

स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी व अन्य गैरप्रकारांवरून सध्या विद्यार्थी अस्वस्थ आहेत. त्यातून अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. यावर तातडीने कायमस्वरूपी उपाय करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर ‘यूआयडीएआय’चे माजी अध्यक्ष आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी देशातील परीक्षापद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यासाठी परीक्षेच्या दिवशीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना त्यांनी केली आहे. परीक्षापद्धतीतील सुधारणांसाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीचे नीलेकणी प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनांसंबंधी आणि इतर उपायांवर सखोल चर्चा होणे गरजेचे आहे.
नंदन नीलेकणी म्हणतात...
१) प्रश्नांचा मोठा संग्रह तयार करून परीक्षेच्या दिवशी अगदी शेवटच्या क्षणी त्या दिवसाची प्रश्नपत्रिका तयार करता येईल. त्यामुळे आधीपासून एखादी प्रश्नपत्रिका फोडण्याचा किंवा विकण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. ही समस्या सोडविण्याचा हा एक मार्ग आहे.
२) सर्व परीक्षा संगणकाधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेण्याकडे वळण्याची गरज.
३) सर्व परीक्षा संगणकाधारित पद्धतीने घेण्यासाठी विविध ठिकाणी परीक्षा केंद्रांचे जाळे उभारावे लागेल. सध्या देशात सुमारे दीड लाख ठिकाणी विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. या केंद्रांची संख्या वाढविण्याची गरज आहे.
उपस्थित प्रश्न
१) परीक्षा पद्धतीतील गैरप्रकार रोखण्यात तंत्रज्ञान कितपत प्रभावी ठरेल?
२) ‘एआय’चा वापर करताना होणाऱ्या संभाव्य चुका, सायबर हल्ले, तांत्रिक बिघाड आणि गैरवापर यांना आळा घालण्यासाठी कोणती व्यवस्था असेल?
३) ‘एआय’ने तयार केलेल्या प्रश्नपत्रिकांमुळे परीक्षेची निष्पक्षता आणि समान संधी सुनिश्चित होईल का? विविध परीक्षा केंद्रांवर प्रश्नांच्या काठिण्यपातळीत समानता राखली जाईल का?
४) परीक्षांमधील गैरप्रकारांना केवळ तंत्रज्ञानाने आळा बसेल की प्रशासकीय उत्तरदायित्वही निश्चित करावे लागेल?
५) विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील ढासळलेला विश्वास पुन्हा कसा निर्माण करणार?
बदल का हवा?
स्पर्धा परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीची, स्वप्नांची आणि भविष्याची कसोटी. मात्र, पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार, निकालांना होणारा विलंब आणि भरती प्रक्रियेतील अनिश्चितता यामुळे या व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत होत आहे. अभ्यासासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या विद्यार्थ्यांना गैरमार्गांचा अवलंब करणाऱ्यांमुळे अन्याय सहन करावा लागत असेल, तर ही केवळ परीक्षाव्यवस्थेची नव्हे, तर सामाजिक न्यायाचीही समस्या ठरते.
विविध ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुरू केलेली आंदोलने ही त्यांच्या अस्वस्थतेची आणि व्यवस्थेविषयीच्या अविश्वासाची स्पष्ट अभिव्यक्ती आहे. त्यामुळे आता परीक्षापद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्यामुळे सुधारणांचा विचार केवळ प्रश्नपत्रिकानिर्मितीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शकता, प्रशासनाची जबाबदारी आणि दोषींवरील कठोर कारवाई यांचाही समावेश असलेली व्यापक सुधारणा आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना केवळ आश्वासने नव्हे, तर विश्वासार्ह आणि न्याय्य व्यवस्था हवी आहे.
प्रश्नसंचातून संगणकीय पद्धतीने प्रश्नांची निवड
प्रत्येक परीक्षेसाठी एकच प्रश्नपत्रिका तयार करण्याऐवजी, विषयवार आणि काठिण्यपातळीनुसार मोठा प्रमाणित प्रश्नसंच तयार करावा. त्यातून संगणकीय प्रणालीच्या मदतीने वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार करता येतील. मात्र, सर्व प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी आणि गुणांकन समान असल्याची खात्री आवश्यक आहे.
यंत्रणेचे स्वतंत्र लेखापरीक्षण
प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाई, वाहतूक, साठवणूक आणि परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापन या प्रत्येक टप्प्याचे स्वतंत्र सुरक्षा लेखापरीक्षण करावे. गैरप्रकारांची शक्यता आढळल्यास तातडीने चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी.
प्रश्नपत्रिकांचा सुरक्षित डिजिटल पुरवठा
प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटे आधीच कूटबद्ध (एन्क्रिप्टेड) स्वरूपात परीक्षा केंद्रांवर पाठवाव्यात. त्या उघडण्यासाठी बहुस्तरीय प्रमाणीकरण आणि वेळेची मर्यादा असावी. त्यामुळे प्रश्नपत्रिका आधीच फुटण्याचा धोका कमी होऊ शकतो.
संस्थांसाठी कठोर उत्तरदायित्व
पेपरफुटी किंवा गंभीर अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार आणि दोषी संस्थांवर कठोर कारवाई व्हावी. तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आणि तक्रारदारांचे संरक्षण यांचीही तरतूद असावी.
