Manohar Parrikar Life Journey : उत्तमा आत्मना ख्याताः ! RSS ते गोव्याचे मुख्यमंत्री, पर्रीकरांचा जीवनप्रवास

Manohar Parrikar History : सर्वसामान्य कुटुंबात १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्याच्या म्हापसा शहरात जन्मलेले मनोहर हे सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वाढले, शिकले.
Manohar Parrikar
Manohar ParrikarX
Published on
Updated on

Panaji News : मनोहर पर्रीकर नावाचा एक झंझावात जो शरीररूपाने आज आपल्यात नसला तरी त्यांची उणीव आपल्याला सतत भासत आहे आणि भासत राहील. ‘उत्तमा आत्मना ख्याताः’ (उत्तम लोक स्वतःमुळे प्रसिद्ध होतात) त्यांचे कार्य, त्यांचे विचार, त्यांचे वर्तन, सगळ्यांचे क्षेम पाहणे आणि हे करताना कुठेही आपण केल्याचा आव न आणणे, असे होते आमचे भाई!

एक सर्वसामान्य कुटुंबात १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्याच्या म्हापसा शहरात जन्मलेले मनोहर हे सर्वसामान्य मुलांप्रमाणेच वाढले, शिकले. त्या मातीला, त्या घराला, तिथल्या माणसांना त्यावेळी काही कल्पनाच नव्हती की आपल्या घरी कोण जन्माला आले आहे. येणाऱ्या काळामध्ये हा मुलगा गोव्याचे नेतृत्व करणार आहे.

तरुण वयापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. संघातही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्यामुळेच आपण शिस्त, राष्ट्रवाद आणि समाज या विषयीची आपली जबाबदारी या गोष्टी शिकल्याचे त्यांनी अनेकदा नमूद केले आहे.

संघाच्या माध्यमातून त्यांचा पुढे राजकारणात प्रवेश झाला. त्यांची राजकीय कारकीर्द आणि लाभलेली लोकप्रियता पाहिली तर त्यांचा आलेख सतत चढताच होता.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले हे व्यक्तिमत्त्व, त्यामुळे त्यांची देशाप्रति आपली निष्ठा ही इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा वरचढ राहिली. त्याग, सर्वांप्रति कणव, कळकळ आणि सर्वसामान्य जनतेचे हितच त्यांनी नेहमी पाहिले. देह आणि देव यामध्ये देश लागतो आणि त्या देशाचे आम्ही देणे लागतो ही भावना त्यांनी मनापासून जपली आणि ते देणे देण्याकरिता जिवाचे रान केले.

दिवसरात्र ते काम करीत. आम्ही स्वतःस फार भाग्यवान समजतो की त्यांना फार जवळून पाहता आले. त्यांचा स्वभाव, आवडीनिवडी, त्यांचे विचार, त्यांची स्वप्ने, त्यांचे ध्येय, हे सगळे आगळे होते.

पर्रीकर यांची राजकीय कारकीर्द संघाच्या माध्यमातून सुरू झाली. ९०-९१ या दरम्यान राम जन्मभूमी आंदोलन चालले होते आणि त्यावेळीही पर्रीकर हे संघटक म्हणून जबाबदारी पार पाडत होते. १९९०पर्यंत गोव्यात भारतीय जनता पक्ष रुजला नव्हता.

तेव्हा काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हे दोन पक्ष प्रमुख होते. त्यांना मात देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मनोहर पर्रीकर यांचा चेहरा पुढे आणला आणि भाजपची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. पर्रीकरजी हे आक्रमक भूमिका आणि आपल्या भूमिकेवर ठाम असणारे नेते होते. यामुळे, जनतेवर त्यांचा प्रभाव पडायला लवकरच सुरुवात झाली.

१९९४मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले कधीपासूनच आपल्याला या क्षेत्रात मोठा पल्ला गाठायचा आहे याची त्यांना जाण होती. आमदारकीच्या पहिल्या खेपेसच त्यांनी हे पक्के केले होते की या वेळेस आपल्याला प्रतिमा निर्मितीवर अधिक भर द्यायचा आहे.

