October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Goa Ambulance Breakdown: 'काही मदत हवी का तुला?'असे विचारताच तो म्हणाला ‘हो. गाडी सुरू होत नाही.’ मी म्हटलं - चिंता करू नकोस, मी काही जणांना एकत्र करतो आणि आम्ही गाडी ढकलतो.
Goa Ambulance Breakdown
October HeatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कौस्तुभ कारखानीस

'काही मदत हवी का तुला?'असे विचारताच तो म्हणाला ‘हो. गाडी सुरू होत नाही.’ मी म्हटलं - चिंता करू नकोस, मी काही जणांना एकत्र करतो आणि आम्ही गाडी ढकलतो. तू गाडी रस्त्याच्या एका बाजूला तरी घे. मग पुढचं पुढं बघू.

सध्या ऑक्टोबर हिट ‘मी’ म्हणत आहे. नागरिक बिचारे आपल्या दैनंदिन कामांसाठी ‘हिट - बीट’ची तमा न बाळगता कडक उन्हातून प्रवास करत आहेत. वातानुकूलित गाडी असलेल्यांना निदान गाडीत तरी झळ बसत नाही, पण दुचाकीस्वारांना व पायी फिरणाऱ्यांना मात्र उन्हाशी सामना करावा लागत आहे. अश्यावेळी ‘ट्रॅफिक जॅम’ मुळे प्रवाशांना आपसूकच अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाची प्राप्ती होत आहे.

Goa Ambulance Breakdown
Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

पर्वरी ते पणजी मार्गावरील ट्रॅफिक सध्या बरेच चर्चेत आहे. निमुळत्या होत जाणाऱ्या मार्गावर कोंडी ठरलेली असते. तरीसुद्धा कामावर जाण्या - येण्याची वेळ सोडून इतर वेळी बहुधा रहदारी कमी असते. पण यालाही काही अपवाद घडतात. यात अनेक वेळी आपला दोषही आढळून येतो. अशाच एका उष्ण दिवशी सकाळी पावणेबाराच्या सुमारास मी दुचाकीने पर्वरीहून निघून पणजीच्या दिशेने येताना मांडवी पुलावर पोहोचता पोहोचता ट्रॅफिक जॅम जाणवू लागले. कारण काही कळेना.

पुलावर तर भली मोठी रांग दिसत होती. मी मोठ्या गाड्यांना मागे टाकत तशीच दुचाकी पुढे रेटली, तर पुलाच्या मध्यावर पोहोचता पोहोचता रस्त्याच्या मधोमध एक रुग्णवाहिका तटस्थपणे उभी असलेली दिसली. काय झाले असावे काही कळेना. सुदैवाने अपघात झाला नव्हता. तिच्या डाव्या बाजूने एक ट्रक पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता. ट्रकसाठी ती जागा अतिशय अरुंद असल्याने ट्रकचालकाचे कौशल्य पणाला लागले होते. क्लिनर खाली उतरून त्याला वाट दाखवित होता. मागे गाड्यांची भली मोठी रांग लागलेली होती. उजव्या बाजूने पुढून येणाऱ्या कारगाड्या विनासायास पुढे सरकत होत्या.

मी त्या उजव्या बाजूने वाट काढून आरामात पुढे जाऊ शकलो असतो. पण म्हटलं हे योग्य नव्हे. निदान त्या बंद पडलेल्या गाडी चालकाला काही मदत हवी का हे विचारले तरी पाहिजे. मी दुचाकी गाडीच्या मागे ठेवली आणि चालकाजवळ गेलो. बघतो तर तो एकटाच. बाजूला बसणारा वैद्यकीय अधिकारी नव्हताच. ‘काही मदत हवी का तुला?’असे विचारताच तो म्हणाला ‘हो. गाडी सुरू होत नाही.’ मी म्हटलं - चिंता करू नकोस, मी काही जणांना एकत्र करतो आणि आम्ही गाडी ढकलतो. तू गाडी रस्त्याच्या एका बाजूला तरी घे. मग पुढचं पुढं बघू.

त्याला ते पटलं. मी इकडे तिकडे पाहिलं आणि आधी त्या ट्रकच्या क्लिनरलाच बोलावलं. त्याचवेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला तो ‘वैद्यकीय अधिकारी’ उभा असलेला मला दिसला. हातातील मोबाईलकडे बघत आमच्याकडे लक्षही न देता तो ढिम्मपणे उभा होता. त्याला आम्ही मदत करत होतो, हे लक्षात कसे आले नाही? त्याला त्याच्याच चालकाला मदत करावीशी वाटली कशी नाही? याचे मला आश्चर्य वाटले. मला एक क्षण असे वाटले की त्याला हाक मारून बोलवावं आणि त्याला धारेवर धरावं.

Goa Ambulance Breakdown
FC Goa vs Fortis FC: एफसी गोवाचा अखेर विजय! फॉर्टिस एफसीला 2-1 ने नमवत एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये गुणांचे खाते उघडले

मी गाडी ढकलायला आणखी कोणी मिळतात का पाहत होतो, इतक्यात त्या क्लिनरने कमालच केली. त्याने एकट्याने ताकद लावून गाडी ढकलली आणि ती रुग्णवाहिका सुरू झाली सुद्धा. लगेच तो ‘अधिकारी’ येऊन बसला आणि चालकाने गाडी पुढे दामटवली. घटना इथे संपते. पण कितीतरी प्रश्न त्यातून माझ्या मनात उद्भवले - ट्रॅफिक तुंबलेले असताना कोणालाच कसे उतरून मदत करावीशी वाटली नाही? ट्रक चालकाला व क्लिनरलाही ते सुचले कसे नाही?

त्या वैद्यकीय अधिकाऱ्याने चालकाची मदत करण्याचे सोडून तो बाजूला जाऊन का उभा राहिला? उलट जे मी केले ते काम त्याने करणे अपेक्षित नव्हते का? ज्याने तुमची गाडी सुरू करण्यासाठी आपला वेळ दिला त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची विवेकबुद्धीही तुमच्याजवळ कशी नव्हती? तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवाल? तुमची मुले उद्या अशीच वागणार का? हे आणि असे अनेक प्रश्न मला तिथून निघताना सतावू लागले, कारण अशा छोट्याशा गोष्टीवरून एकंदर समाजाच्या मनःस्थितीची कल्पना येते. देशाच्या सामान्य नागरिकांच्या आचरणावरून देश समजतो. आपल्याला मिळालेले शिक्षण हे संस्कारित आहे की, नाही याचे उत्तर इथे मिळते. लहान मुलांसाठी संस्कारवर्ग चालतात हे माहीत आहे; भविष्यात प्रौढांसाठी अशा संस्कारवर्गांची गरज भासू नये ही प्रार्थना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com