
Manohar Parrikar Birth Anniversary
१३ डिसेंबर हा गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचा जयंती दिन. त्यांना जाऊन जवळजवळ पावणेसहा वर्षे झाली असली तरी ते अजूनही लोकांच्या स्मृतीत आहेत. ‘आज पर्रीकर असते तर..’ असे म्हणणारे अनेक लोक आजही सापडतात. ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाबद्दल बोलत असताना सुद्धा ‘पर्रीकर असते तर असे झाले नसते’, असा आशावाद अनेक लोक व्यक्त करतात.
गोव्याच्या राजकारणाबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा पर्रीकर ही मर्मबंधातील ठेव वाटायला लागते. तसे पाहायला गेल्यास पर्रीकर राजकारणात उशिराच आले. १९९४साली जेव्हा त्यांनी भाजपचे आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला तेव्हा गोव्याच्या राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले होते. मगो पक्षाची जागा काँग्रेस पक्षाने घ्यायला सुरुवात केली होती. सुरुवातीचा भाऊ-ताईचा प्रभाव जाऊन त्याची जागा काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाने घेतली होती.
मगोचा कमी झालेला प्रभाव भाजपला फायदेशीर ठरू शकतो हे धूर्त पर्रीकरांनी हेरले आणि त्याप्रमाणे रणनीती आखायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना मगो पक्षाचा आधार घ्यावा लागला असला तरी वेळ येताच त्यांनी या आधाराला झुगारून स्वतंत्र राहण्याची भूमिका घेतली.
९४साली मांद्रे मतदारसंघातून मगोचे त्यावेळचे सर्वेसर्वा रमाकांत खलप यांचा झालेला पराभव हा याच रणनीतीचा एक भाग होता. ९४साली जरी भाजपचे फक्त चारच आमदार निवडून आले असले तरी ते मगोला संपविण्यात यशस्वी ठरले. याचा परिणाम म्हणून १९९९साली भाजपचे १० तर मगोचे फक्त चार आमदार निवडून येऊ शकले. मगो पक्ष आता गलितगात्र व्हायला लागला होता हे पाहून पर्रीकरांनी आक्रमक व्हायला सुरुवात केली. त्यांच्या या आक्रमक वृत्तीच्या गळाला लागले ते मगोचे नेते रमाकांत खलप व प्रकाश वेळीप. हे करत असताना त्यांनी काँग्रेस पक्षही खिळखिळा करण्याचा प्रयत्न केला.
रवि नाईक काँग्रेसमधून भाजपमध्ये आल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी प्राप्त झाली. आता रवि माजी मुख्यमंत्री असूनसुद्धा त्यावेळी फक्त आमदार असलेल्या पर्रीकरांना त्यांनी मुख्यमंत्री कसे होऊ दिले हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. अर्थात रवि आता ती आपली चूक असल्याचे म्हणत असले तरी त्यामुळे गोव्याला पर्रीकरांसारखा एक दूरदर्शी व्हिजन असलेला मुख्यमंत्री मिळाला यात शंकाच नाही. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी त्या संधीचे अक्षरशः सोने केले.
२००४साली विपरीत परिस्थिती असूनसुद्धा त्यांनी गोव्यात इफ्फी आणला. लक्षात घ्या त्यावेळी राज्यात इफ्फीला पूरक अशा साधनसुविधा नव्हत्या, त्यात परत केंद्रात काँग्रेस सरकार आले होते. पण तरीसुद्धा रात्रदिवस एकत्र करून पर्रीकरांनी इफ्फीला लागतील अशा साधनसुविधा उभ्या करून या महोत्सवाचे मोठ्या दणक्यात आयोजन करून दाखवले. एवढ्या दणक्यात की आज सुद्धा तो ‘पर्रीकरांचा पहिला इफ्फी’ नंबर वन मानला जातो.
पर्रीकरांचा भाजपवर एवढा प्रभाव होता की गोव्यातील भाजप म्हणजे पर्रीकर असे समीकरणच बनले होते. पर्रीकरांची खासियत म्हणजे त्यांचा प्रशासनावर असलेला वचक. अगदी आयएएस ऑफिसरसुद्धा त्यांच्यापुढे नरम होत असत. राजकारणात त्यांनी निश्चितच तडजोड केली पण प्रशासनात त्यांनी कधीच तडजोड केली नाही. बाबूश, मिकीसारख्यांना ऊर्जा देण्याचे काम केले असा त्यांच्यावर आरोप होतो. पण ती राजकीय तडजोड होती हे विसरून चालणार नाही. त्याचबरोबर २०१२साली झालेल्या निवडणुकीत पर्रीकर मुख्यमंत्री व्हावे म्हणून अल्पसंख्याकांनीसुद्धा भाजपला मतदान केले होते हेही विसरून चालणार नाही. अल्पसंख्याकांचा बऱ्यापैकी विश्वास प्राप्त करणारे पर्रीकर हे गोव्यातील भाजपचे एकमेव मुख्यमंत्री होते हेही तेवढेच खरे आहे.
ते देशाचे संरक्षण मंत्री बनले तरी त्यांचे लक्ष गोव्यावरच राहिले. गोव्यासारख्या छोट्या प्रदेशाचा एक नेता संरक्षणमंत्री पदासारख्या देशाच्या तिसऱ्या मानाच्या पदावर जाऊ शकतो हे पर्रीकरांनी दाखवून दिले. अशा प्रकारचा बहुमान गोव्याला यापूर्वी कधी मिळाला नव्हता आणि विद्यमान स्थिती पाहता पुढे मिळेल असे वाटत नाही. त्यांनी राजकारणात आक्रमक फलंदाजीबरोबरच परिस्थिती पाहून डिफेन्सिव्हही फलंदाजी केली.
म्हणूनच ते यशस्वी मुख्यमंत्री होऊ शकले. त्यांना मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा पूर्ण काळ कधीच मिळाला नाही, पण जेवढा मिळाला तेवढ्या काळात ते आपली छाप सोडून गेले. म्हणूनच तर २०१७साली भाजपचे फक्त १३ आमदार असूनसुद्धा ते विरोधी आमदारांच्या साहाय्याने प्रशासन हाकू शकले. आज राज्यात प्रशासनाची नाव हेलकावत असताना, अनेक समस्या डोके वर काढत असताना लोकांना पर्रीकरांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
गोव्याच्या राजकारणातील ते दीपस्तंभ होते. खरे तर त्यांनी दिलेल्या प्रकाशात आजच्या राजकारण्यांनी वाटचाल करायला हवी होती. पण तसे होताना दिसत नाही. म्हणूनच तर आजसुद्धा पर्रीकरांना पर्याय सापडलेला नाही. आजसुद्धा त्यांनी सोडलेली छाप मिटलेली नाही. म्हणूनच आज त्यांच्या ६९व्या जयंतीदिनी त्यांच्या स्मृतींना वंदन करताना यापुढे तरी आजच्या राजकारण्यांना पर्रीकरांसारखे कार्य करण्याची बुद्धी आणि ऊर्जा मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.