आपल्याला माहीत असलेले मनोहर पर्रीकर यांची प्रतिमा ही त्याचाच परिपाक आहे. २४ ऑक्टोबर २००० रोजी ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांचे सरकार फेब्रुवारी २००२पर्यंत टिकले. पुन्हा जून २००२मध्ये ते विधानसभेचे सदस्य बनले आणि पाच जून २००२ रोजी पुन्हा गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

अत्यंत सरळ, साध्या आणि सौम्य स्वभावाच्या पर्रीकर यांनी ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ या तत्त्वाचा अंगीकार जीवनभर केला. अनेक वर्षे गोव्याचे मुख्यमंत्री असूनही सरकारी आवासाचा त्यांनी कधीही लाभ घेतला नाही. स्वतः नेहमीच्या छोट्याशा घरात इतर जनतेप्रमाणे राहणे त्यांनी पसंत केले.

भारताचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर हे आपले साधेपण आणि समर्पण यासाठी ओळखले जातात. भारतीय राजकारणातला हा असा नेता ज्याच्यावर कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी सोज्वळ साधी आणि स्वच्छ प्रतिमा कायम असलेला हा राजकारणी. एक आदर्श आणि इमानदार राजनेता अशी त्यांची प्रतिमा सर्वत्र आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजित असूनही एखाद्या कार्यकर्त्याच्या मागे स्कूटरवर बसून फिरणे त्यांना कधी वावगे वाटले नाही. शिवाय जनतेच्या मनात नेमके काय चाललेय हे लक्षांत येण्यासाठी रस्त्याच्या कडेवर असलेल्या गाड्यावर उभे राहून चहा पिणे, भाजीपाव खाणे आणि, गप्पा मारत मारत जनतेच्या मनात नेमके काय आहे याचा शोध घेणे हे केवळ पर्रीकरजीच करू जाणे.

कौटुंबिक जीवनात त्यांना बराच संघर्ष करावा लागला. २००१मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर आपली दोन मुले, अभिजात आणि उत्पल यांना त्यांनी स्वतः सांभाळले. दरम्यान ते गोव्याचे मुख्यमंत्री होते तसेच राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे त्यांना सतत धावपळ करावी लागे. असे असतानाही राजकीय आणि कौटुंबिक अशा दोन्ही आघाड्या सांभाळत त्यांनी आपली जबाबदारी निभावली. गोव्यामध्ये त्यांना मोठी लोकप्रियता लाभली.

Manohar Parrikar
Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

जनतेच्या प्रेमामुळेच आपल्या वैयक्तिक दुःखावर त्यांना मात करता आली असे ते नेहमी सांगत. गोव्याच्या मातीशी इतके जोडले गेले की २०१४मध्ये जेव्हा त्यांना दिल्लीत संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी जावे लागले, तेव्हादेखील ते उत्सुक नव्हते. पण, ‘पक्ष नेतृत्वाचा आदेश मान्य केला आणि त्यांनी जबाबदारी स्वीकारली’, असे ते सांगत.

परंतु तिथे गेल्यावरही, असे कार्य केले, की प्रत्येक भारतीयाला मनोहर पर्रीकर या नावाचा अभिमान वाटावा. असे असतानाही मन मात्र गोव्याकडेच धाव घेत होते. त्यांचे मन गोव्यात होते. अखेर पुन्हा गोव्यात परतण्याचा योग २०१७मध्ये आला आणि पुन्हा ते गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.

Manohar Parrikar
Goa Politics: 'विरोधकांचे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा'! मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ भाजपचा पलटवार

‘वज्रादपि कठोराणि, मृदुनि कुसुमादपि’. बाहेरून काटेरी फणसासारखे पण आतून त्यातील गोड आणि रसाळ गऱ्यासारखे आमचे भाई. त्यांनी गोव्यातील राजकारणाचा चेहराच बदलून टाकला. त्यांना कुठल्याही प्रकारच्या चौकटीत बांधून ठेवणे हे केवळ अशक्य होते.

अभ्यासू वृत्ती, धीटपणा, कोणत्याही विषयातला अगदी सखोल असा अभ्यास, प्रचंड स्मरणशक्ती, कार्यप्रवणता समाजाबद्दलची उत्तरदायित्वाची भावना, अतिशय सकारात्मक असा दृष्टिकोन असे भाईंचे अनंत गुण आम्हांला अगदी जवळून पाहता आणि अनुभवता आले याबद्दल देवाचे मानावे तेवढे आभार कमीच.

पण भाईंची अकाली झालेली एक्झिट ही कायम मनाला बोचणारी गोष्ट आहे. त्यांची स्मृती कायमच मनात असते. त्या स्मृती आमच्याकडूनही सुयोग्य कामे करून घेतात, प्रेरणा देतात; आज १३ डिसेंबरच्या निमित्ताने बोलावेसे वाटले इतकेच...

Edited By- संदेश साधले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com