावेळी मी नुकतीच मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. ३१ ऑक्टोबर २००१ रोजी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी सोमनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्याच्या घटनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका सोहळ्याचे आयोजन करण्याचा बहुमान गुजरात सरकारला मिळाला होता.
योगायोगाने, त्याचवेळी सरदार पटेल यांची १२५वी जयंतीही साजरी केली जात होती. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी त्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. डॉ. राजेंद्र प्रसाद ११ मे १९५१ रोजी केलेल्या आपल्या भाषणात म्हणाले होते की, ज्या गोष्टीवर अढळ श्रद्धा आणि प्रेम असते, ती कधीही नष्ट होऊ शकत नाही, हाच संदेश सोमनाथ मंदिर अवघ्या जगाला देत आहे. हे मंदिर सदैव लोकांच्या हृदयात जिवंत राहील, अशी कामनाही त्यांनी व्यक्त केली होती.
सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे सरदार पटेल यांनी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती आहे, पण आता तीच भावना पुढे नेत असताना आपण लोकांच्या जीवनात समृद्धी आणणेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यांनी हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी संदेश आपल्या भाषणातून दिले होते. गेल्या एका दशकाहून अधिक काळ आपण याच मार्गावर चालत आहोत. ‘विकास ही आणि वारसा ही’ या तत्त्वापासून प्रेरणा घेऊन सोमनाथपासून काशीपर्यंत, कामाख्यापासून केदारनाथपर्यंत, अयोध्येपासून उज्जैनपर्यंत आणि त्र्यंबकेश्वरपासून श्रीशैलमपर्यंत आमच्या चमूला आपल्या आध्यात्मिक केंद्रांचे पारंपारिक स्वरूप टिकवून ठेवत त्यांना अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य मानतो.
संपर्कव्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नांमुळे अधिक लोकांना या केंद्रांना भेट देणे शक्य होत आहे. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, उपजीविकेचे पर्याय सुनिश्चित होतात आणि ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची भावना अधिक दृढ होते. सोमनाथच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि ज्यांनी त्याची वारंवार उभारणी केली, त्यांच्या संघर्षाचे आणि बलिदानाचे कधीही विस्मरण होणार नाही. भारताच्या विविध कानाकोपऱ्यांतील असंख्य व्यक्तींनी सोमनाथचे वैभव परत मिळवून देण्यासाठी योगदान दिले आहे
. त्यांनी भारताचा प्रत्येक भाग पवित्र मानला आणि भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन एकात्मतेच्या भावनेने ते एकत्र जोडले गेले. अनेकदा विभाजनांनी चिन्हांकित असलेल्या या जगात, ही एकतेची भावना आज पूर्वीपेक्षा अधिक प्रासंगिक आहे. सोमनाथ आपल्या पूर्ण वैभवासह सदैव ताठ मानेने उभे राहील, कारण एकतेची ही भावना आणि सामायिक सांस्कृतिक चेतना प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. यांना अभिवादन करण्यासाठी आणि एक हजार वर्षांच्या असाधारण शौर्याचे स्मरण म्हणून, सोमनाथमध्ये पुढील एक हजार दिवस विशेष पूजा आयोजित केली जाईल. अनेक लोक या पूजेसाठी देणगी देत आहेत, हे पाहून आनंद होतो.
या विशेष काळात सोमनाथला भेट देण्याचे मी माझ्या देशबांधवांना आवाहन करतो. जेव्हा तुम्ही सोमनाथच्या किनाऱ्यावर उभे राहाल, तेव्हा तेथील प्राचीन प्रतिध्वनींना तुमच्याशी संवाद साधू द्या. तिथे तुम्ही केवळ भक्तीने भारावून जाणार नाही, तर कधीही न ओसरणाऱ्या, अभेद्य आणि अढळ अशा सांस्कृतिक चेतनेची प्रबळ स्पंदनेही अनुभवाल. तुम्हाला भारताच्या अजिंक्य वृत्तीचा अनुभव येईल आणि अनेक प्रयत्न होऊनही आपली संस्कृती अपराजित का राहिली, हे उमजेल. तसेच तुम्हाला शाश्वत विजयाचे दर्शन घडण्याची संधी मिळेल. हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.