प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा आणि पारदर्शकता
परीक्षेचे वेळापत्रक, उत्तरतालिका, निकाल, हरकतींचे निराकरण आणि नियुक्त्यांसाठी निश्चित कालमर्यादा ठरवावी. परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना विनाकारण आर्थिक व मानसिक त्रास होऊ नये, यासाठी पुनर्परीक्षेची स्पष्ट नियमावली असावी.
परीक्षाव्यवस्थेतील सुधारणा म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नव्हे. सुरक्षितता, पारदर्शकता, समान संधी आणि प्रशासनाचे उत्तरदायित्व यांचा एकत्रित विचार केल्यासच विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा संपादन करता येईल.
‘प्रश्नपेढी’आधारित पद्धतीचा स्वीकार
सततच्या पेपरफुटीच्या घटना आणि परीक्षाप्रणालीवरचा उडत चाललेला विश्वास, या पार्श्वभूमीवर परीक्षापद्धतीतच आमूलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरविणाऱ्या या परीक्षांची विश्वासार्हता टिकविणे हे सर्वांत मोठे आव्हान आहे. यावर एक प्रभावी तोडगा म्हणून एकाच प्रश्नपत्रिकेवर अवलंबून न राहता, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘प्रश्नपेढी’आधारित परीक्षापद्धतीचा स्वीकार करणे हा एक भविष्यवेधी पर्याय ठरू शकतो.
काय आहे ही नवी संकल्पना?
या पद्धतीत, परीक्षेच्या काही तास/मिनिटे किंवा दिवस आधी एकच प्रश्नपत्रिका तयार केली जात नाही. त्याऐवजी देशभरातील विषयतज्ज्ञ मिळून हजारो प्रश्नांची एक विशाल आणि सुरक्षित ‘प्रश्नपेढी’ तयार करतील. यातील प्रत्येक प्रश्नाला त्याची काठिण्य पातळी, विषय आणि तो विद्यार्थ्याच्या कोणत्या कौशल्याची (उदा. विश्लेषण, तर्कक्षमता) चाचणी घेतो, यानुसार टॅग केले जाईल. परीक्षेच्या वेळी, अगदी आयत्या क्षणी सॉफ्टवेअर किंवा तंत्रज्ञानाच्या मदतीने या प्रश्नपेढीतून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक स्वतंत्र, पण समान काठिण्य पातळीची प्रश्नपत्रिका तयार केली जाईल. यामुळे प्रत्येकाचा पेपर वेगळा असेल, पण त्याचा दर्जा सारखाच राहील, अशी ही संकल्पना आहे. यामुळे परीक्षापद्धतीवरील विश्वासार्हता वृद्धिंगत होण्यास मदत मिळणार आहे.
घोकंपट्टीला चाप, गुणवत्तेला वाव
या प्रणालीमुळे परीक्षेची सुरक्षितता आणि पारदर्शकता तिच्या मूळ प्रक्रियेतच जपली जाईल. पेपरफुटीची शक्यताच जवळपास संपुष्टात येईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, यामुळे मूल्यमापनाचा दृष्टिकोन बदलेल. विद्यार्थी केवळ पाठांतर किंवा संभाव्य प्रश्न शोधण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर भर देतील. त्यांच्या स्मरणशक्तीपेक्षा विश्लेषणात्मक क्षमता, चिकित्सक विचार आणि समस्यानिवारण कौशल्याचे अचूक मूल्यांकन शक्य होईल. वेळोवेळी प्रश्नपेढीतील प्रश्न सुधारले जात असल्याने शैक्षणिक दर्जाही उंचावेल.
अंमलबजावणीतील आव्हाने
तंत्रज्ञानाची कसोटी : प्रश्नपत्रिका तयार करणारे सॉफ्टवेअर अत्यंत अचूक आणि विश्वासार्ह असावे लागेल, जेणेकरून प्रत्येक प्रश्नपत्रिकेची काठिण्यपातळी तंतोतंत सारखी राहील.
सुरक्षितता : लाखो प्रश्नांची ही पेढी सायबर हल्ल्यांपासून पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत एन्क्रिप्शन आणि नियंत्रित प्रवेशप्रणाली आवश्यक असेल.
पायाभूत सुविधा : लाखो विद्यार्थ्यांना एकाच वेळी प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी वेगवान सर्व्हर, नेटवर्क आणि अखंडित वीजपुरवठा असलेली परीक्षा केंद्रे देशभरात, विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागांत उभी करावी लागतील.
तज्ज्ञांची भूमिका : केवळ उत्तर तपासण्याऐवजी विद्यार्थ्याची तर्कक्षमता तपासणारे प्रश्न तयार करण्यासाठी विषयतज्ज्ञांना सातत्याने परिश्रम घ्यावे लागतील. यात तंत्रज्ञान हे मानवी बुद्धीला पर्याय नव्हे, तर एक सहायक असेल.
भविष्यासाठी एक आश्वासक पाऊल
ही आव्हाने मोठी असली तरी अशक्य नाहीत. काळजीपूर्वक केलेले योग्य नियोजन आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यावर मात करता येते. ‘प्रश्नपेढी’ आधारित ही प्रणाली आपल्या परीक्षा अधिक न्याय्य, पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे प्रतिबिंब ठरवणारी बनवू शकते. हे केवळ परीक्षा सुधारणेचे नव्हे, तर देशाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
डॉ. विनीत कन्सल, संचालक, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी, पुणे)
(शब्दांकन : मीनाक्षी गुरव)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.