Madkai: 1999 साली श्रीपादभाऊंचा पराभव करून सुदिन ढवळीकर यांनी मगोचा झेंडा परत मडकईवर रोवला, तो झेंडा अजूनही कायम..

Madkai Constituency: वीज मंत्री असलेले मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे मडकईतून सहा वेळा निवडून आले असून येत्या निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत.
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

त्या फोंडा तालुक्यातील मडकई मतदारसंघ हा गोव्यातील असा एकमेव मतदारसंघ आहे जिथे मगो पक्ष कधीच पराभूत झालेला नाही. १९६३साली झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून ते परवाच्या २०२२सालच्या निवडणुकीपर्यंत इथे सातत्याने मगो पक्षच जिंकत आलेला आहे.

अपवाद फक्त १९९४सालचा. त्यावेळी मगो-भाजपची युती झाल्यामुळे हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला होता. भाजपचे श्रीपाद नाईक हे काँग्रेसच्या रवि नाईक यांना पराभूत करून प्रथमच विधानसभेत पोहोचले होते.

पण १९९९साली याच श्रीपादभाऊंचा पराभव करून मगोचे सुदिन ढवळीकर यांनी मगोचा झेंडा परत एकदा मडकई मतदारसंघावर रोवला आणि तो झेंडा अजूनही तिथे कायम आहे. विशेष म्हणजे दर निवडणुकांगणिक मगोची, पर्यायाने सुदिनांची आघाडी वाढतच चालली आहे.

गेल्या खेपेला तर सुदिन तब्बल दहा हजार मतांच्या आघाडीने निवडून आले होते. म्हणूनच शेजारच्या फोंडा मतदारसंघात राजकारण तप्त होत असताना इथे मात्र राजकारण एकाच दिशेने जात असल्याचे स्पष्टपणे प्रतीत होत आहे.

सध्या वीज मंत्री असलेले मगोचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर हे मडकईतून सहा वेळा निवडून आले असून येत्या निवडणुकीतही याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे संकेत आतापासूनच मिळायला लागले आहेत.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना सध्या तरी तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी या मतदारसंघात दिसत नाही. फोंडा तालुक्यातील इतर तीन मतदारसंघांच्या मानाने भाजपची बांधणी इथे समाधानकारक नाही.

वास्तविक भाजपकडे या मतदारसंघात सुदेश भिंगी, प्रदीप शेट, जयराज नाईक असे चांगले कार्यकर्ते आहेत. पण भाजपचे श्रेष्ठीच इथे विशेष लक्ष घालताना दिसत नाही. अगदी मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असतानासुद्धा हीच परिस्थिती दिसून येत होती.

कदाचित या मतदारसंघात लक्ष घालणे म्हणजे दगडावर डोके फोडून घेण्यासारखे वाटत असल्यामुळे भाजप नेते मडकईपासून दूर राहत असावेत.

गेल्या खेपेला भाजपला इथे केवळ चार हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेसच्या लवू मामलेदारांच्या वाट्याला तर फक्त १,०९० मते आली होती. पण राष्ट्रीय पक्षांची अशी विल्हेवाट लागत असताना रिव्होल्युशनरी गोवन्स या स्थानिक पक्षाने मात्र ३,४८८ मते प्राप्त करून सर्वांना धक्का दिला होता.

त्यामुळे पुढील पाच वर्षांत हा पक्ष मगोला पर्यायाने सुदिनाना एक चांगली लढत देऊ शकेल अशी अपेक्षा त्यावेळी राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती. पण गेल्या साडेतीन वर्षांतील या पक्षाची मडकईतील कामगिरी पाहता सध्या तरी ही अपेक्षा फलद्रुप होऊ शकलेली नाही .

हे पाहता मडकई मतदारसंघातील ‘वन मॅन शो’ याही वेळी अबाधित राहू शकतो असे दिसायला लागले आहे. आता पुढील सव्वा वर्षात या समीकरणात बदल होतो की काय, ते पाहावे लागेल. मात्र सध्या तरी डॉन चित्रपटातील त्या डायलॉगप्रमाणे ‘मडकईमे सुदिन को हराना मुश्किल ही नही, नामुमकीन है|’ असेच म्हणावे लागत आहे एवढे निश्चित.

झेडपीवर लक्ष

आता पुढील दोन महिन्यांत झेडपी निवडणुका येत असल्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकांवर लागून राहिले आहे. मडकईत सहा पंचायती असून दोन जिल्हा पंचायती या मतदारसंघाच्या अखत्यारीत येत आहेत. ’कवळे’ जिल्हा पंचायतीत चार ग्रामपंचायती येत असून सध्या सुदिनांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात असलेले मगोचे गणपत नाईक हे या झेडपीचे प्रतिनिधित्व करत आहेत.

आता यावेळी मगो त्यांनाच उमेदवारी देणार की काय हे स्पष्ट झाले नसले तरी मगोचे ‘वर्चस्व’ पाहता त्यांचाच उमेदवार इथे बाजी मारू शकतो असा होरा व्यक्त होऊ लागला आहे. त्याचप्रमाणे कवळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेश कवळेकर हेही या झेडपीच्या उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

तेही सुदिनांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात असल्यामुळे तसेच त्यांना सरपंच म्हणून पंचायतीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे ते एक पर्यायी उमेदवार ठरू शकतात, असे म्हटले जात आहे. पण शेवटी चेंडू सुदिनांच्या रिंगणात असणार असून ते जो कौल देतील तोच निर्णायक ठरणार असल्याचे मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.

उरलेल्या दोन पंचायती ‘प्रियोळ’ झेडपीमध्ये येत असून तीही झेडपी मगोकडेच आहे. या झेडपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही जिल्हापंचायत मडकईतील दोन व प्रियोळ मतदारसंघातील एक अशा तीन पंचायतींची बनली आहे. गेल्या वेळी तत्कालीन मंत्री तथा प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनी जंग जंग पछाडूनसुद्धा मगोचे दामोदर नाईक हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

Sudin Dhavalikar
Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

आता यावेळी गावडे हे मंत्री नसल्यामुळे मगोला इथे ‘केक वॉक’ मिळू शकतो असे बोलले जात आहे. सध्या पक्षीय पातळीवर मगोने तयारी सुरू केली असली तरीही भाजपबरोबरच्या युतीवर अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. पण तरीही या दोन्हीही झेडपीवरचे मगोचे वर्चस्व पाहता युती झाली तरी इथे मगोच ‘मोठा भाऊ’ असणार यात शंकाच नाही. एकंदरीत येत्या काही दिवसांत या दोन झेडपींमधले वातावरण सक्रिय होणार हे निश्चित.

Sudin Dhavalikar
Goa Politics: खरी कुजबुज; माविन सुटले, बाबूशचे वाढले टेन्शन!

भाजप-मगो युती होणार काय?

भाजप-मगो युती होणार, असे मगोकडून सांगितले जात असले तरी याबाबतीत अजून तरी ठोस असे काही सांगता येत नाही. सध्या मगो सरकारात असल्यामुळे युतीची शक्यता वाटत असली तरी निवडणुकीच्या तोंडावर समीकरणे बदलू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

२६ वर्षे राजकारणात असूनसुद्धा सुदिन राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकले नसल्यामुळे येणारी निवडणूक ही त्यांच्या दृष्टीने शेवटची संधी ठरणार आहे. हीच शक्यता युतीच्या आड येऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे. आता नक्की काय होते हे कळायला ’दिल्ली अब ज्यादा दूर नही’ हेही तेवढेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com