Opinion: मराठी भाषा म्हणजे 'अनेक पैलूंची' नात्याची गुंफण! भारतीय भाषांशी जुळलेल्या बंधांचे रहस्य

Marathi Language: मराठी भाषेचे इतर भारतीय भाषांशी भावबंध सहजरीत्या जुळलेले आहेत. त्यांच्यांतील नात्याला अनेक पैलू आहेत.
Marathi Language
Marathi LanguageDainik Gomantak
Published on
Updated on

मराठी भाषेचे इतर भारतीय भाषांशी भावबंध सहजरीत्या जुळलेले आहेत. त्यांच्यांतील नात्याला अनेक पैलू आहेत. त्यामुळेच ते नाते दृढ राहिले आहे. एक तर मराठीला इतर भारतीय भाषांविषयी कुतूहल आणि आस्था आहे. त्या भावनांना अभ्यासाचीही जोड मिळाली आहे. त्यातून विविध भारतीय भाषा, तेथील लोकव्यवहार, कला, संस्कृती यांचे राष्ट्रीय पटावरील संशोधनपर प्रकल्प मराठीत पूर्ण झालेले दिसतात.

स्वातंत्र्योत्तर काळातील काही निवडक ग्रंथ याची साक्ष देतील. उदा. ग.त्र्यं.देशपांडे यांचा ‘भारतीय साहित्यशास्त्र’ (१९५८) हा ग्रंथ. यात भामह ते जगन्नाथ पंडित यांच्यापर्यंतची संस्कृत भाषेतील साहित्यशास्त्राची समीक्षा समाविष्ट आहे.

आपला महत्त्वपूर्ण प्राचीन वारसा यातून सामोरा येतो. ‘भारतीय संस्कृती कोश’ (१९६२-१९७८) हा महादेवशास्त्री जोशी यांनी संपादित केलेला दहा खंडात्मक ग्रंथ असून त्यात १२ हजार नोंदी आहेत. विश्वनाथ नरवणे यांचा ‘भारतीय व्यवहार कोश’(१९६२) हा ग्रंथ अनेक भारतीय भाषांमधील समृद्ध शब्दभांडाराचे दर्शन घडवतो. रा.चिं.ढेरे यांचा ‘भारतीय रंगभूमीच्या शोधात’(१९९६) हा ग्रंथ मराठी रंगभूमीवरील इतर भाषासंस्कृतींच्या प्रभावाचा शोध घेतो. तमीळनाडू आणि आंध्रमध्ये विकसित झालेल्या ‘कुरवंजी’ या लोकनाट्यप्रकाराचा यात सखोल वेध घेतलेला दिसतो.

Marathi Language
Goa Education: 6 वर्षे पूर्ण झालेल्यांनाच यापुढे पहिलीमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

ही संशोधन परंपरा या शतकातही चालू राहिली आहे. त्याची ही काही उदाहरणे :- निरंजन उजगरे यांनी संपादित, अनुवादित केलेल्या ‘काव्यपर्व’(२००३) या पुस्तकात २१ भारतीय भाषांमधील निवडक कवितांचा मराठी अनुवाद समाविष्ट आहे.

यातील अमृता प्रीतम, सावित्री राजीवन, धर्मवीर भारती, गुलाम शेख, नरेश मेहता आदींच्या कविता लक्षणीय आहेत. ‘भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा’ ( १८५० ते २०००) ( संपादकः मंदा खांडगे, नीलिमा गुंडी, विद्या देवधर, निशिकांत मिरजकर, २००७ ) हा पुण्याच्या ‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’तर्फे तयार झालेला द्विखंडात्मक प्रकल्प म्हणजे वीस भारतीय भाषांमधील स्त्रीसाहित्याचा चिकित्सक मागोवा आहे.

Marathi Language
Dussehra in Goa: 'वडी' आणि गोडशाचा नैवेद्य, 'आपट्याची पानं' वाटून समृद्धीचं स्वागत; वाचा कसा असतो गोव्याचा दसरा

अशा प्रकारचा ग्रंथ मराठीत प्रथम तयार होणे, हे आपल्या भाषेला भूषणावह आहे. अरुणा ढेरे यांचा ‘भारतीय विरागिनी’(२०२३) हा ग्रंथदेखील आजवर अलक्षित राहिलेला भाषिक, सांस्कृतिक ठेवा समोर आणतो. असे आणखीही ग्रंथ आहेत. आपले ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर हे त्यांच्या साहित्याच्या अनुवादांना मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे तमीळ आणि गुजराती मंडळींना ''आपले’ लेखक वाटतात. तसेच ज्येष्ठ कन्नड साहित्यिक भैरप्पा यांच्या कादंब-यांचे उमा कुलकर्णी यांनी केलेले अनुवाद मराठी वाचकांच्या पसंतीस उतरल्यामुळे भैरप्पा आपल्याला ‘मराठी’ लेखक वाटतात.

- डाॅ.नीलिमा गुंडी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com